या पत्रावरून कौन्सिलमध्ये जाण्याने आपल्या आवडीच्या देशकार्यास आपणांस वाहून घेता यावे हा पवित्र हेतू गोखल्यांच्या मनात होता हे उघड होते. आपल्यावरील कलंक नाहीसा होऊन, आपल्या नि:पक्षपातपणे व जबाबदारपणे काम करण्याच्या पध्दतीने अग्लो इंडियन व इंग्लंडमधील लोक यांचा आपल्यावर विश्वास बसेल; आपला शब्द ते शांतपणे ऐकतील त्याचा विचार करितील; हुटहुट करणार नाहीत असे गोखल्यांस वाटत होते.

या पत्रात दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती ही की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बंधनातून पार पडल्यावर आपले शेष आयुष्य देशसेवेत खर्च करावयाचे त्यांनी ठरविले होते. या गोष्टीस गोपाळरावांची घरची परिस्थितीही हातभार लाविती झाली. सोसायटीच्या कामाचे ओझे आणि रानडयांची शिकवणूक या गोष्टीमुळे त्यांस प्रपंचाकडे फारसे लक्ष देण्यास सवड नसे. त्यांच्या द्वितीय विवाहानंतर ते पुण्यास सहकुटुंब राहात असत हे मागे सांगितलेच आहे. बाहेरच्या व्यापामुळे घरी मीठमिरचीपासून लक्ष देण्यास जरी त्यांस फावत नसले तरी ते उदासीन नसत. गोखल्यांचे मृदू हृदय ज्यास म्हणून माहीत आहे त्यास असे कधीही वाटणार नाही. १८९१ साली त्यांना पहिला मुलगा झाला. परंतु हे फूल जो चिंतेने खंगले नाही, काळजीने काळवंडले नाही तोच काळाने परमेश्वरास नेऊन दिले. कॉलरिच या प्रतिभावान कवीने असल्याच एका प्रसंगावर एकच श्लोक लिहिला आहे परंतु तो किती सुंदर व भावनापूर्ण आहे!

“Ere sin could blight or sorrow fade,
Death came with friendly care;
The  opening bud to Heaven  conveyed
And bade it blossom there.”

गोखल्यांच्या हृदयास चरका बसला. पुढे १८९३ मध्ये शके १८१५ भाद्रपद शु. प्रतिपदेस त्यांची वडील मुलगी काशीबाई हिचा जन्म झाला. या मुलीबद्दल ते फार काळजी बाळगीत. मूल हिंडते फिरते होईपर्यंत जास्त जपावे लागते. खोकला, आकडी, डबा इत्यादी रोगांना मुले फार बळी पडतात. घरी आले रे आले की मुलगी कशी आहे याची ते चवकशी करावयाचे. सर्व नीट कुशल आहे असे समजले की, त्यांचा जीव खाली पडावयाचा. परंतु काशी वर्षाची होत आहे, बोबडे शब्द बोलू लागून आईबापांस सुखवीत आहे, चालू लागून दुडदुड धावून सर्वांस आनंद देणार, तो तिला कठीण दुखणे आले. तो मुदतीचा ताप होता. घरातल्या सर्व मंडळींच्या तोंडचे पाणी पळाले. मुलगी हाती कशी लागते याविषयी सर्व माणसे चिंतातुर झाली. परंतु दैवाने खैर केली. ईश्वराने कठीण प्रसंग येऊ दिला नाही. काशीबाई बरी झाली. ती बरी होईपर्यंत गोखल्यांचे चित्त ठिकाणावर नव्हते. ते क्षणक्षणां माडीवरून खाली यावयाचे, पाहावयाचे व सुस्कारा टाकून माघारी जावयाचे. पहिले अपत्य गेलेले आणि दुस-या मुलीवर तोच प्रसंग आलेला. या विचाराने आईबापांच्या हृदयाचे कसे पाणी पाणी होते याची कल्पना इतरांस काय होणार? मुलगी बरी झाल्यावर गोपाळरावांचा आनंद गगनात मावेना. त्यांची दुसरी मुलगी गोदूबाई ही पहिल्यापासूनच अशक्त होती. ती गोखले निवर्तल्यावर फार दिवस जगली नाही. गोखल्यांची आई याच सुमारास म्हणजे १८९३-९४ साली हा लोक सोडून गेली. या माउलीची पतिनिष्ठा आम्ही प्रथमारंभी सांगितलीच आहे. ते आपल्या वडिलांचे धोतर गोपाळरावांनीही जपून ठेवले होते. आईविषयी गोपाळरावांस फारच आदर व भक्ती वाटे. ज्या वाडयात आई निवर्तली त्या भाटवडेकरांच्या वाडयात गोखले जेव्हा जेव्हा जात, तेव्हा तेव्हा आपल्या आईच्या मृत्यूच्या खोलीत जाऊन ते साष्टांग नमस्कार घालीत. केवढी ही मातृभक्ती! अशी मातृभक्ती अलीकडे किती विवाहित तरुणांमध्ये असते! अशी मातृभक्ती अलीकडे किती विवाहित तरुणांमध्ये असते? वडील माणसांबद्दल आदर त्यांच्या मनात फार असे आणि अलीकडे दुर्मिळ होणारा हा गुण गोपाळरावांमध्ये मरेपर्यंत कायम होता.

१९०० मध्ये गोपाळरावांचे द्वितीय कुटुंब निवर्तले. संसारातील जबरदस्त ओढा नाहीसा झाला. तोडावयास कठीण अशी ग्रंथी आपोआप तुटली. संसारामधील माया आपण सोडू म्हणता सोडता येत नाही. समर्थांचे ''चपलपण मनाचे मोडिता मोडवेना! कठीण  स्वजनमाया तोडिता तोडवेना'' हे शब्द किती सत्य आहेत! गोपाळरावांनी मेथांस पत्र लिहिले त्या वेळेस त्यांची पत्नी इहलोक सोडून गेली होती. त्यांचे गुरू रानडे मृत्युशय्येवर होते. अशा प्रसंगी गोपाळरावांच्या मनात कोणते विचार खेळत होते? गोपाळकृष्णाने यशोदेला ज्याप्रमाणे विश्वरूपदर्शन घडविले त्याप्रमाणे येथे या गोपाळ कृष्णाला रानडे, आगरकर यांच्या सहवासाने विश्व दिसू लागले होते. छोटा संसार डोळयांपुढे न येता देशाचा संसार दिसू लागला. आपलीच मुले डोळयांसमोर न खेळता देशातील अजाण मुले खेळू लागली. देशासाठी शेष आयुष्य घालवावे, फकिरी पतकरावी असे ते मनांत म्हणू लागले. फर्ग्युसन कॉलेजमधील मुदतही संपत आली होती. कॉलेजमधून तीस रुपयांचे पेन्शन मिळणार होते आणि गणिताच्या पुस्तकाबद्दल त्यांस महिना १००-१२५ रुपये मिळत असत. या पैशावर त्यांचे व कुटुंबातील मंडळीचे भागणार होते. तेव्हा तीही कटकट नव्हती. मेथांच्या राजीनाम्यामुळे १८९७ पासून मनात येणार विचार बळावले. नि:संगत्वाची त्यांनी तयारी केली आणि लंबकाप्रमाणे आशानिराशांच्या लाटांवर मन हेलकावत असता त्यांनी फेरोजशहांस पत्र लिहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel