स्वार्थत्याग व देशभक्ती यात खाली वर कोणीही नाही. टिळक- गोखले हे या बाबतीत एकाच सिंहासनावर आहेत. टिळकांच्या विषयी दावरसारख्या विक्षिप्तांनी काहीही उद्गार काढले तरी जनता त्यांस देशभक्तच समजेल. गोखल्यांची देशभक्ती अशीच जोज्वळ होती. ती दुसरा काय म्हणतो याची अपेक्षा करीत नसे; राहवत नसल्यामुळेच  हे देशभक्त झाले. फुशारकी मिरविण्यासाठी या वीरांनी देशभक्तीचा पेशा स्वीकारला नव्हता, तर ते हाडाचे- रक्ताचे देशभक्त होते. गोखल्यांस आता आपण देशसेवा सोडा असे मध्यप्रांतातील एका उतावळ्या व वेड्या गृहस्थाने सांगितले असता गोखले चवताळून म्हणाले, 'मी कोणाच्या हुकुमाने देशसेवेचे काम हाती घेतले नाही. आणि कोणाच्या हुकुमाने ते खालीही ठेवणार नाही. हे काही भाडोत्री काम नव्हे.' त्यांचा स्वार्थत्यागही असाच दांडगा होता. देश हाच 'In our humble opinion no one is entitled to call himself a patriot who holds anything (excepting his religion of course) dearer than his country,' गोखले हे सोज्वळ देशभक्त होते. हिंदुस्तानच्या अर्वाचीन इतिहासात दादाभाई, गोखले, टिळक व गांधी ही स्वार्थत्यागाची ठळक उदाहरणे आहेत. परंतु टिळक हे सरकारचे वैरी म्हणून त्यांच्यावर अनेक आपत्ती आल्या. त्यांनी जी प्रचंड जागृती करण्याचे कार्य केले ते एखाद्या 'सतीच्या वाणासारखे' त्यांनी मिरविले व त्यांच्या आपदांनी त्यांस जनतेने आपल्या हृदयात मनोमय पुष्पांनी पूजले आहे. यासाठीच गोखले म्हणाले की, 'स्वत: सोसलेल्या अनंत यातनांनी त्यांनी देशाची सेवा बजाविली. त्यांना आम्हांस दरडावण्याचा पूर्ण अधिकार आहे.'

टिळकांना आपले कार्य करताना चिकाटी, मनोधैर्य, बुध्दिमत्ता ही दाखवावी लागलीच, परंतु त्यांच्या जोडीला  बेमुर्वतपणा, बेदरकार वृत्ती, डावपेच, लपंडाव, अंत:करणाचा कठोरपणा, प्रतिस्पर्धास चीत करण्याची प्रवृत्ती या वृत्तींचाही त्यांस आश्रय करावा लागला. या बाबतीत गोखले व गांधी निराळे उमटून पडतात. गोखले राजकारणात अत्यंत सरळ! त्यांस डावपेचांची माहितीच नव्हती!! ते राजकारणातले साधू होते!!! हिंदुस्थान रिव्ह्यू म्हणतो :- 'A selfless man and stainless gentleman wise in counsel and vigorous in action, the Honourable Mr. Gokhale has raised patriotism to the dignity of religion in India, as they have so splendidly succeeded in doing in Japan, and his words, therefore, carry a weight which does not attach to the utterances of many other public men.'  गांधींनी गोखल्यांचाच संदेश सांगितला. तो हाच की:- 'We must spiritualize politics.' विसाव्या शतकात प्रेसिडेंट वुइल्सनसारखे सरळ व थोरवृत्तीचे पुरुष मागे पडून लॉइड जॉर्ज, पाँक्कारे यांसारखे कारस्थानपटूच आपणांस पुढे आलेले दिसतात. प्रत्यक्ष गोखल्यांच्या हातावर बोथांनी जरी तुरी दिल्या तरी त्यांस मात्र असे वाटले नाही की आपणही तसेच व्हावे. 'ठकासी व्हावे ठक । उध्दटासी उध्दट'- हे तत्त्व त्यांस आवडत नसे; त्यांच्या वृत्तीस ते रुचत नसे, त्यांस ते सहन होत नसे. 'वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा' असे जरी चाणक्याच्या अनुयायांस वाटले तरी आपणही तसेच होणे अनुचित होईल, असे त्यास वाटे. या दोघांची गोखले- गांधींची राजकारणातली दृष्टी अध्यात्मपर आहे. टिळक व्यवहाराकडे जास्त पाहणारे होते. वास्तविक दोन्ही प्रवृत्तींचा येथेही मिलाफ पाहिजे. सर्व जनतेच्या हिताकरिता लफंग्याशी लपंडाव केला तरी पुष्कळांचे पुष्कळ हित या न्यायाने ते क्षम्य आहे असे टिळक मानीत. गोखले- गांधी यांस स्वराज्यापेक्षा सत्य प्यारे तर टिळकांस सत्य असत्य केवळ सापेक्ष वाटत. तत्त्वज्ञान्यास हा सत्यासत्याचा भेद पोरकटच वाटणार. कारण या दोन्हींच्याहीवर तो तरंगत असतो. टिळक हे तत्त्वज्ञ होते. गांधी व गोखले साधू आहेत. हा स्वभावभेद आहे. हा संस्कृतीचा, शिक्षणाचा, कित्येक संस्कारांचा परिणाम आहे. सारांश काय, गोखले व टिळक हे परस्पर- पूरक होते, काहीच नको असे म्हणणा-यांपेक्षा गोखले पुढे होते. केवळ स्वातंत्र्यवादी लोकांस मार्गावर आणिले. तर केवळ आहे ते ठीक आहे असे म्हणणा-यांहून गोखलेपक्षाने पुढे उडी मारली. टिळक पक्षामुळे गोखले पक्षास सरकारशी झगडता आले; टिळकपक्षाचा बाऊ दाखवून त्यांस सरकारास धाक दाखविता येत नसे. निधनकालापर्यंत दोघेही एकाच ध्येयासाठी झगडले; एकाच कार्यात रंगले. अनेक संकटे सोसून, इच्छाशक्तीच्या जोरावर, देशाच्या दशदिशांत, लहानांपासून थोरांपर्यंत, राजकीय हक्कांविषयी, आपल्या साध्याविषयी व त्यासाठी कराव्या लागणा-या स्वार्थत्यागाविषयी लोकमान्यांनी न भूतो न भविष्यति अशी खळबळ केली. सर्व जनतेत राजकीय आकांक्षा स्थूलमानाने उत्पन्न करणा-यांत टिळक हेच पाहिले आहेत. सर्वसाधारण लोकांत त्यांच्याप्रमाणे जागृती अन्य कोणी केली नाही. लोकांसही टिळकांविषयी आपलेपणा वाटे. त्यांच्या झेंडयाखाली असताना कराल काळाचीही भीती कोणास वाटत नसे. कारण टिळकांनी एकदा ज्यास आपले म्हटले त्यास ते कधीही सोडावयाचे नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel