गोखल्यांशी संवाद करून लॉर्ड अ‍ॅम्प्टहिल यांनी लॉर्डांच्या सभेत मोठे जोरदार भाषण केले, परंतु वसाहत- सरकार शिरजोर! त्यास या भाषणाने थोडीच आच पोचणार आहे? त्यास तंबी कोण देणार? गांधींनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मुदतबंदीची मुदत संपल्यानंतर तरी हिंदू मजुरांस स्वतंत्रपणे येथे राहावयास मिळाले पाहिजे. जे लोक  आजपर्यंत येथे आहेत त्यांचे हक्के हिरावून घेणे अन्याय्य होय. येथे हिंदू लोक थोडे तरी राहणारच. त्यांच्या मानसिक, नैतिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणेसाठी तुम्ही काडीचाही प्रयत्न न केल्यामुळे, हिंदुस्तानातून शिक्षक व धर्मोपदेशक येथे आणण्यास परवानगी पाहिजे. या मागण्या रास्त होत्या. परंतु युनियन सरकारच्या डोळ्यांवर संपत्तीचा व सामर्थ्याचा धूर चढलेला! कोणतीही मागणी त्यास पसंत झाली नाही. १३ जून १९१३ रोजी युनियन- सरकारने आपले नवीन बिल मूळ स्वरुपात पसार केले. आफ्रिकेतील या मदोन्मत मतंगजास ताळ्यावर-वठणीवर कोण आणणार? तो कोणास बधणार? आशियाटिक लोकांस आपल्या पायांखाली तुडवीत तो मोठ्या गर्वाने चालला होता.

शेवटी पुन; गांधींनी १२ सप्टेंबर १९१३ रोजी सत्याग्रहाचे शिंग फुंकले. १२ सप्टेंबर रोजी खाणीतील मजूर संप पुकारणार असे स्मट्स साहेबांस गांधींनी कळविले. लोकांचे थवेच्या थवे संप पुकारीत चालले. अंगभर धड वस्त्र नाही, पोटास गोळाभर अन्न नाही, अशा मजुरांची शांति-सेना न्यू कॅसल येथील मैदानावर तळ देऊन होती. गोखले हिंदुस्तानात जागृती करण्यासाठी ताबडतोब तेथील काम सोडून आले. त्यांनी गांधींस एक वर्षपर्यंत दरमहा ३०,००० रुपये पाठविण्याचे ठरविले होते. पहिल्या महिन्यास ही रक्कम भरपूर पाठविता आली नाही. परंतु गोखल्यांनी जंगजंग पछाडले आणि गांधींस पैशाची ददात भासू दिली नाही. सतत परिश्रमाने ३-४ लाख रुपये गोळा केले. केवढे हे लोकोत्तर कार्य! व्हाइसरॉयाची गाठ घेऊन गोखल्यांनी आपल्या कार्यास त्यांचीही सहानुभूती मिळविली. इकडे आफ्रिकेत गांधींस अटक झाली. त्यांच्या अटकेने नाताळांतील आणखी २०,००० लोकांनी संप पुकारला. सरकार गोंधळून गेले. गोळीबार होऊन कित्येक मजूर प्राणास मुकले. सत्याग्रहाच्या या प्रचंड व अपूर्व मोहिमेकडे हिंदुस्तानचे लक्ष वेधून राहिले होते. हिंदुस्तानचे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंज यांनी त्या वेळेस हिंदी लोकपक्षाचे जोमदार रीतीने समर्थन केले. मद्रास येथील आपल्या संस्मरणीय भाषणात (नोव्हेंबर २३, १९१३) स्पष्ट शब्दांत ते म्हणाले, 'जर वसाहत- सरकारास उजळ माथ्याने जगात व हिंदुस्तानासमोर वावरावयाचे असेल तर त्याने नि:पक्षपाती लोकांची एक कमिटी नेमावी. या चौकशी- कमिशनमध्ये हिंदी प्रतिनिधीही असावे. या कमिटीने अत्यंत जबाबदारपणे कसून चौकशी करून रिपोर्ट तयार करावा.' हार्डिज साहेबांच्या या सणसणीत कानउघाडणीचा युनियन सरकारास राग आला. त्यांनी त्या सरकारच्या कायद्यांस 'Invidious and unjust laws' असे म्हटले होते. पुष्कळ अ‍ॅग्लो इंडियनांना सुध्दा हार्डिंजची भाषा 'which admittedly was not very discreet' असे म्हणणे भाग पडले. अशाच शब्दांचा झाला तर काही उपयोग होतो व तसा तो झाला. गोखले व हार्डिंज यांमध्ये कित्येक दिवस तारातारी चालत होती. गोखले फसले गेल्यामुळे त्यांस या बाबतीत काय करू, काय न करू असे झाले होते. शेवटी ११ डिसेंबर १९१३ रोजी कमिटी नेमल्याचे जाहीर झाले. १९ डिसेंबर रोजी या कमिशनला सुरुवात झाली. गांधी, पोलक कालेनबेक वगैरे पुढा-यांस आता बंधमुक्त करण्यात आले. बंधमुक्त होताच गांधीनी जाहीर केले की कमिटीची रचना समाधानकारक नाही; तेव्हा तिच्यावर बहिष्कार घालणेच श्रेयस्कर होय. गोखल्यांनी गांधीस परोपरीने सांगितले की असे करू नका. परंतु गांधी व्यक्तीला भाळणारे नव्हते. 'तत्त्वाचा बंदा जीव, व्यक्तीला कोण विचारी?' हे सूत्र त्यांनी पूर्णपणे स्वत:स पटविले होते. व्यक्तीला ते अंतरी मान देत. गोखल्यांबद्दल गांधींना केवढा आदर वाटे! ते त्यांस आपले राजकीय गुरू मानीत आले. परंतु गुरुचे सांगणे आपल्या मनोवृत्तीस, सद्विवेकबुध्दीस पटत नसेल तर आपला दुसरा कार्यक्रम तडीस न्यावा असे तत्त्व भीष्माचार्यांपासून चालत आले आहे. गांधी गोखल्यांस लिहितात, 'तुमच्यासाठी प्राणत्याग करण्याची आमची तयारी आहे. परंतु या सालोमन कमिटीपुढे साक्ष देण्याचे काम मात्र आमच्या हातून होणार नाही.' सर बेंजामिन रॉबर्टसन यांस हिंदुस्तान सरकारने साक्ष द्यावयास पाठविले होते. त्यांना गांधींनी योग्य व जरूर ते सहाय्य दिले. यावेळी अ‍ॅड्रयूज आणि पिअर्सन हेही आफ्रिकेत गोपाळरावांच्या सांगण्यावरून आले होते. त्यांच्या आगमनाचा वातावरण शांत करण्याकडे बराच उपयोग झाला. सालोमन कमिटीने अखेर प्रत्येक मुद्दयावर गांधींच्यासारखाच निकाल दिला. यूनियन सरकारने सर्व शिफारशी मान्य करून ज. बोथा यांनी इंडियन रिलीफ ऍक्ट पास करून घेतला. तक्रारी आता तात्पुरत्या तरी संपल्या. आफ्रिकेतील लढा लढविण्यास गोखल्यांचे गांधींना किती सहाय्य झाले हे गांधींनी दक्षिण हिंदुस्थानात जेव्हा दौरा काढला तेव्हा ठिकठिकाणी सांगितले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel