टिळकांस लोकांस असंतोष शिकवावा लागला. तुम्ही संतुष्ट कसे असे ते त्वेषाने जनतेला विचारीत. सरकार हे किती जुलमी, निर्दय बनले आहे पाहा असे सांगून ते सरकारची व या राज्ययंत्राची नामुष्की करीत, नाचक्की करीत. अर्थात या गोष्टीमुळे टिळकांवर सरकारचा रोष होई. मवाळांस ते काँग्रेसमध्ये नकोत असे वाटे; कारण आपणांवरील सरकारचा विश्वास उडेल असे त्यांस वाटे.  मेथा या मवाळाग्रणीने एकदा बामणगावकर प्रभृती व-हाडप्रांतीय मंडळी त्यांस भेटावयास गेली असता त्यांस टिळकांपासून आपण दूर का राहत होतो यातील इंगित सांगितले. ''तुमचे पुढारीपण स्वीकारावयाला टिळकच लायक, मी नाही; सुखाला सर्वस्वी दूर लोटून देशसेवा करण्याइतके तेज आमच्या अंगात नाही हे मी कबूल करतो. असे जरी आहे, तरी देशसेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. टिळकांसारखे लोक धैर्याने व त्यागाने परिस्थिती निर्माण करू शकतात. तर आम्ही लोक त्या परिस्थितीचा फायदा देशाच्या पदरात टाकतो. अशा रीतीने टिळकांचे व आमचे परिणामाच्या दृष्टीने सहकार्य सहज घडते. टिळकांनी निर्माण केलेल्या परिस्थितीचा फायदा राष्ट्राच्या पदरात आम्हास टाकता यावा म्हणूनच काँग्रेसही आम्हास पाहिजे. आम्ही ती टिळकांस देणार नाही. काँग्रेस जर आम्हांस नसली तर आमच्या अस्तित्त्वाला वाव नाही व आमच्यासारख्या सुखेच्छू पण देशाभिमानी लोकांचा राष्ट्रालाही फायदा होणार नाही.'' या मेथांच्या उत्तरावर त्यांस विचारण्यात आले. 'तुम्ही टिळकांस काँग्रेसबाह्य करता यामुळे सरकारला त्यांस चिरडण्याची संधी मिळते.' याचे उत्तर देताना मेथा म्हणाले, ''आम्ही टिळकांना काँग्रेसबाहेर ठेवतो म्हणून सरकार त्यांच्यावर कायद्याचे हत्यार उचलते ही गोष्ट सर्वस्वी चुकीची आहे असे मी म्हणत नाही. पण अशा प्रसंगी आम्ही सरकाराला मदत करता कामा नये. सरकारच्या दडपशाहीचे लोकांवर परिणाम होऊन प्रसंगी लोक तीव्र स्वरूप प्रकट करितात, ते नाहीसे व्हावे म्हणून आम्ही प्रयत्न करू लागलो, तर त्या प्रयत्नात आमच्याबरोबर सर्वस्वाचा नाश आहे. राजनिष्ठा व्यक्त करणे, टिळकांजवळून दूर राहणे, त्यांचे व आमचे पटत नाही असे तीव्रतेने सकारास भासविणे आणि आमचे म्हणणे सरकार मान्य करीत नाही म्हणून टिळकांचे विनाशक असे राजकारणाचे धोरण लोकप्रिय होते असे उठल्याबसल्या सरकारच्या कानीकपाळी ओरडणे येवढेच आमचे धोरण. हे धोरण जर आमच्याकडून शिस्तीने अमलात आले तर टिळकांना दडपून टाकण्याचे पाप करावयाला सरकारही धजणार नाही. अशा रीतीने एकाने परिस्थिती निर्माण करावयाची व दुस-याने तिच्यापासून निघेल तितका फायदा घ्यावयाचा असे झाले, तर देशाचे हित होईल. '' या मेथांच्या उत्तरावरून टिळकांच्या कार्याचे महत्त्व लोकांस पटेल. ना. गोखल्यांस कौन्सिलमध्ये ''परिस्थिती बिकट आहे; लोकांची मने बिथरत आहेत; ब्रिटिश राज्यपध्दतीवरचा विश्वास समूळ उडत चालला आहे; वेळीच शहाणे होऊन जनतेस हक्क द्या.'' असे कशाच्या जोरावर सांगता येत असे! इंग्लंडांत जाऊन जनतेच्या प्रक्षुब्धतेची हकीकत वर्णन करीत असताना कशाच्या पायावर, कशाच्या जोरावर गोखले हे बोलत असता? टिळकांनी व त्यांच्या पक्षाने निर्माण केलेल्या असंतोषाच्या परिस्थितीमुळेच की नाही? हा असंतोष जर जनतेत नसता; तर गोखल्यांच्या म्हणण्यास सरकारने काडीइतकेही महत्त्व दिले नसते. दुसरा जेव्हा चार पावले पुढे जात आहे असे सरकार पाहील तेव्हा ते एकच पाऊल पुढे जाऊ असे म्हणणा-या पक्षाच्या मागून येईल. राष्ट्रीय पक्ष होता, म्हणून नेमस्त पक्षास आपले मागणे मागण्यासाठी तोंड उघडावयास तरी जागा होती. तोंड उघडण्यासारखी परिस्थिती ज्याने निर्माण केली, ज्याने या परिस्थितीनिर्मितीनिमित्त गणपति- समारंभात होणारी प्रवचने व व्याख्याने, शिवजयंत्सुत्सवप्रसंगींची व्याख्याने, निरनिराळया वर्तमानपत्रांतून आणि विश्ववृत्तासारख्या मासिकातून येणारे लेख या सर्वाचे सूर जुळते करण्याचे व्यापक कार्य कुशल तानसेनाप्रमाणे अविच्छिन्न चालविले. बंगालमधील अरविंद, बिपिन बाबू अश्विनीकुमार यांसारख्या तडफदार व देशप्रेमाने भरून गेलेल्या तरुणांनी निर्माण केलेल्या पक्षाची महाराष्ट्रीय पक्षाशी संगती जुळवून नवीन जोमाचा राष्ट्रीय पक्ष निर्माण केला, त्यांनी काहीच विधायक काम केले नाही असे म्हणणे म्हणजे असमंजसपणा आहे.  एखादी संस्था निर्माण करणे किंवा एखादा कर कमी करून घेणे म्हणजेच विधायक काम असेल तर कोणास माहीत? स्वतंत्र संस्था न स्थापण्याचे कारण टिळकांनी सांगितलेले त्यांच्या आठवणीत आहे. ते म्हणतात, 'संस्था स्थापिली जाते, परंतु तदनंतर काही दिवसांनी परंपरा राखली जात नाही. ते काम नेटाने व स्वार्थत्यागपूर्वक होत नाही. केवळ नावाला संस्था राहते. समर्थांच्या मागून त्यांची गादी आहे. परंतु एखादा तरी कर्ता माणूस निघाला काय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel