The frequent subordination of the interests of the Indian taxpayer to these other interests makes it all the more imperative that the machinery of constitution control should provide adequate safeguards for a just and economical administration of the Indian expenditure; and yet, I fear, nowhere are the safeguards more illusory than in our case.

गोपाळरावांच्या सुंदर व मुद्देसूद साक्षीने त्यांची वाहवा झाली! हिंदुस्तानातील त्यांच्या मित्रांचा आनंद गगनात मावेना !! रानडयांसही समाधान झाले!!! नवीन पुढारी आपणांस लाभला असे जनतेस वाटू लागले. हा आपले पांग फेडील असे दु:खीकष्टी भूमातेस वाटले असावे, अशा प्रकारे गोखले आनंदात होते, त्यांचे मित्र त्यांच्या गळयात यशाची माळ घालण्यास इकडे उत्सुक होते, परंतु विधिघटना होती वेगळीच!

जगात अशी गंमत आहे की, ज्या वेळेस दु:खाचा मागमूसही नसतो; सुखसमाधानात लोक पोहत असतात; अशा वेळेस एकाएकी सर्व स्थिती पालटून जाते. काळेकुट्ट ढग जमतात; आकाशातील चंद्रमा लोपून जातो; सोसायटयाचा झंझावात वाहू लागतो; मेघांच्या गडगडाटाने कानठळया बसून जातात; विजेचा लखलखाट होतो आणि दरएक क्षणी वाटते, हा विजेचा गोळा कोठे तरी पडणार; या प्रचंड वादळाने गावच्या गाव उदध्वस्त होणार; आणि असे उत्पात आपण अगदी शांत आणि प्रसन्न वातावरण असताना पाहतो. तसेच गोखल्यांच्या बाबतीत झाले. पायसात मिठाचा खडा पडला. एकंदरीत दैवाला सर्व चांगले पाहवत नाही हेच खरे!

गोपाळराव इंग्लंडमध्ये गेले, परंतु मागे इकडे पुण्यात हलकल्लोळ माजला. नवीन रोगाची साथ आली. मुंबई, पुणे, नाशिक, धारवाड, बेळगाव या महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ठिकाणी ग्रांथिक संन्निपाताने- प्लेगने हलकल्लोळ माजविला. हजारो लोक मृत्युमुखी पडले. कुटुंबेच्या कुटुंबे बसली. लोक अगदी हवालदिल झाले. कधी कोणाच्या प्राणांवर बेतेल याचा नेम नव्हता. सरकारने या नवीन रोगाचा वेळीच प्रतिरोध करावा या सध्देतूने, त्याचे उच्चाटण व्हावे म्हणून शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने लस टोचण्याचा जालीम उपाय शोधून काढला. रोग नवीन आणि त्यावर पसंत केलेला उपायही नवीन. लोकांस टोचून घेण्याची कल्पनाच सहन होईना. याशिवाय जो कोणी या रोगाने पछाडला असेल त्याच्या आईबापांचे, भावाबहिणींचे म्हणणे, केविलवाणे रडणे, आरडणे यांपैकी कशासही न जुमानता त्याची क्कारंटाईनमध्ये रवानगी होई. आणि तेथे तो रोगी बहुधा आपल्या नात्यागोत्याचे कोणी जवळ नसता दगावावयाचा हे  ठरल्याप्रमाणे होते. ज्या घरा रोग आला असेल ती घरे धुऊन, कपडे वगैरे जाळावयाचे; लोक आजा-याची बातमी देत नसत म्हणून घरांची झडती व्हावयाची; असा रोजचा कार्यक्रम होता. आणि ज्यांची मने जात्याच असंस्कृत व निष्ठू असतात, आणि घाव घालावयास जे उत्सुक असतात अशा गो-या सोजिरांची या कामगिरीवर नेमणूक झाली होती. काम किती नाजूक आणि ते पार पाडणारे हे हडेलहप! हिंदू लोकांची मने जात्याच कोमल. दुस-याच्या दु:खाने त्यांच्या हृदयाचे पाणी होते. साथीच्या रगाने घरातील माणूस आजारी पडला तर त्याची शुश्रूषा मनोभावाने जिवापाड मेहनत करून करावयाची हे त्यांस माहीत. या संसर्गजन्य रोगाने आपण पछाडले जाऊ असे त्यांच्या ध्यानीमनीही येत नाही. मरणोन्मुख माणसास मरता मरता तरी सुख व्हावे ही त्यांची इच असते. दुधाचा थेंब, गंगेचे पाणी तरी त्याच्या पोटात जाऊ दे असे त्यांस वाटत असते. या सर्व मनोवृत्तींना फाटा देऊन, त्या कोमल मनांचे दु:ख न पाहता, आजारी माणसास उचलून क्वारंटाइनमध्ये नेऊन ठेवीत. घरातील माणसे आरडून ओरडून नुसता कल्लोळ करीत, परंतु विचारतो कोण? आणि दया तरी कोणास येणार? बापलेक एकमेकांस दुरावले !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel