समस्त राजकार्य धुरंधर । विश्वासनिधी । राजमान्य राजश्री । गजानन पंडित । द्विमत अपर्णाकांता ।

तालुके कैलासगिरी । तहाजी बाजी शेकदार । परगणे कर्म आचरण । सरकार ब्रह्मांड नगर । लोली प्रवाहे ।

अभयपत्र दिधलें कीं । तुमचे बाबे विवेक देसाई येऊन हुजूर विदित केलें कीं । दक्षिणाधिपति राजश्रीं यमाजीपंत कमाविसदार । यांचे धास्तीनें तमाम गांवची कीर्द बुडाली । त्यास येरवी पूर्वी । संपूर्ण तीर्थव्रतें । जप अनुष्ठानें ।

दानादि केलीं । परंतु गांवची कीर्द अबादी होईना । यास्तव अभयपत्र । सादर केलें कीं ।

त्रिकुटाचल शिखरीं । भ्रमरगुंफा सिंहासनीं । श्रीगुरुराव आहेत । त्यासी शरण जाऊन ।

आतां ज्ञानाची विचारणा करावी । म्हणजे श्रीगुरुराव । नामाचें निशाण देतील ।

तें देहगांवचें मुख्य चौबारा उभारा । कामक्रोधादिक षड्‌वैरी । आपणावर दगा करितात ।

तरी त्यांची पाळद राखून । इकडे निरोप कळवावा । म्हणजे त्यांशीं धरून आणून ।

त्यांचा शिरच्छेद करावयास येईल । परंतु लिहिल्याप्रमाणें वहिवाट करावी ।

म्हणजे आम्ही सरकारांत अर्ज करूं । ज्ञान वैराग्य हुजरे । आपले रखवालीस पाठवूं । कळावें एका जनार्दना शरण ।

हा आशीर्वाद हें अभयपत्र ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel