अर्जदस्त अर्जदार । बंदगी बंदेनवाज । आलेकम् सलाम । साहेबाचे सेवेशीं । बंदे शरीराकार । जिवाजी शेकदार । बुधाजी कारकून । परगणे शरीराबाद । किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार जाहलों । तों परगणे मजकुरीं येऊन सरकार काम सुरू करावयास लागलों । तों परगणे मजकूरचे जमादार दंभाजी शेटे । कामाजी महाजन । मनीराम देशमुख । ममताई देशपांडीन । क्रोधाजी नाईकवाडी । ऐसे हरामजादे फार आहेत । ते सरकार कामाचा कयासा चालूं देत नाहींत । तमाम परगण्याची फितुरी करितात । दंभाजी शेट्या कचेरींत येऊन जोम धरून बसतो । मनीराम देशमुख आपलें परभारें काम करून घेतो । ममताई देशपांडी इनें तमाम परगणा जेरदस्ता केला । क्रोधाजी नाईक यानें तमाम तफरका केला । तो साहेबांपासून जरासंध चोपदार आला । त्यानें खबर केलीं कीं । मागून यमाजी पंताची तलव होणार । त्यास त्या धास्तीनें तमाम परगणा ओस जाहला । बीतपशील कलम डोळसवाडीस मात्र कांहीं रुई झुई वस्ती राहिली । कानगांव तो बंद जाहले । दोनी वेशींचीं कवाडें लागलीं । नाकापुरास वाहव सुटलें । तोंडापूर तो तफरका झाले । दंताळवाडी ओस पडली । दिवे लावणी देखील राहिली नाहीं । केंसगांवची पांढर जाहली । शीरापुरचे लोक दरोबस्त थरथरा कांपूं लागले । हातगाव कसल्यानें जर्जर जाहले । त्यांच्यानें आतां काहीं लावणी होत नाहीं । पायगांवाचीं मेटें बसलीं । ढोरापुरची राहटी राहिली । चरणगांवची चाली सरली । गांडापूर वाहूं लागले । लिंगस्थान भ्रष्ट जाहलें । उठूं पळूं लागलें । धीर धरवेना । ऐशी परगण्याची कीर्ति बुडाली । यावर सरकार काम सुरू करीत होतों । तों यमाजीपंताची परवानगी आली कीं । हुजूर येणें आपणास साहेबाच्या कलमांना आश्रय आहे । एका जनार्दनका बंदा । बंदगी रोशन होय हे अर्जदस्त ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel