रानडयांच्या सहवासात केवळ राजनीतीचे ज्ञान, अर्थशास्त्राचे अध्ययन, देशाविषयी विचार करण्याची नवीन पध्दती येवढेच त्यांस मिळाले असे नाही तर सर्व गोष्टींस, सर्व गुणांस शिरोबूत जे शील त्यांचेही स्वरूप त्यांस कळले.  रानडयांसारखा आत्मनिरीक्षण करणारा दुसरा पुढारी म्हणजे महात्मा गांधी. दुसरा आपणांस उगीच नांवे ठेवणार नाही; तो ज्या अर्थी आपल्यास नांवे ठेवतो आहे त्या अर्थी आपल्यामध्येच उणिवा असल्या पाहिजेत; त्यांचा आपण तलास केला पाहिजे आणि त्या नाहीशा करणे हे आपले प्रथम कर्तव्य होय. दुस-याने नावे ठेविली म्हणून त्याच्यावर जळफळून उपयोग नाही. रानडे हे एकनाथांप्रमाणे खरोखर शांतिसागर होते. गोखले हे स्वभावात: उतावळे, भावनावश, संतापी असे होते. त्यांस लवकर राग येत असे. आपले म्हणणे दुस-याने ऐकले नाही म्हणजे त्यांस संताप यावयाचा. टीकेने तर ते मृतप्राय व्हावयाचे. कठोर टीका सहन करणारे त्यांचे मन नव्हते. ते करपून जात असे. परंतु रानडयांचे मूर्तिमंत शांतीचे स्वरूप पाहून गोपाळरावांचा स्वभाव पालटत चालला. रानडे हे आपली स्तुती कधी पाहावयाचे नाहीत तर ज्यात   आपली निंदा, टवाळकी, हेटाळणी असेल ते आधी पाहावयाचे. मर्मी झोंबणारी टीका असली तरी आपला गुरू किती गंभीर असतो हे गोखल्यांनी अनेक वेळा पाहिले. अपमान झाले तरी ते मनात गिळून पुन: शांत समुद्रासारखा दिसणारा रानडयांचा चेहरा गोखल्यांच्य हळुवार व गुणग्राही मनावर परिणाम केल्याविना कसा राहील? गोपाळरावही टीकेस  न भिता आपले कार्य चालू ठेवण्यास शिकू लागले. रानडयांनी 'आपणांसारिखे करिती तात्काळ । नाही काळ वेळ तयांलागी ।' हे खरे करून दाखविले. रानडयांसारखा योग्य वाटाडया मिळाल्यामुळे गोपाळराव पुढे सरकले. योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे किती जणांच्या श्रमांचे, बुध्दीचे, उत्साहाचे व तारुण्यातील 'आम्ही काही तरी करून दाखवू' या जोमाने, मातेरे झाले असेल? समुद्राच्या तळाशी कित्येक मोती रुतलेली असतील, परंतु पाणबुडयाने काही मोती वर काढून राजास अर्पण केली म्हणजे तीच तेवढी राजाच्या वक्ष:स्थलावर रूळू लागतात त्याप्रमाणे देशातील उमलती फुले जमा करून त्यांना लागलेली कीड नाहीशी करून ती टवटवीत फुले देशमातेच्या केसांत गुंफणारा कोणी तरी चतुर मालाकार लागतो. या मालाकाराच्या अभावी किती तरी फुले सुकली असतील, किडीने खाल्ली असतील, परंतु गोपाळरावांचे भाग्य थोर म्हणून हृदयातील गुप्त विचार जागे करणारा गुरू त्यांस मिळाला! तुमच्यामध्ये- तुमच्या अंत:करणाच्या व डोक्याच्या खाणीत अनेक रत्ने आहेत, ही कल्पना आणून देणारा गुरू गोखल्यांस लाभला. आपण मनांत आणू तर ही रत्ने देशांस अर्पण करू असे गोखल्यांस वाटले. परंतु सर्वांचेच असे थोर नशीब नसते. देवाच्या लाडक्या मुलांसच सदगुरू प्राप्त होण्याइतके भाग्य लाभते; असो.

१८९० मध्ये राष्ट्रीय सभा कलकत्त्यात भरली होती. या सभेमध्ये गोखल्यांनी एक लहानच पण चटकदार आणि मुद्देसुद भाषण केले. प्राप्तीचा कर ज्या परिस्थितीत निर्माण करण्यात आला होता, ती परिस्थिती इतउत्तर नसल्यामुळे हा कर रद्द व्हावा, यावर गोपाळराव बोलले होते. हे भाषण सर्वांस आवडले. गोखले अद्याप लहान- २४ वर्षांचे होेते.  राजकारणाच्या क्षितिजावर हा नवीन तेजोमय तारा उदय पावत आहे- हा पुढे मोठा मुत्सद्दी होईल असे उद्गर त्यांच्यासंबंधी ऐकण्यात येऊ लागले. गोपाळरावांसही धन्यता वाटली. हळूहळू गोपाळराव देशाच्या कारभारात लक्ष घालू लागले. १८९१ च्या नागपूरच्या सभेतही त्यांनी भाषण केले. जे काय आपणांस बोलावयाचे असेल ते आधी समर्पक लिहून काढून मगच ते बोलत. जबाबदारपणे काम करण्यास प्रथम अशीच शिस्त लावून घ्यावी लागते. गोपाळरावांस ही शिस्त उत्तम लागली आणि ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. भाषा कशी असावी, विचार कसे असावेत याचाही रानडयांजवळ त्यांनी अभ्यास केलाच होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel