मॅट्रिकची परीक्षा झाली. त्यावेळी गोपाळ फक्त पंधरा वर्षांचा होता. त्याने आपला धरलेला मार्ग तडीस न्यावा असे ठरले आणि गोपाळ पुढील अभ्यासासाठी कोल्हापुरास राजाराम कॉलेजात दाखल झाला. कॉलेजमधील आयु:क्रम आणि शाळेतील आयु:क्रम यात जमीनअस्मानाचा फरक असतो. शाळेमध्ये गुरुजी मुलाची प्रत्यक्ष चौकशी करितात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देतात. प्रत्येकास समजले न समजले विचारून सर्व स्पष्ट करितात. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मुलगा विशेष काही पाहत नाही आणि शिक्षकाची साधारण शिकवणूक संकुचितच असते. कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या अंगावर सर्व जबाबदारी पडते. प्रोफेसर वर्गात विषय विशद करून निघून जातात. तदनुरोधाने विद्यार्थ्यास विषय घरी तयार करावा लागतो. प्रोफेसरांची शिकविण्याची पध्दतिही व्यापक असते. कोणताही विषय सांगोपांग त्यांस शिकवावयाचा असतो. नाना प्रकारचे दृष्टान्त, नाना नवलकथा ते सांगतात. ते टीका करितात. चांगले व वाईट यांची फोड करितात. रोज निरनिराळया व्यक्ती, निरनिराली पुस्तके कानावरून जातात. आज नेपोलियनने मनास वेडे करावेतर दुस-या वेळेस बायरनने चटका लावावा. आज इंग्लंडचा इतिहास आवडावा तर परवा इटलीच्या उध्दारकांचे कौतुक करावेसे वाटावे, आपल्याही मनांत महत्त्वाकांक्षा डोकावू लागते. आज मोठे भीमासारखे शूर व्हावेसे वाटते. तर दुस-या दिवशी शंकराचार्यांसारखे तत्त्वज्ञ होण्याची स्फूर्ती होते. कधी न्यूटन हृदयात घुसतो तर कधी रस्किन किंवा कार्लाइल डोळयांपुढून हलत नाही. हे संक्रमणाचे दिवस असतात. मनाचा आखाडा येथे असतो. त्यात मन पुष्ट होत असते. त्याप्रमाणेच कॉलेजमधील मोकळे वातावरण, वादविवादोत्तेज सभा, जिमखाना, लायब्ररी, वाचनालय यांची सर्व व्यवस्था मुलेच करितात. मुलांमलांच्या दाट व जन्माच्या ओळखी येथे पडतात. गोपाळरावांचे सहाध्यायी प्रो. विजापूरकर हे होते. गोखल्यांच्या गुप्त गोष्टी पुढे विजापुरकरांजवळ उघड होत असत. हा कॉलेजचा आयुष्यक्रम गोपाळास लाभला हे त्याचे व म्हणून आम्हां सर्वांचे भाग्य होय. नाही तर परिस्थितीमुळे मोठया होतकरू मंडळीसही जसे कारकुनीच्या रामरगाडयात भरडले जावे लागते तशीच स्थिती याही मोह-याची झाली असती.

गोपाळ हा काही अलौकिक बुध्दीचा मनुष्य नव्हता, किंवा अगदी 'ढ'ही नव्हता. या जगाच्या रंगणात असेच पुरुष जास्त दिसतात. ज्यांच्याजवळ लोकोत्तर बुध्दिमत्ता असते ते घमेंडीत जातात आणि प्रत्यत्न करीतनासे होतात. उत्तम तलवार जवळ असून तिचा उपयोग न केल्यामुळे ती गंजून जाऊन निरुपयोगी मात्र होते. जे 'ढ' असतात ते म्हणतात आम्ही प्रयत्न केला तरी विफळच होमार. मग कशा करा? परंतु जे मध्यम स्थितीतले असतात त्यांस आतून भरंवसा वाटतो की, जर आपण हातपाय हलवले, आपण यत्नांची सीमा केली, तर यश:शिखर आपणांस गाठता येईल. टिळकांनी न्यू पूना कॉलेजमध्ये १९१९ मध्ये हेच उद्गार काढले होते. मध्यम स्थितीतील माणूस यत्नवादी असतो. ठोठावले तर उघडेल ही धमक त्याला असते. तो हुरळून जात नाही किंवा होरपळून जात नाही. तर वस्तुस्थितीचे पर्यालोचन करून 'यत्नदेवो भव' हे सूत्र पुढे ठेवितो; गोपाळ या मध्यम वर्गातील होता; आपला पाठ नीट तयार करण्यास जे कधी कसूर करीत नाहीत, त्यांसच परीक्षेत यश येत. गोपाळाचा अभ्यास तयार असे. त्याची पाठशक्ती दांडगी होती, आणि य पाठशक्तीचे अजब चमत्कार तो करून दाखवीत असे. त्यास अभ्यासास नेमलेले इंग्लिश काव्य तोंडपाठ येत असे. त्याचे सहाध्यायी त्यास 'पाठया,' 'घोटया' असे म्हणून चिडवावयाचे; परंतु गोपाळास यामुळे संताप  न येता उलट 'इतरांस जे करिता येत नाही ते आपण करितो' असे वाटून त्यास समाधान वाटे. आपण इतरांच्याहून कमी आहो हा विचार त्यास खपत नसे. खेळातही आपणास सर्व खेळ, क्रिकेट, पत्ते, बुध्दिबळे, सोंगटया, गंजिफा, बिलियर्ड, सर्व काही आले पाहिजे असे त्यास वाटावयाचे आणि नुसते मनात वाटूनच तो थांबत नसे तर तदनुरूप प्रयत्नही करावयासॉ लागावयाचा. हा त्याचा गुण अगदी मरेपर्यंत होता. बोटीवर खेळाची सवय करीत असता त्यास एकाने विचारले : 'येवढे त्या खेळात लक्ष देण्यासारखे काय आहे?' गोपाळ म्हणाला, ''खेळांमध्ये सुध्दा आम्ही युरोपियनांची बरोबर करू शकतो हे आम्ही दाखविले पाहिजे. आमचा देश कशातही मागे नाही, हे जगास दाखविले पाहिजे. जो उत्तम क्रिकेट खेळून देशाची कीर्ती वाढवितो तोही देशभक्त आहे.'' जी पुढे देशाविषयीची भावना होती ती प्रथम पिंडात्मक होती, स्वत:भोवती होती. आपणामध्येही काही तरी पाणी आहे, करामत आहे, अगदीच काही नादान टाकाऊ आपण नाही हे दाखवावेसे त्यास वाटे. यामुळे मुलांच्या थट्टेकडे त्याचे लक्षही नसे. मुले 'घोक्या' म्हणाली तर जास्तच पेटून गोपाळ आणखी जोराजोराने पाठ करून यावयाचा. अशा रीतीने कॉलेजातील क्रम चालला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel