महारीण करिती जोहार । पाटील बाजी तुम्ही हुशार । आले यमाजी हुद्देदार । त्यांचा जीवावरील मार । बरी गत नाहीं ॥ १ ॥

पायां पडतें महारीण ॥ध्रु०॥

तुमची बाकी तुम्ही सारा । वाउगा कां घालितां चारा । तुमचीं रांडा पोरें आवरुनी धरा । नका जाऊं दुसरे द्वारा । धड गत नाहीं ॥ २ ॥

गांवांची पाटलीण ओढाळ भारी । दिवसा नागवी रस्ते चारी । गांवांतील रयत पळाली सारी । वाउगी हाव धरितां भारी । पुढें बरें नाहीं ॥ ३ ॥

दिवा लावावया नाहीं कोणी । सारें खाऊनि जाहली रिती गोणी । शेवटीं टिपक्याचे तुम्ही धनी । माल खाऊनि केली धुळधाणी । विचार बरा नाहीं ॥ ४ ॥

तुम्ही बैसतां पलंगावरी । तुमच्या सेवेसी सहा चार नारी । त्याचे सुख तुम्हां वाटतें भारी । येईल यमाजीची स्वारी । पळाया वाट नाहीं ॥ ५ ॥

पुढें न दिसे तुमचें बरें । आले यमाजी बाजी हुजरे । धरती जिवाजी तुम्हांस निर्धारें । तेथें कोण सोडवी पोरें । मोठें दुःख पाहीं ॥ ६ ॥

महारीण बोलते बोला । तुम्ही सांडा गर्वाचा चाळा । एका जनार्दनीं भेटला । एकपणें एक देखिला । आतां दुःख नाहीं ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel