मनुष्य जसा दुस-याजवळ वागत आला, त्याचप्रमाणे इतरांना आपल्याजवळ वागावे असे त्यांस वाटू लागते. गोखल्यांचे पुढे पुढे असे होई की जर कोणी त्यांचा सल्ला विचारावयास गेला तर त्याने त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. त्याच्यावर शंका घेणे मोठे कठीण असे. त्याचप्रमाणे अगदी शेतक-यापासून सर्वांस जसा टिळकांचा दरवाजा खुला असे तसे गोखल्यांचे नसे. सुशिक्षित, मोठ्या विचारी लोकांचेच त्यांच्याकडे येणे जाणे असे. ते इतरेजनांस जरा अधिकारानेच सर्व सांगावयाचे. हा एक प्रकारचा अवगुण होय. आपणास आता अनुभव आहे, दुस-यास शिकविण्याचा थोडा हक्क आहे, असे त्यांस साहजिकच वाटे; त्त्यात अहंकाराची छटा मुळीच नव्हती. त्याच्यात अहंकार नव्हता असे गांधी म्हणतात:- ' I was by the side of that saintly politician to the end of his life and I found no ego in him. I ask you if there is no ego in you. If he wanted to shine, he wanted to shine in the political field of his country; he did so not in order that he might gain public applause but in order that his country may gain. He developed every particular faculty in him not in order to win the praise of the world for himself but in order that his country may gain; he did not seek public fame, but they were showered upon him, they were thrust upon him; he wanted that his country may gain and that was his great inspiration. या उता-यावरून त्यांच्या अंगात अहंकार नव्हता असे दिसते, परंतु तो गांधींसारख्या थोर पुरुषांस दिसला नसला तरी पुष्कळांस दिसत असे, असे पुष्कळ लोक अनुभविल्याचे सांगतात. मोठ्या लोकांची दृष्टी चांगल्याकडेच असते. कारण सर्वगुणसंपन्न कोण असतो? जीवन म्हणजे काळ्या पांढ-या तंतूंचा पट आहे; आणि असे आहे म्हणूनच त्यास शोभा आहे. आणखी अशी गोष्ट असते की मोठ्या माणसांच्या मोठेपणाबरोबर, त्यांचे दोषही जग मोठे करून दाखविते. चंद्राच्या सुंदर व रमणीय प्रकाशवैभवाने त्याच्यावरचे डागही दिसतात. ता-यांचे तेज अल्प म्हणून, डागही दिसत नाहीत. गटे याचा चरित्रकार लीप्वेस म्हणतो, ' The Faults of a celebrated man are apt to carry an undue emphasis. They are thrown into stronger relief by the very splendour of his fame. His glory immortalises his shame.' असे असले तरी आपण गुणांकडेच दृष्टी वळविणे हे आपल्या हिताचे आहे आणि पुष्कळ वेळा असेही असण्याचा संभव असतो की काही गोष्टी आपण समजतो तशा नसतात. कदाचित आपलीच चुकी होत असेल. गोखल्यांमध्ये थोडा अहंकार होता, असे म्हणावयाची धिटाई आपण कशास करावी? ' It is never well to put ungenerous constructions when others, equally plausible and more honourable are ready.' त्यांच्या अंगी अहंकार होता असे म्हणण्याऐवजी स्वत:च्या मार्गांची त्यास इतकी खात्री वाटत असे, असेच आपण म्हणावे.

त्यांच्या सर्व आयुष्यात स्वार्थत्याग हा सद्गुण सूर्यप्रकाशासारखा तळपत आहे. ' The one pure, sacred and efficacious virtue, sacrifice, the halo that surrounds and sanctifies the human soul.’  अशा प्रकारचा स्वार्थत्याग विरळा! त्यांनी गरिबीला आपखुशीने कवटाळले. शेवाळातून जसे कमळ आपले डोके वर काढते त्याप्रमाणे जाती, पंथ, भेदभाव, स्वहित यांच्या चिखलातून, या शेवाळातून हे सुंदर पुष्प देशास दरवळून सोडते झाले, परंतु त्यांना नेहमीच चांगले दिवस लाभले नाहीत! ' Every gleam of sunshine in his life was chased by a gloomy shadow that undermined his constitution  and hastend his end.’ त्यांच्या अंत:करणात एक प्रकारचा उदासीनपणा होता. १८९७ साली जेव्हा त्यांच्यावर गहजब उडाला आणि त्यांनी क्षमा मागितली, तेव्हा त्यांनी आपले मित्र रा. वासुदेव आपटे यांस विचारले, 'माझे करणे आपणास कसे वाटले?' 'देशाची अब्रू दवडणारे, अपमानास्पद वाटले.' गोखल्यांना त्यांचे हे उत्तर ऐकून वाईट वाटले. आपल्या करण्याने देशाची हानी झाली? 'अरेरे!' ते ताबडतोब म्हणाले, 'But a day will come when I shall cover my country with glory by way of compensation for the wrong I am alleged to have done and then critics of your type, who are now running me to death, will be converted into my admires.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel