आपल्या पाठीमागे जोर नाही याची गोखल्यांस पूर्ण जाणीव होती. उगीच मोठमोठे विचार मांडण्यात काय अर्थ आहे? सध्या आपण त्यांस विनंत्या करू. या विनंत्या करीत असताना देशप्रेमाचा खुराक खाऊन धष्टपुष्ट होऊन मग दरडावले तर त्यात काही तरी अर्थ आहे. गोखले सुध्दा मतांनी जहालच होते. नेव्हिन्सन म्हणतो :- 'For himself, I discovered many months afterwards that Mr. Gokhale hated the name of Moderate, as I suppose, all beings of flesh and blood needs must.' परंतु लोकांची तयारी नाही म्हणून ते जहाल झाले नाहीत. करबंदी करण्यासारखी चळवळ सुध्दा हाती घेण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. परंतु १९२२ साली गांधींस जर बार्डोलीचा कार्यक्रम थांबवावा लागतो तर १९०७ साली गोखल्यांस ते किती अशक्य दिसले असेल? म्हणून ते लोकांस हळूहळू तात्त्विकरीत्या शिकवीत होते. परंतु जनता विकारवश असते. हा हळूवारपणा तिला आवडत नाही. तिला त्याचा कंटाळा येतो. तिला चवताळवून मग चुचकारले पाहिजे. टिळकांनी प्रथम चवताळविले, परंतु सावरकरांसारख्या अत्यंत देशभक्तीने प्रेरित झालेल्या रत्नांस आवरण्यासही ते तयार होते. हे त्यांनी आपल्या मतांच्या केलेल्या खुलाशावरून दिसून येईल. सुशिक्षित लोक आणि अशिक्षित लोक यांस कार्यक्षम आणि देशप्रेमी बनविण्यास निरनिराळे मार्ग लागतात. एकच मार्ग सर्वत्र उपयोगी पडत नाही. जो गाढ निजला आहे त्याच्या कानात पाणी घालावे लागते; जो गुंगीत आहे त्याला हलवले, हाका मारल्या की तो जागा होतो. टिळक व गोखले दोघांच्याही बोलण्यात अर्थ आहे. दोघे परस्परपूरक आहेत. प्रत्येक देशात पारतंत्र्याच्या पंकांत पिचत पडलेल्या प्रत्येक राष्ट्रात अशा प्रकारचे दोन पक्ष नेहमी असतात. आयर्लंड, इजिप्त, कोरिया या देशांत असे दोन पक्ष आपणास दिसून येतात. एक पक्ष सरकारशी शक्य तितके मिळते घेऊन गोडीगुलाबीने वागणारा असतो. सरकारकडून हळूहळू सुधारणा घडवून आणण्याचे त्याचे ध्येय असते. दुसरा पक्ष प्रखर प्रकृतीचा असतो; नि:सत्त्व करू पाहणा-या परकी सरकारचा त्यास संताप येतो. सरकारच्या कृष्ण-कृत्यांवर प्रकाश पाडून लोकांस जागृत करून तो सरकारास बजावतो, लोक प्रक्षुब्ध झाले आहेत, त्यांची मने जर शांत करावयाची असतील तर ताबडतोब त्यांची दु:खे दूर करा. ही दु:खे दूर करण्यासाठी अधिकारी प्रजेच्या हुकमतीखाली पाहिजेत. एकादा अधिकारी वाईट असला तर त्यास हुसकून लावण्याचे सामर्थ्य प्रजेत असले पाहिजे. राजा, राज्य, प्रजेसाठी असते. तेव्हा सरकारने दडपेगिरीचे धोरण जर चालू ठेवले तर लोकांनी स्वस्थ बसू नये; बसता कामा नये. हा आत्मघातकीपणाचा मार्ग आहे. आत्महत्यारा होणे केव्हाही नाशासच नेणार.

दादाभाईंची कामगिरी इंग्लंडमध्ये झाली. रानड्यांनी सुशिक्षितांस हातांशी धरून सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून आयुष्य खर्च केले. सर्वत्र नेमस्तपणा त्यांनी शिकविला. सामाजिक, राजकीय, धार्मिक, कोणतीही बाब असो, त्या त्या बाबतीत लोकांशी आणि सरकारशी तुटकपणे न वागता, परंतु आपली मते व ध्येय सुध्दा न सोडता आस्तेकदम पण चिरस्थायी प्रगती करून घ्यावी असे त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे. डेक्कन सभा स्थापन करताना तिचे ध्येय त्यांनी अशाच शब्दांत सांगितले आहे. ते लिहितात :- ''Liberalism and moderation will be the watch-word of this association. The spirit of liberalism implies a freedom from race and creed prejudices and a steady devotion to all. that seeks to do justice between man and man, giving to the rulers the loyalty that is due to the law they are bound to administer, but securing at the same time to the ruled the equality which is their right under the law. Moderation imposes the condition of never vainly aspiring after the impossible or after too remote ideals, but striving each day to take the next step in the order of natural growth by doing the work that lies the nearest to our hands in a spirit of compromise and fairness.'' रानड्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे गोखले. पण ते मनांतून जहाल होते असेच आम्हांस दिसते. त्यांनी रानड्यांच्याच सनदशीर मार्गाने पुढे पाऊल टाकले. परंतु रानड्यांच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात त्यांस राजकीय चळवळ करता आली. मेथा यांनी कौन्सिलात लोकपक्षाच्या पुढा-याने काम कोणत्या पध्दतीने करावे  हे शिकविले. नमून न वागता, स्वाभिमानाने व देशहितैक दृष्टीने सरकारच्या बेमुर्वतखोर वर्तनास ताबडतोब जेथल्या तेथे आळा घालण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारवर टीका करण्यास न भिणे हे गुण लोकप्रतिनिधींच्या अंगात असले पाहिजेत असे मेथांनी स्वत:च्या आचरणाने दाखविले; याच त्यांच्या प्रकारामुळे त्यास कौन्सिलमध्ये 'New Spirit' नवीन जोम उत्पन्न करणारा,  नवीन वारे भरणारा, असा सरकारी अधिका-यांकडून किताब मिळाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel