गोखल्यांची आफ्रिकेतील कामगिरी

आफ्रिकेतील चळवळ महात्मा गांधी या थोर पुरुषाच्या नेतृत्वाखाली चालू होती. १९१० च्या फेब्रुवारी महिन्यात मुदतबंदीची चळवळ बंद करण्याचे गोखल्यांचे बिल पास झाले होते. इंग्लंडमध्ये दक्षिण आफ्रिकन कमिटी व लॉर्ड अ‍ॅम्प्टहिल यांनी जोराची चळवळ केली. परंतु आफ्रिकेत याचा काही एक दृश्य परिणाम झाला नाही. १८९६ पासून गांधी ब्रिटिश आफ्रिकेत होते. ते आपल्या असहाय लोकांसाठी झगडत होते. आम्ही मनुष्ये आहो, ब्रिटिश साम्राज्यात आम्हांस सर्वत्र हक्क पाहिजेत यासाठी ते भांडत होते. अगदी समान हक्क न मिळाले तरी अपमानास्पद कायदे रद्द झालेच पाहिजेत असे त्यांचे म्हणणे होते. वार्षिक तीन पौडांची डोईपट्टी म्हणजे तर मजुरांवर केलेल्या क्रूरपणाची कमाल झाली. हिंदी लोकांस विवक्षित जागेतच राहावे लागावयाचे. अशा एक ना दोन शेकडो दु:खकारक गोष्टी होत्या. अनंत यातना गोरे लोक हिंदी लोकास देत होते, गांधीच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह पुकारण्यात आला. हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. हिंदुस्तानचे तोंड सात्त्वि तेजाने तळपू लागले. या सत्याग्रहात बायाबापड्यांनी सुध्दा जे धैर्य दाखविले ते पाहून आपण तोंडात बोटेच घातली पाहिजेत. नेता जर योग्य व अत्यंत स्वार्थत्यागी असेल तर तो वानरांकडून लंका सर करील असे म्हणतात ते काही खोटे नव्हे. हिंदी लोकांचा स्वार्थत्याग व सहनशक्ती ही कसोटीस लागली. छळाचा कळस झाला, परंतु हिंदूंची कीर्ती शिगेस पोचली. कृष्णकृत्ये करणा-या गो-या लोकांस कलंक लागला. या सुमारास गोखल्यांस आफ्रिकेत येण्याची गांधींनी विनंती केली. बादशहा हिंदुस्तानात गेले होते. पूर्वीचे विभागणीचे शल्य त्यांनी काढून टाकले. साम्राज्योत्सव चालला होता. अशा प्रसंगी सरकार व प्रज्ञा या दोघांच्या विश्वासातले गोखले यांस आफ्रिकेत बोलावून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा असे गांधींनी ठरवून गोखल्यांस आमंत्रण दिले. हिंदुस्तान-सरकारने गोखल्यांस शिष्टाईसाठी जाण्यास विनंती केली. गोखले निघाले. त्यांचे काही मित्र त्यांस सांगत होते की, आपण जाऊ नये; परंतु गोपाळराव निघाले. प्रथम बोटीवर पाय ठेवताच त्यांस कटू अनुभव आला. साऊथ आफ्रिकन सरकार आपणास शिष्टाचाराप्रमाणे वागवील या अटीवर ते जाण्यास निघाले होते. आफ्रिकेकडे जाण-या बोटीवर विशेषत: एशियाटिक घ्यावयाचे नाहीत असा कटाक्ष असे. त्याशिवाय पहिल्या वर्गातून प्रवास करावयाचा झाल्यास, त्यांस एकीकडे एक स्वतंत्र खोली मिळावयाची आणि सर्व खोलीचे भाडे त्यांच्याजवळून उकळावयाचे. अशा रीतीने पुष्कळ हिंदी लोकांस आजपर्यंत त्रास होत असे. गोपाळरावांस ही गोष्ट कळविण्यात आली. 'एकच तिकीट घेऊन प्रवास करण्याचा कायदेशीर हक्क मला आहे. सर्व केबिनचे भाडे मी साफ देणार नाही आणि जर मार्गावर न याल तर मला कायदेशीर इलाज करावा लागेल' असे गोखल्यांनी स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच एकाच तिकिटावर प्रवास करण्यास परव ना मिळाला. आगबोटीवर खाण्यापिण्याच्या बाबतीतही एशियाटिकांस अंत्यजांप्रमाणे वागवितात, असे गोपाळरावांनी ऐकले होते. आपल्यासही हाच अनुभव येईल असे गोखल्यांस वाटले. परंतु यक्षिणीच्या कांडीप्रमाणे सर्व गाडे उलचले. नरकाचा स्वर्ग झाला, सर्पाचा हार झाला. जेव्हा गोखल्यांनी आपली जेवणाची जागा कोठे आहे अशी चवकशी केली तेव्हा त्यांस असे आढळून आले की, त्यांची जागा खुद्द कप्तानाच्या जागेशेजारी ठेविलेली! असा मान कोणासही मिळत नसतो. या मानदानामुळे गोखल्यांची वाहवा होऊ लागली. युरोपिअन स्त्री-पुरुषांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. आता त्यांचा एकंदर प्रवास सुखाचा झाला. २२ आक्टोबर १९१२ रोजी ते केपटौन येथे उतरले.  युनियन सरकारचे खुद्द सेक्रेटरी जातीने त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. गोखल्यांचे एकाद्या स्वतंत्र राष्ट्राच्या बकिलाप्रमाणे स्वागत झाले. एक सेक्रेटरी, एक आचारी, एक स्पेशल सलून सर्व काही त्यांस पुरविण्यात आले. कोठेही उणे पडू दिले नाही. गोखल्यांस मोहजालात पकडण्याची ही शक्कल होती काय? एशियाटिक लोकांनी आपल्या प्रतिनिधीचे हे स्वागत पाहून हर्षाने नाचण्यास आरंभ केला. त्यांस स्वर्ग दोन बोटे उरला. आपल्या पुढा-याचे असे स्वागत होईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. क्षणभर स्वत:च्या दु:खाचा त्यांस विसर पडला. परंतु गांधींनी 'बोटे चाटू नका. मिटक्या मारू नका' असे त्यांच्या कानात सांगितले. गोखले आफ्रिकेत तीन आठवडे होते. सर्व प्रांतभर ते हिंडले, प्रत्येक महत्त्वाच्या शहरी जाऊन त्यांनी व्याख्याने दिली. संपूर्ण स्थिती डोळ्यांनी पाहिली. प्रत्येक शहरी त्यांस मोठ्या मानाने वागविण्यात आले. प्रत्येक सभेस गावचा 'मेयर' अध्यक्ष असावयाचा. हिंदी लोकांनी तर त्यांस बहुमोल करंडकातून मानपत्रे अर्पण केली; गोखल्यांच्या बरोबर महात्मा गांधी हे त्यांचे खासगी चिटणीस म्हणून हिंडत होते. त्यांच्या कोटपाटलुणींची, इस्तरीची  वगैरे सर्व व्यवस्था ते जातीने पाहात. गोखल्यांच्या प्रत्येक गरजेची ते काळजीपूर्वक व्यवस्था करीत होते.  गोखल्यांस प्रत्येक गरजेची ते काळजीपूर्वक व्यवस्था करीत होते. गोखल्यांस तेथील परिस्थितीचा पूर्ण विचार करता यावा म्हणून त्यांस सर्व सोयी युनियन सरकारने करून दिल्या होत्या. कोठेही आडकाठी नव्हती. एके दिवशी  महत्त्वाचे भाषण त्यांस करावयाचे होते. सर्व प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला होता. भाषण करण्याच्या आदल्या दिवशी रात्री १२-२ वाजेपर्यंत ते लिहीत बसले होते. भाषणातील एक शब्द बदलून दुसरा घालीत; प्रत्येक शब्द त्यांनी तोलून घातला. डोळे फाडफाडून  पाहूनही दुस-यास त्यात नाव ठेवता येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. दोघांची मने राखण्याचे अत्यंत नाजूक व जबाबदारीचे काम त्यांस करावयाचे होते. दक्षिण आफ्रिकन सरकार गोखल्यांच्या तैनातीस हजर होते. गोखलेही साम्राज्य- मुत्सद्दयास साजेल अशाच ऐटीने व रुबाबाने वागले. प्रिटोरिया येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर गोखल्यांनी मोठ्या जबाबदारपणे शिष्टाई केली. त्या वेळेस हा डोईपट्टीचा कर आम्ही काढून टाकतो असे त्यांस निश्चयेकरून सांगण्यात आले. दर्बानच्या मेजवानीच्या प्रसंगी त्याचप्रमाणे 'चेंबर ऑफ कॉमर्स' सभेपुढे त्यांस वचने देण्यात आली. त्यांच्याशी सर्व लोक सहानुभूतीने बोलले, चालले. मुलाखती झाल्या, संभाषणे झाली; आणि सर्वत्र गोखल्यास 'तीन पौंडाचा कर' रद्द करण्याची वचने मिळाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel