गोखल्यांचा देशभर व्याख्यानांचा दौरा

गोखल्यांनी जेव्हा हे नवीन पक्षाचे बळ पाहिले तेव्हा काँग्रेसला सरकारची सहानुभूती मिळणार नाही, अशी भीती वाटू लागली. त्यांना मोर्लेसाहेबांनी असे निक्षून सांगितले होते की जर हिंदुस्तानातील लोक भलतीकडेच वाहवत जाऊन सरकारवर शिव्याशापांचा भडिमार चालू ठेवतील तर हिंदुस्तानास कोणतेही हक्क मिळणे शक्य नाही. लॉर्ड मिंटो  यांचा पुतळा अनावृत्त करावयाच्या वेळेस लॉर्ड हार्डिज यांनीही याच प्रकाराचे शब्द काढले. ते म्हणाले - ''His task was rendered more difficult by a small body of the extremists, who hoped to wring concession from the Government by acts of violence and crime. To a weaker man it might have appeared necessary on the appearance of the new agitation not only to meet it with repressive measure sufficient to ensure the preservation  of public safety, but also to withhold all concessions, even those aspirations which he regarded as legitimate, for fear that he and his Government might be accused of yielding to threats and violence what they were unwilling to grant spontaneously.''

गोखल्यांच्या मनात हेच विचार आले. आपण हिंदुस्तानातील लोकांची मने क्षुब्ध होऊ देणार नाही अशी मोर्ले साहेबांस त्यांनी हमी दिली होती. आपल्या देशातील सुशिक्षित तरुणांस ताळ्यावर आणावे; त्यांस सर्वत्र निराशा, घनदाट अंधकार असे जे भासत आहे, तो भास नाहीसा करून आशेचे सोनेरी किरण त्यांस दाखवावे असे त्यांच्या मनाने घेतले.  त्याचप्रमाणे आपण स्वराज्य-  वसाहतीचे स्वराज्य- मागत आहो, परंतु ते चालविण्याची खरी पात्रता आपल्या अंगी कितपत आहे; आपणांत तंटे, भांडणे  किती आहेत; परस्परांवर  विश्वास नाही, परस्परांवर श्रध्दा नाही प्रेम नाही, लोभ नाही- अशा स्थितीत परमेश्वरी घटनेने आपल्या हातात सूत्रे आली, तरी सुयंत्रित व चांगला कारभार  हाकण्यास आपण कितपत पात्र ठरू याची मनोमय साक्ष तरुणांस त्यांना पटवून द्यावयाची होती. आधी लायक व्हा; मग मागा- हिरावून घ्या- वाटेल ते करा. परंतु जे राखण्यास आपण अद्याप समर्थ नाही, ते मागण्यात तादृश फायदा नाही. हा उपदेश तरुणांस करण्यासाठी गोपाळरावांनी उत्तर हिंदुस्तानात दौरा काढला. पंजाब आणि संयुक्तप्रांत यातील मुख्य मुख्य शहरी त्यांनी फेब्रुवारी महिना व्याख्याने देण्यात खर्च केला. अलाहाबाद, लखनौ, आग्रा, दिल्ली, लाहोर, अमृतसर वगैरे ठिकाणी त्यांनी स्फूर्तिदायक व्याख्याने दिली. देशाची सद्यस्थिती, स्वदेशी, हिंदु मुसलमानांचे ऐक्य आणि सुशिक्षितांचे व विद्यार्थ्यांचे कर्तव्य या चतु:सूत्रीवर त्यांचा भर होता.

देशाच्या दु:स्थितीने गोखल्यांचे अंत:करण पिळवटून निघत नसेल काय? आपल्या मायभूमीस भोगाव्या लागणा-या हालअपेष्टा, क्षणक्षणी, पदोपदी होणारा . यांनी त्यांस संताप येत नसेल का? देशातील अठराविश्वे, दारिद्रय, अज्ञान, साफ बुडून गेलेले उद्योगधंदे, वाढती मृत्यूसंख्या- एक का दोन, हजारो गोष्टी त्यांच्या अंत:करणास विंचवाच्या नांगीप्रमाणे दंश करीत असतील;  परंतु ते निराश होत नव्हते. आणि इतरांनीही निराश होऊ नये असे त्यांचे सांगणे होतो. 'Indians should rise to the fullest height of their stature and be in their country what other people are in theirs.' ज्याप्रमाणे इतर देशांतील लोक मान वर काढून मोठया ऐटीने वागतात तसेच आपलेही लोक व्हावेत हीच त्यांचीही मनीषा होती. ही गोष्ट साध्य होण्यास आपणांस आपला कारभार चालविण्यास हक्क पाहिजेत हेही त्यांस मान्य होते, परंतु ते हक्क सांभाळण्यासाठी आपण प्रथम वळण लावून घेऊ या, समर्थ होऊ या, असे ते उपदेशीत होते. आपल्यामध्ये उत्साह, तेज, धैर्य आहे असे नवीन तरुणांवरून दिसते. कारण हे गुण नसते तर ते अत्याचारासही प्रवृत्त होते ना. परंतु या पृथ्वीमोल गुणांना चांगल्या मार्गाने जाऊ द्या. ब्रिटिशांच्या सत्तेखाली  आपण आलो- ही एक तपश्चर्या आहे. आता खडतर तपश्चर्या केली नाही तर या तपश्चर्येचे मिळणारे गोड फळ स्वराज्य ते कसे मिळेल? आणि मिळाले तरी कसे पचेल? ही तपश्चर्या अव्यंग व्हावी एतदर्थ तुम्ही आधी ऐक्य संपादन करा. आपसातील कलह एकमेकांशी मिळते घेऊन मिटविण्यास आपण शिकले पाहिजे. आपण सर्व भाऊ भाऊ आहो, आपण प्रथम हिंदी आहो आणि मग हिंदू, पारशी, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आहो असे प्रत्येक सुजाण अंत:करणास पटले पाहिजे; आणि पटून या तत्त्वाचा परिपाक पदोपदी वर्तणुकीत दिसला पाहिजे. न्याय आणि प्रीति ही आपली ब्रीदवचने असावी. धर्म किंवा पथ यातच आपण गुरफटून जाऊ नये. जपानचे प्रख्यात आरमारी  सेनापती टोगो हे धर्माने ख्रिश्चन होते. त्यांस एकाने विचारले, काय हो तुम्ही ख्रिस्तानुयायी असून रशियाशी का लढता? रशिया तर ख्रिस्तधर्मी आहे. हा थोर देशभक्त म्हणाला. 'मी प्रथम  जपानी आहे; नंतर ख्रिस्ती आहे.' 'I am a Japanes first and a Christian afterwards,' हे शब्द आपल्या देशातील लोकांनी हृत्पटावर खोदून ठेवून, तद्नुरूप वागण्याचा शक्य तो प्रयत्न केला  पाहिजे. आपल्या प्रेमसिंधूत सर्व हिंदुस्तानच्या जनतेस डुंबण्यास अवकाश पाहिजे. या गोष्टी आपणांस अशक्य वाटतात काय? कल्पना- साम्राज्यात, रामाच्या राज्यातच या गोषटी सुसाध्य अशी आपली दृढ कल्पना झाली आहे काय ?  झाली असेल तर सर्वच ग्रंथ आटोपला म्हणावयाचा! हिंदुस्तानास जगाच्या संस्कृतीत एक महत्त्वाचे कार्य करावयाचे आहे, आणि त्यासाठीच तो जगला आहे: व जगणार आहे. ते कार्य कोणते? तर जगाला प्रेम आणि सत्य यांचा धडा द्यावयाचा; आध्यात्मिक ज्ञान सर्वांस शिकवावयाचे. रामतीर्थ, विवेकानंद यांनी हेच उच्च रवाने  व उल्हासाने सांगितले. रानड्यांनी आपल्या व्याख्यानातून हीच इच्छा पुन: पुन: प्रदर्शित केली आहे. आशा आणि श्रध्दा यांना अंत:करणात पट्टाभिषेक करा. आशा अमर असावी. निराशा आणि अडचणी या कोणाच्या मार्गात येत नाहीत? सर्वांच्याच मार्गांत येतात. अशाही वेळी आपण आशापूर्ण राहून योग्य मार्गाने गेले पाहिजे. परमेश्वरावर दृढ भरंवसा ठेवून आपल्या पवित्र ध्येयासाठी झटले पाहिजे. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी एतदर्थ आपणांमध्ये नैतिक बळ व शिस्त उत्पन्न करणे फार अगत्याचे आहे. गोपाळरावांचे प्रत्येक वेळी सांगणे असे की, 'आपल्या लोकांमधून नैतिक सामर्थ्य कमी होत चालले आहे. ते मिळविल्याशिवाय अंगीकृत कार्यात जोम उत्पन्न करणे अशक्यप्रायच होय.' महात्मा गांधींची आज सुध्दा हीच सांगी आहे, की 'आपण अंत:करणातून परमात्म्याला- प्रेमाला आणि ऐक्याला धुडकावून देऊन येथे सैतानाला अधिष्ठित केले आहे.' म्हणून प्रत्येक देशभक्ताने, देशाच्या प्रत्येक कैवा-याने प्रथमत: लोकात उच्च मनोवृत्तीचे बीजारोपण केले  पाहिजे. संकुचित भावना व क्षुद्र विचार यांची मगरमिठी आपणांस जर अद्याप सोडविता येणार नाही तर आपला भाग्योदय कसा होणार? लोकांस असा उपदेश करणे अपमानास्पद आहे असे काही पुढा-यांसही वाटते. परंतु ही गोष्ट बोलून दाखविलीच पाहिजे. वरपांगी देशभक्तीचा भोपळा फोडलाच पाहिजे. जे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे ते बोलण्यास व ते नाहीसे करण्यास झटणे हे प्रत्येक सुजाण व देशप्रेमी माणसाचे कर्तव्यकर्म होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel