युरोपची सुधारणा

६. रोमन बादशाही मोडकळीस आल्यावर ख्रिस्ती धर्माचा उदयकाळ सुरू झाला. तरी रोमन बादशाहीचें वजन लोकांवर कायम होतें. या रोमन बादशाहीचा पुरस्कर्ता पोप होऊन बसला. तो ह्या राजाला किंवा त्या राजाला बादशाही वस्त्रें देऊन ह्या रोमन साम्राज्याचें सोंग कायम ठेवीत असे. पण ह्या मध्ययुगांत युरोपमध्यें अंदाधुंदीच माजून राहिली होती. त्यांत विशेष एवढाच होता कीं, ख्रिस्ती पाद्र्यांकडून धर्मोपदेशाच्या द्वारें लोकांना थोडेंबहुत ज्ञान मिळत होतें.

७. अशा तमोयुगांत युरोप सांपडलें असतां मोंगल लोकांच्या स्वार्‍या त्याच्यावर होऊं लागल्या; व त्यानंतर तुर्कांनी तर पूर्वेकडील युरोप आणि खुद्द ख्रिश्चन ग्रीक बादशाही व्यापून टाकली. सोळाव्या शतकाच्या आरंभीं वर वर पहाणार्‍याला असें वाटणें साहजिक होतें कीं, लवकरच सर्व जग मंगोलियन किंवा मुसलमान बनणार आहे. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ The Outline of History, p. 491 पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८. परंतु युरोपमध्यें आंतरिक सुधारणेला तेराव्या शतकांतच आरंभ झाला होता. त्याला मुख्य कारण म्हटलें म्हणजे पुन्हा जिकडे तिकडे नवीन शहरांचा उदय हें होय. इटलीमध्यें व्हेनीस, जिनोवा, पीसा, फ्लॉरेन्स इत्यादि शहरें उदयाला आलीं. आणि ही पद्धति वाढत जाऊन सर्व युरोपभर फैलावली. हीं शहरें म्हटलीं म्हणजे व्यापारावर पोसावयाचीं. त्यांचा सगळा व्यापार कांस्टांटिनोपलच्या मार्गानें चालत असे; व त्यांतील रहिवाशांना हिंदुस्थान आणि चीन या देशांची मुळींच माहिती नव्हती.

९. निकोलो पोलो आपला भाऊ माफियो व मुलगा मार्को यांना बरोबर घेऊन व्हेनीसहून निघाला व दोन तीन वर्षें प्रवास करून इ.स. १२६० च्या सुमारास चीनमध्यें कुबलाई खानाच्या दरबारांत पोंचला. ह्या पोलोंनी चिनांत तीस बत्तीस वर्षें घालविलीं. येतांना एका राजकन्येबरोबर पर्शियाला येऊन ते इ.स. १२९५ सालीं व्हेनीसला पोंचले. त्यांचीं चीनच्या दरबारचीं वर्णनें ऐकून लोकांनी त्यांची गणना विलक्षण गप्पीदासांत केली. पण आपल्या कोटांत छपवून आणलेलें जड-जवाहीर जेव्हां त्यांनी आपल्या आप्तांसमोर मांडलें, तेव्हां कोठें लोकांना त्यांच्या गोष्टींत अल्पस्वल्प तथ्य असावें, असें वाटूं लागलें. तरी पण मार्कोला लोकांनी ‘लक्षकार’ (लक्षांनीच बोलणारा) हें नांव थट्टेनें ठेवलेंच होतें !

१०. इ.स. १२९८ मध्यें व्हेनीसच्या व जिनोवाच्या लोकांत एक मोठी आरमारी लढाई झाली, व तींत व्हेनीसच्या लोकांत एक मोठी आरमारी लढाई झाली, व तींत व्हेनीसच्या लोकांचा पाडाव झाला. जिनोवाला जे व्हेनीसचे कैदी नेण्यांत आले, त्यांत मार्को पोलोहि होता. तेथें त्यानें आपलें प्रवासवृत्त रुस्तिसियानो (Rusticiano) यास निवेदन केलें. रुस्तिसियानोनें त्याचा संग्रह करून तो ग्रंथ लिहिला तो ‘मार्को पोलोच्या सफरी’ या नांवानें प्रसिद्धीला आला, व त्या काळीं तो बुद्धिमान् लोकांना फारच प्रिय झाला.

११. पोलोंच्या या प्रवासापासून युरोपला तात्कालिक फायदा म्हटला म्हणजे लाकडी ठशांनी छापण्याची कला, बंदुकीची दारू व होकायंत्र या तीन गोष्टींचा होय. या तीन वस्तु मार्को पोलोनेंच चीनमधून आणल्या अशी समजूत आहे. पण तिजविषयीं बराच मतभेद दिसतो. कांहीं असो, युरोपला या वस्तु पोलोच्या प्रवासानंतर माहीत झाल्या हें खास.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel