१८९७ पासून गोपाळरावांच्या मनात असा एकादा राजकीय पंथ निर्माण करावा असे घोळत होते. त्या वेळचा  त्यांचा विचार रामदासी पंथाप्रमाणे होता. बारा वर्षांची, बुध्दिमान व पाणीदार मुले आपल्याजवळ ठेवावयाची; त्यांच्या पालकांपासून आम्ही मुलांस परत नेणार नाही, असा करार करून घ्यावयाचा; नंतर या मुलांस सर्व प्रकारचे राजकीय शिक्षण द्यावयाचे; इंग्रजी शिकवावयाचे आणि आठ दहा वर्षे दृढ अध्ययन झाल्यावर निरनिराळ्या ठिकाणी कामे करण्यासाठी हे राजकीय संदेशवाहक पाठवून देऊन एकीकरण करावयाचे; असा त्यांचा प्रथम मानस होता; या मुलांचा सर्व खर्च कसा चालावयाचा? याकरिता गोपाळरावांनी एक युक्ती योजिली होती. त्यांनी आपले संबंधी दत्तोपंत वेलणकर यांस पुण्यास बोलाविले. दत्तोपंत हे गोखल्यांच्या बंधूंचे जावई. त्यांनी दत्तोपंत यांस भांडवल देऊन काही मोठ्या प्रमाणात उद्योगधंदा करा असे सांगितले, आणि या धंद्याच्या फायद्यातून या मुलांचा खर्च चालवावयाचे ठरविले. गोपाळरावाची महत्त्वाकांक्षा जबर आणि ते आपल्या मनात कल्पनाही मोठ्या मांडीत; परंतु हे शक्य कितपत आहे हे त्यांस मागाहून कळे. रानडे यांचे मेमोरिअल करताना प्रयोगशाळेसंबंधी त्यांचे असेच मोठे विचार होते. परंतु त्यातून काय निष्पन्न झाले? असो. पुढे गोपाळराव कौन्सिलमध्ये गेले. मोठ्या लोकांशी वावरू लागले. हळू हळू त्यांचे तेज फाकू लागले. त्यांचे विचार आता बदलले. लहान मुले घेण्याऐवजी बी. ए. वगैरे झालेली, शिकलेली, तरुणबाड मंडळीच आपल्या पंथात घ्यावी; त्यांस राजकीय शिक्षण दोन तीन वर्षे द्यावे; त्यांच्या निर्वाहाची तरतूद करून त्यांस देशसेवा हेच एक कर्तव्य, ध्येय दाखवून द्यावे असे ठरले आणि वरीलप्रमाणे नियम वगैरे झाले.

हा भारतसेवक समाज निर्माण करिताना गोखल्यांच्या डोळ्यांपुढे युरोपातील जेसुइट लोकांचे प्रयत्न बहुधा असावे. खरोखर या जेसुइट लोकांचा इतिहास फार स्फूर्तिदायक आहे. आपली घरेदारे, आपला देश सोडून लांबलांबच्या देशांत सेंट झेविअरसारखे लोक केवळ एकाच ध्येयाने प्रेरित होऊन- परक्या लोकात, प्रतिकूल परिस्थितीस न जुमानता, जात; ज्यांची भाषा भिन्न, रीतिरिवाज भिन्न, त्यांस त्यांची भाषा शिकून उपदेश करणे, त्यांच्या भाषांची व्याकरणे लिहिणे, त्यांस सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडणे या गोष्टींची कोण मनुष्य प्रशंसा करणार नाही? मनुष्यमात्राचे कल्याण- आपआपल्या बुध्दीप्रमाणे व समजुतीनुसार करण्याची ही केवढी महनीय इच्छा? या सदिच्छेचे कौतुक कोण करणार नाही? मिशनरी लोक परक्याच्या प्रांतात जाऊन जर इतकी खटपट करतात तर आपल्याच देशात, ज्यांची मने आपण जाणतो; ज्यांचे आचारविचार व स्वभाव आपणांस पूर्ण माहीत आहेत, जे आपल्याच धर्माचे व हाडामांसाचे, ज्यांचे व आपले हितसंबंध एकत्र निगडित झाले आहेत त्यांच्यामध्ये कार्य करण्याची स्फूर्ती आपणास का होऊ नये?

या जेसुइट लोकांपेक्षा कदाचित रामदासी पंथ गोपाळरावांच्या मनश्चक्षुंसमोर जास्त प्रामुख्याने असावा. रामदासांचे सतराव्या शतकांतील कार्य पाहिले की, मन चकित होते. दळणवळणाची नीट साधने नसताना व मुसलमानांचे वर्चस्व सर्वत्र स्थापित झालेले असताना त्यांनी अकराशे मठ स्थापले. असा एकही देशाचा भाग सोडला नाही की, जेथे मठ नाही. जे जे भरभराटीचे मुसलमानी शहर असेल तेथे तेथे समर्थांचे दोन मठ असावयाचेच. या मठांचे एकीकरण केले, प्रत्येकास शिस्त लाविली मठांतून ग्रंथालये उघडली आणि एक प्रकारे सर्व प्रकारचे नवचैतन्य राष्ट्रात खेळविले, नसानसातून जीवनरस ओतला. समर्थ एकटे भिक्षेच्या बळावर कोणापाशी विशेष याचना न करिता जे करू शकले ते सध्यांच्या सुशिक्षणाच्या वाढत्या काळात, दळणवळणाची साधने अनुकूल असता का करता येऊ नये? करता येईल, परंतु प्रयत्न झाले पाहिजेत, 'जो तो बुध्दीचे सांगतो' हा मामला मोडून जे आपला नेता सांगेल तद्नुसार वागणे हेच अनुयायांचे काम असावे आणि अशा रीतीने संघटित काम सूत्र पध्दतीने जर केले तर होईल असे गोपाळरावांस वाटले असावे. एकएकट्यांनी प्रयत्न करणे आणि एकमेकांच्या प्रयत्नांची एकमेकांस ओळख नसणे या त-हेने पाऊल पुढे पडावयाचे नाही. एकाच विचाराने एकाच ध्येयाने, एकाच उच्च मनोवृत्तीने भारून गेलेले लोक जर देशसेवेचे कंकण करी बांधितील तर देशाची बरीच सुधारणा हा हा म्हणता येईल. 'सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे' चळवळीत व संघटनेत सामर्थ्य असते. 'वन्हि तो चेतवावा रे, चेताविताचि चेततो' एकदा काडी लावून द्या की काम झाले! देशातील अज्ञानाला प्रत्येकाने काडी लावावी की ज्ञानाचा उजेड आलाच. 'यत्न तो देव जाणावा' हे समर्थांचे अमोल उपदेशवचन आपण डोळ्यांआड करून भागणार नाही आणि समर्थांनी ज्या गोष्टीवर विशेष जोर दिला ती गोष्ट ही की, 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'- जसे सांगाल तसे वागा. उच्चाराप्रमाणे आचार असेल तर तुमच्या सांगीचा जास्त परिणाम होईल. प्रतिज्ञापत्रकात या गोष्टींचा समावेश आहे. आधुनिक पध्दतीचा रामदास पंथ गोपाळरावांनी निर्माण केला. या तरुणांचा शिक्षणक्रमही मोठ्या मार्मिकतेने आखला होता. ज्या शिस्तीतून गोखले स्वत: गेले तीच शिस्त इतर कार्यकर्त्यांस लावणे त्यांस इष्ट व जरूर वाटले. पाच वर्षे विद्यार्थ्याने- देशसेवकाने सर्व प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करावा आणि मग लेखणी व जिव्हा यांस चालना द्यावी. म्हणजे तो जे बोलेल त्याचा लोकांस विचार करावाच लागेल. कारण त्याचे लिहिणे व बोलणे भारदस्त व विचारार्हच असेल. बेझंटबाई म्हणतात :

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel