शैवांचा जुलूम

२१०. इ.स. सातव्या शतकाच्या आरंभीं शशांकानें उत्तरेकडील बौद्धांचा जसा छळ आरंभला, तसाच दक्षिणेकडील जैनांचा कून, नेडुमारन् किंवा सुंन्दर पाण्ड्य यानें याच शतकाच्या उत्तरार्धांत छळ सुरू केला. हा राजा गादीवर आला तेव्हां जैनधर्मी होता. परंतु त्याच्या बायकोचा गुरु तिरुज्ञानसंमंद यानें त्याला शैव धर्माची दीक्षा दिली. तेव्हांपासून तो आपल्या पूर्वींच्या धर्मगुरूंवर - जैन साधूंवर - उलटला. त्यानें त्यांचा अनेक रीतीनें छळ मांडला. आठ हजारांपेक्षां जास्त जैन साधूंना त्यानें हाल हाल करून ठार केलें. त्यानें केलेल्या क्रूर कृत्यांचें प्रदर्शन अर्काटमधील तिरुवत्तूर मंदिराच्या भिंतीवरील कोरीव चित्रांत करण्यांत आलें आहे. त्याच्या अघोरी कृत्यांमुळें दक्षिणेंत जैन धर्माला मोठा धक्का बसला. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Early History of India, pp. 474-75.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२११. इ.स. सोळाव्या शतकांत सिंहलद्विपाचा राजा राजसिंह आपल्या बापाचा वध करून गादीवर आला. त्यानें बौद्ध संघाला निमंत्रण देऊन पितृवधाबद्दल प्रायश्चित्त विचारलें. पण भिक्षुसंघानें प्रायश्चित्त देणें आपल्या हातचें नाहीं असा निकाल दिला. तेव्हां शैव धर्माचा अंगीकार करून त्यानें भिक्षुसंघाचा अत्यंत भयंकर छळ आरंभला. चार पांच वर्षांच्या आंत सर्व सिंहलद्वीपांत एकहि भिक्षु राहिला नाहीं. मोठमोठालीं बौद्ध पुस्तकालयें त्यानें आपल्या हातानें जाळलीं. हें काम तो एकसारखें तीन महिनेपर्यंत करीत होता असें म्हणतात. सुदैवानें त्याची कारकीर्द थोडक्यांत आटपली. जांभळें खावयास गेला असतां पायाला विषारी कांटा लागून तो मरण पावला. १ पण त्याच्या ह्या अल्पावधीच्या कारकीर्दींत सिंहलद्वीपांतील बौद्धधर्म नष्टप्राय झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ महावंस ९३ वा परिच्छेद. तो कसा मेला हें महावंसावरून समजत नाहीं. सिंहली लोकांत प्रचलित असलेली त्याच्या मरणाची कथा येथें दिली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२१२. परंतु सिंहलद्वीपांत शैवांचें ठाणें कायमचें रहाणें शक्य नव्हतें. एकतर हजारों वर्षाच्या सवयीनें बौद्ध धर्म लोकांच्या हाडींमासीं खिळलेला, व दुसरें हें कीं, शैव संन्यासी तामील देशांतून आले असल्या कारणानें सिंहली लोक त्यांना मानतील हें संभवनीय नव्हतें. त्यामुळें राजसिंहाच्या पश्चात् विमलधर्मसूर्य राजाला शैवांना हांकून देऊन पुन्हा बौद्ध धर्म स्थापावा लागला. संघाची स्थापना करण्याला सिंहलद्वीपांत भिक्षु राहिलेच नव्हते. तेव्हां त्यानें सयाम देशांतून भिक्षु आणले, व पुन्हा संघाची स्थापना केली. आजकाल जो सिलोनांत प्रमुख पंथ आहे, त्याला सयामनिकाय असें म्हणतात. ही गोष्ट येथें देण्याचें कारण हेंच कीं, शैवांनी जैनांची आणि बौद्धांची शिकार करण्याचें काम सवड मिळेल त्याप्रमाणें तहत सोळाव्या शतकापर्यंत चालू ठेवलें होतें; व सिंहलद्वीपापर्यंत लोकांना त्यांच्या ह्या शिकारीचीं फळें भोगावीं लागलीं.

२१३. हे राजे बौद्धांचा आणि जैनांचा छळ केवळ शैवांच्या सांगण्यामुळें करीत असत असें समजणें चुकीचें होईल. त्यांना आपल्या सैन्यासाठीं द्रव्याची मदत लागली, तर ती एकदम मिळवण्याला बौद्धांचा आणि जैनांचा छळ हें एक साधन होऊन बसलें होतें. कां की, त्या काळीं बहुतेक संपत्ति बौद्ध आणि जैन मन्दिरांतून एकवटली होती. त्याशिवाय बौद्धांच्या संघारामांचीं आणि जैनांच्या उपाश्रयांचीं इनामें हिरावून घेण्यास तो एक चांगला उपाय होता; आणि बौद्ध किंवा जैनधर्मी राहून तो उपयोगांत आणतां येणें शक्य नव्हतें. म्हणूनच ह्या राजे लोकांनी शैव धर्माचा पुढाकार घेऊन बौद्धांचा आणि जैनांचा छळ आरंभिला असला पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel