(३) श्रध्दा - श्रध्दा हा त्यांचा तिसरा गुण वर्णन करता येईल. रानडयांचे ठिकाणी श्रध्दा बळकट होती. आणि 'हॅपी आर दे' या बहुपठित उद्गारात त्यांनी ज्या प्रॉमिस्ड लँड- म्हणजे भावी स्वर्ग-संबंधीचा आशावाद प्रदर्शित केला आहे त्याचाच अनुवाद गोखले यांनी काशी- काँग्रेसच्या अध्यक्षपीठावरूनही केला. यावरून श्रध्देचे हे वारे गोपाळरावांनाही लागलेले होते. वयाच्या उत्तर काळात गोपाळरावांच्या मनात हा श्रध्दाळूपणा वाढत गेला असे चरित्रकारांनी सुचविले आहे. हे श्रध्दाबळ हेही सर्व थोर पुरुषांच्या ठिकाणी बसत असलेले आढळून येते. ''योयछ्रध्द: स एव स:'' हा भगवद्गीतेचा सिध्दान्त सत्य आहे आणि मनाला श्रध्देने काही थोर वेड लावून जीवेभावे झटल्याखेरीज महत्कार्य कधीच होत नाही. श्रध्दाबळ हे काही गोपाळरावांचे प्रधानबळ नव्हे आणि म्हणून क्रान्तिदर्शित्वाचा लाभ त्यांस कधी घडला नाही. रानडयांना तो थोडासा घडला व आपल्या गुरूवरच श्रध्दा ठेवून त्यांजकडून मिळालेल्या श्रध्देच्या ठेवीवरच गोपाळरावांनी आपले काम साधून घेतले.

(४) सौजन्य
- शिष्टपणाची वागणूक हा चौथा मोठा गुण गोपाळरावांनी संपादिला होता. लहानपणापासूनच तशी त्यांची प्रवृत्ती होती व पुढे तारुण्यात,जेव्हा दृष्टी फाकते त्यावेळीही, त्यांनी आपल्या मनाला आवरून मर्यादेने वागणूक केली; त्यामुळे अखेरपावेतो त्यांच्या ठिकाणी सज्जनपणा कायम राहिला. सार्वजनिक आयुष्यक्रमात बरेवाईट पुष्कळ प्रसंग आले; तथापि त्यांनी निदान स्वत: तरी शिष्टाचाराचा अतिक्रम केलेला दाखविता येणार नाही. मोठया पुढा-यांचे क्षुद्र अनुयायी एकमेकांवर भोकतात यात आश्चर्य नाही; पण त्यापासून खुद्द मोठयांनी दूर राहावे लागते आणि ही मर्यादा गोपाळरावांनी पाळिली होती. त्यांचे गुरू माधवराव हे तर सौजन्यसागर म्हणूनच प्रसिध्द होते.

(५) नि:स्वार्थीपणा
-पाचवा गुण गोपाळरावांचा नि:स्वार्थीपणा हा सांगता येण्यासारखा आहे. स्वत:करिता व कुटुंबीयांकरिता कष्ट करणारी 'कुटुंबकबाडी' उदंड पडली आहेत. पण देशहितासाठी आपली काया झिजवून आणि माया खर्चून मागे कीर्ती उरविणारे गोपाळरावांसारखे विरळाच. फाकिरी बाण्याचा नि:स्वार्थीपणा हा त्या गुणाचा कडेकोट होय. कडेलोटाचा मार्ग व्यावहारिकांचा नव्हे. व्यावहारिक हे नेमस्तपणाची मर्यादा संभाळूनच चालणार आणि तेच धोरण गोपाळरावांनी आचरिले.

(६) देशप्रीती- वरील पाचांपेक्षाही हा सहावा गुण एकप्रकारे फार महत्त्वाचा होय. आपला देश सुखी व्हावा ही तळमळ पोटात गोपाळरावांनी अहोरात्र वागविली होती. त्यांची शुध्द व सोज्वळ देशप्रीती त्यांचे प्रतिपक्षी यांसही नि:संशय मान्य करावी लागे,अशी प्रखर होती. सामान्य जनसमूहाला ती दिसण्याचे प्रसंग तितके येत नसत. तथापि त्यांचा आत्मा देशाच्या भावी हितासाठी तळमळत असे आणि तोच त्यांस आतून निरंतर जागवीत असे. ही देशप्रीतीची आग आत नसती तर त्यांच्या हातून झाला हा उद्योग झाला नसता. त्यांनी चटकन् सरकारी अधिका-यांची कृपा संपादन एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आणि वर मोठेपणाही मिरविण्याची एखादी युक्ती पसंत केली असती !पण-

''आपल्या देशाची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे व या गोष्टीचा वेळीच जर लोकांनी काही बंदोबस्त केला नाही तर आमचा रोग दु:साध्य होईल अशी कळकळ ज्यांना मनापासून वाटत आहे अशांमध्ये ना. गोखले यांची गणना केली पाहिजे. देशस्थितीसंबंधाने इतर कोणाला जितके वाईट वाटत असेल व काही तरी उपाय योजणे जरूर आहे याविषयी इतर कोणाला जितकी काळजी वाटत असेल तितकेच वाईट ना. गोखले यांना वाटत असून देशाबद्दल तितकीच काळजी तेही वाहात आहेत. कळकळीच्या कमीजास्तपणामुळे नवीन पक्ष व ना. गोखले यांच्या राजकारणात भेद उत्पन्न झालेला नाही. हा भेद स्वभावाचा व विचारसरणीचा आहे.'' (केसरी-अग्रलेख ता. १२ फेब्रुवारी १९०७).

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel