उत्तरार्ध

सुरत- काँग्रेसनंतर

पूर्वार्धामध्ये गोखल्यांचे चरित्र सुरतच्या काँग्रेसपर्यंत आले, तो प्रसंग अखिल हिंदुस्तानच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा होता. राष्ट्रीय व प्रागतिक या पक्षातील भांडणे विकोपास जाऊन जोडेफेकीपर्यंत पाळी आली. अशा रीतीने काँग्रेस उधळून लावण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या अधिका-यांनी हे प्रागतिक पक्षाचे होते- काँग्रेसच्या भोवती क्रीडचे कुंपण घालून राष्ट्रीय पक्षाला मज्जाव केला. त्यामुळे राष्ट्रीय सभा सर्वस्वी प्रागतिकांच्या हाती गेली. दोन्ही पक्षांच्या  दृष्टीने हा प्रसंग फार महत्त्वाचा होता. एका पक्षाचे पुढारी लोकमान्य टिळक व दुस-या पक्षातील पुढारी नामदार गोखले या दोघांच्याही चरित्राला येथून वेगळे वळण लागले. एकाच्या कर्तबगारीला, देशसेवेला, राजकीय चरित्राला सहा वर्षे तुरुंगात गाडून टाकल्यामुळे आधीच विस्तार पावत असलेल्या दुस-याच्या राजकीय कर्तबगारीला पूर्ण अवसर मिळून तिच्या विस्ताराला मर्यादाच राहिली नाही.

सुरतच्या भाऊबंदकीनंतरच्या उभ्या वर्षात गोखल्यांना एका क्षणाचीही फुरसत मिळाली नाही. मेथांच्या बाबतीत मुंबई कॉर्पोरेशनमध्ये झालेल्या प्रसंगी अध्यक्ष झाल्यावर ते काही दिवस विश्रांती घेण्यासाठी महाबळेश्वरी जाणार होते. परंतु मैमनसिंगकडे गडबड उडाल्यामुळे त्यांस तिकडे जाणे भाग पडले. त्यानंतर काँग्रेससाठी त्यांना फार श्रम करावे लागले.

मध्यंतरी सिमल्यास जाऊन त्यांस सभाबंदीच्या कायद्यास विरोध करावा लागला. १९०७ साल तर संपले, १९०८ साल उजाडले. मार्च महिन्यात ते कौन्सिलच्या कामाकरिता निघून गेले. अद्यापपर्यंत मोठे लष्कर ठेवण्यास रशियाची भीती हे कारण दाखविण्यात येत असे. ती तर आता निघून गेली होती. परंतु देशात असंतोष माजला आहे, लोक नाना प्रकारच्या गोष्टी सांगताहेत, अशा वेळी सैन्य कमी करणे वेडेपणा आहे, असे आता कांगावखोर व निमित्तावरच टेकलेल्या सरकारचे म्हणणे पडले. यास गोखल्यांनी विरोध केला. शिक्षणाच्या बाबतीत सरकार अस्वलासारखे कसे सुस्त पडले आहे, सरकारला अद्याप जाणीव का होत नाही याचा खुलासा त्यांनी विचारला. संस्थानिकांनी सुध्दा आपापल्या चिमुकल्या संस्थानांत शिक्षण सक्तीचे केले आणि सरकारला लाजविले, परंतु सरकारास लाज असेल तर ना लाज वाटणार! इंग्लंडमधून येथे येताना सर्व लाज 'समुद्रास्तृप्यन्तु' करून मग हे देव मुंबापुरीच्या किना-यावर उतरतात. त्याचप्रमाणे धंदेशिक्षण, कलाशिक्षण देण्यात तर आमचे सरकार गोगलगाईच्या गतीने सुध्दा चालत नाही. ते स्थिर राहून पैसा कोठे आहे असे विचारते. गोखले म्हणतात, 'My lord, I repeat, the money is there or can be found without difficult. Only the will has to be there and then we shall not be found merely discussing the difficulties of the problem.' नंतर त्यांनी शेतक-यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणास आळा घालण्याचे उपाय सुचविण्यास व ते ताबडतोब अंमलात आणण्यास सांगितले. सरतेशेवटी देशातील वाढत्या संतापाकडे ते वळले. सर्व सुशिक्षित लोक हळूहळू निराश होत जाऊन ब्रिटिश राज्यातील व्यवस्था त्यांस मरणप्राय वाटेल. 'But, sooner or later, mere order is bound to appear irksome to those who zealously cultivate the belief that there is no chance of better days for their country as long as existing arrangements continue.' मोर्लेसाहेबांस न साजेशा त्यांच्या अंदाजपत्रकावरील भाषणाचा निराशेने गोखल्यांनी उल्लेख केला. इंग्लिशांवरील भक्ती, श्रध्दा, निष्ठा यांस मूठमाती देण्यात येत आहे; असे असता ज्या काही सुधारणा द्यावयाच्या असतील त्या त्वरित द्या. त्या उदार भावाने द्या. लोकास असे वाटू द्या की, ''The people must be enabled to feel that their interests are, if not the only consideration, at any rate the main consideration that weighs with the Government and this can only be brought about by a radical change in the spirit of administration.'' यानंतर शेवटची सूचना त्यांनी दिली ती अशी - ''My lord, let not the words too late be written on every one of the reforms. For while the Government stands considering hesitating, receding, debating within itself 'to grant or not to grant, that is the question'- opportunities rush past it which can never be recalled. And the moving finger writes and having writ, moves on!''

याच वर्षी प्रेस अ‍ॅक्ट पास झाला. सर सत्येंद्र प्रसन्न सिंह यांनी हा कायदा पुढे मांडला; कारण ते 'लॉ मेंबर होते. या अ‍ॅक्टला गोपाळरावांनी संमती दिली याचे पुष्कळांस आश्चर्य वाटले व वाटेल. परंतु सरकारने पुढे मांडलेला भरभक्कम पुरावा व सर्व वृत्तपत्रांतील ज्वलज्जहांल लेख वाचून गोखल्यांवर नैतिक जबाबदारी पडली आणि सरकारविरुध्द असे लिहिणे केव्हाही अन्यायाचे आहे असे त्यांस वाटले. कोणत्या तोंडाने विरोध करू असे त्यांस झाले. गोपाळरावांचे हे करणे मेथांना आवडले नाही. जेव्हा गोपाळरावांनी आपण कशा परिस्थितीत संमती दिली हे सांगितले तेव्हा मेथा म्हणाले, 'तुम्ही कायद्याला रुकार किंवा नकार काहीच द्यावयाचे नव्हते. तुम्ही स्वस्थ राहावयाचे. सरकारला तुमची फूस आहे असे जनतेस वाटते. आणि आपल्या कृत्याचे समर्थन सरकार करिते. आपल्या संमतीचा फायदा सरकार घेते, पंरतु आपल्या म्हणण्यात संमती देऊन सरकार कधी भलेपणा घेते काय? आपण जर एखादे गा-हाणे मांडले तर त्याचा कसा बोजवारा उडतो ते आपण पाहतोच. तेव्हा सरकारास आपले म्हणणे मनातून जरी न्याय वाटत असले तरी ते आपणांस निराश करते, त्याप्रमाणे आपणही सरकारास वागविले पाहिजे.'' गोखल्यांचे काम नैतिक रीत्या समर्थनीय असेल, परंतु राजकारणदृष्टया चुकीचे ठरले. या मख्या, खाचाखोचा, टिळक, मेथा हेच जाणत. गोखले हे साधेसीधे. या साधेपणाचेच हे एक मासलेवाईक उदाहरण आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel