याप्रमाणे विचार केला तर नामदार गोपाळराव गोखले हे विचारस्रष्टयांच्या उच्च कोटीत बसविता येत नाहीत. त्यांचे गुरु रानडे यांच्या ठायी पहिल्या कोटीची म्हणजे विचारी कोटीची कला नि:संशय होती. तशीच चमक सुप्रसिध्द आकडेशास्त्री व महापंडित कै. रा. व. गणेश व्यंकटेश जोशी यांच्या ठिकाणी होती. रानडे व जोशी या दोघांचाही निकट सहवास गोपाळराव यांस लाभला होता. व त्याचा त्यानी भरपूर उपयोग करून घेऊन आपली लायकी वाढविली. कॉलेजातले गोपालरावांचे अध्यापन किंवा पुढे उदयकालातील कौन्सिलातील लोकसेवा ही पाहता त्यात सूक्ष्म अभ्यास, दीर्घ दृष्टी, नेमस्तपणा, मुद्देसूदपणा, सफाईदारपणा, भारदस्तपणा आणि मधुरपणा इत्यादि पुष्कळ प्रशंसनीय गुण दिसले  तरी विचारांची अभिनवता किंवा कल्पकता हे भरारीचे गुण आढळत नाहीत. आणि म्हणूनच गोखल्यांचे लिहिणे, बोलणे कधीही 'आर्ष' (क्लासिक) कोटीत पडणार नाही. परवा (ता. १९।२।२५) डॉ. मॅक्निकल् यांनीही गोपाळरावांना 'ॠषी'  कोटीत दाखल केले नाही; त्याचे मर्म हेच होय. सीअर, द्रष्टा किंवा ॠषी ह्या कोटीची छटा रानडयांत होती ती शिष्यांत उतरली नाही. शिष्याचा सर्व काळ 'धकाधकीच्या मामल्यात'च गेला.

या धकाधकीच्या मामल्यात मात्र गोपाळरावांची कामगिरी स्पृहणीय झाली. त्यांच्या मोठेपणाचे बीज सर्व यातच आहे. वयाच्या विशीच्या आत पदवीधर होऊन वयाच्या पन्नाशीच्या आत परकीय सरकाराच्या दरबारी प्रजापक्षाचा खंदा वीर म्हणून त्या सरकारची आदब संभाळून तडाखे देत देत त्याजकडूनही 'धन्य धन्य' असे उद्गार वदविणे ही कामगिरी असामान्य कोटीतली आहे यात संदेह नाही.

ही अपूर्व कामगिरी गोपाळरावांनी ज्या गुणांच्या जोरावर बजाविली ते गुण आपल्या अंगी बाणविण्याचा जर आमच्या देशातील तरुण लोक प्रयत्न करतील तरच त्यांचे चरित्र लिहिल्याचे किंवा वाचल्याचे सार्थक झाले असे होणार आहे. गोपाळरावांचे हे गुण येथे थोडक्यात वर्णितो :-

(१) कष्टाळूपणा - सर्व थोरपणाचे मुख्य कारण कष्टाळूपणा हे होय. समर्थांनी जागोजागी सांगितले आहे की, ''रूप लावण्य अभ्यासिता नये । सहज गुणासि न चले उपाये । काही तरी धरावी सोये । आगंतुक गुणांची ॥'' द्रष्टेपणाचा डोळा जिने फुटतो ती प्रतिभा, ही सहजगुणातली आहे. ते 'ईश्वर देणे' आहे. पण कष्ट, दीर्घोद्योग हा मनुष्याच्या हातातला आहे. उद्योग किंवा प्रयत्न हा प्रसंगी सहजगुणापेक्षाही कमावला तर प्रभावी ठरतो, इतके याचे महत्त्व आहे. यासाठीच समर्थांनी म्हटले आहे : कष्टेवीण फळ नाही । कष्टेवीण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनी ॥' हा कष्टाचा आगांतुक गुण गोपाळरावांनी उत्तम प्रकारे कमावून प्रतिभादी सहजगुणांची उणीव भरून काढिली. या गुणांच्या बळावर त्यांनी कौन्सिलातले आपले प्रतिपक्षी चीत केले. इंग्रजी भाषा उणी पडली तर आम्हा नेटिवांना हसतात काय? फाकडे इंग्रजी बोलणारे म्हणून आपण लौकिक संपादणार अशी ईर्षा धरून त्यांनी कष्ट केले. आकडेशास्त्रातली माहिती कच्ची असली तर सरकारी सभासद आमचा उपहास करतात काय तर आकडे पुस्तकांच्या समुद्रात बुडया मारमारून व तारवे हाकहाकून ते त्यातील सराईत नावाडीच बनले. असे पडतील ते कष्ट त्यांनी केले. नसते केले तर फर्ग्यूसन कॉलेजातील शिदोरीवर अवलंबून एवढा पल्ला त्यांच्याने खचित गाठवला जाता ना ! पण कष्टाच्या बळावर त्यांनी 'असाध्य ते साध्य' करून घेतले.

(२) 'नेमस्तपणा'- हाही एक दुसरा महत्त्वाचा गुण गोपाळरावांच्या अंगी होता. आपल्या सर्व भावनांचे लगाम विवेकाच्या हाती देऊन आपला जीवितरथ चालविण्याची सावधगिरी त्यांनी बाळगिली, त्यामुळे त्यांचे आयुष्य इतके यशस्वी झाले. प्रत्यक्ष व्यवहारात काम करताना कल्पनांना मुरड घालावी लागते. कल्पकता हा एक सहजगुण आहे व तो श्रेष्ठ आहे. भावना आणि कल्पना यांशिवाय हे जीवित निष्फल आणि नि:सार होईल यात संशय नाही. पण कल्पनेचा धर्मच असा आहे की, ती नेहमी जोरजोराने उशी घेते. जसा जातिवंत मस्त वारू असावा आणि तो चौफेर उधळला म्हणजे त्याची टाप अस्मानात गेलेली भुईला पुन: केव्हा चिकटली ते दिसतच नाही तसेच कल्पनेचे आहे. कल्पनेचे तारू एकदा भडकले की कोठे जाईल याचा नेम नाही; उतरले तर एखाद्या सुंदर बेटावर उतरेल नाहीपेक्षा खडकावर फुटेल किंवा रेतीत रुतेल ! यासाठी कल्पनेच्या पायात घालून तिला नाचविली म्हणजे तिचा खेळ मनोहर होतो. या कल्पनागुणाचा उत्कर्ष गोपाळरावांत नव्हता. तथापि प्रत्येक मनुष्यमात्राला अंशमात्राने सर्वच गुण थोडेफार वाटणीला आलेले असतात. आपल्या वाटणीला आलेल्या भावना उद्दाम होऊ न देता गोपाळरावांनी त्यांना कार्यवश ठेवल्या म्हणून त्यांची नेमस्त अशी ख्याती झाली. राजकारणी पुरुषांना हा नेमस्तपणाचा समर्थांनी स्तविलेला गुण फार उपयोगी पडतो. या गुणाचे उच्च स्वरूप म्हणजे चतुरपणा व मुत्सद्दीपणा आणि याचे अधम स्वरूप म्हणजे नेभळटपणा व दीनपणा होय. गोपाळरावांनी नेमस्तपणाचे उच्च स्वरूप जगापुढे प्रकट केले आणि यात जरी एखाद्या काव्हूरशी त्यांची बरोबरी कल्पिणे ही अतिशयोक्तीच ठरेल तरी एखाद्या बर्कच्या जोडीला त्यांस ठेवण्यास चिंता नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel