आपल्या मित्रांविषयीसुध्दा ते पुढे यावे असे गोखल्यांस वाटे. हरिभाऊ आपटे यांस मुंबईच्या कौन्सिलात निवडून येण्यासाठी उभे राहण्यास त्यांनीच आग्रह केला. हरिभाऊ निवडून येऊ शकले नाहीत तेव्हा त्यांस फार वाईट वाटले. स्वपक्षातील नव्हे तर परपक्षातील लोकांबद्दलही त्यांस आपलेपणा वाटे. त्यांच्याही गुणांचे चीज व्हावे, त्यांच्या गुणांच्या वाढीस, कर्तबगारीस अवसर मिळावा असे त्यांस फार फार वाटे. 'कोठेही स्पृहणीय गुण दिसला की, त्याविषयी आदरबुध्दी त्यांच्या मनात उत्पन्न होत असे. या बुध्दीने ख-या शिष्टांच्या, ख-या संभावितांच्या पंक्तीस त्यांस अग्रस्थान मिळून ते प्रतिपक्षाच्याही आदरास पात्र झाले. टिळकांमध्येही हा गुण होता. गोपाळराव देवधर, भांडारकर वगैरेंनी आपल्या ईश्वरी देण्याचा कसा उपयोग केला हे ते वारंवार सांगत. गोखल्यांविषयी त्यांनी किती सुंदर व उदार उद्गार काढले! नेहमीच्या झटापटीत ते गुण बाजूस ङ्खेवीत, परंतु अंतरी दैवी देण्याविषयी आदर कोण दर्शविणार नाही? परंतु टिळकांविषयी सर्वदा वाकड्या नजरेनेच पाहणारास हे कसे दिसावे! नरसोपंत केळकर कौन्सिलला उभे राहण्यास अयोग्य आहेत असे फर्मान सरकारने त्यांच्या विरुध्द काढले. परंतु याबाबतीत योग्य न्याय मिळावा म्हणून गोखल्यांनीच खटपट केली. दे. सावरकरांसारख्यासही त्यांनी योग्य उपदेश केला होता, परंतु भावनांच्या तीव्रतेने त्या तरुण बहाद्दरास तो पटला नाही. त्यांत दोष कोणाचच नाही! प्रत्येक जण आपआपल्या मनोदेवतेस साक्ष ठेवून वागला यातच प्रत्येकाचा मोङ्गेपणा आहे. ग. व्यं. जोशी हे सुरतच्या राष्ट्रीय सभेनंतर राष्ट्रीय पक्षाचे झाले. नंतर टिळक कैदेत गेले. जोशीही पुढे वारले. शेवटी त्यांचे सर्व लेख छापून काढण्याचे, गोखल्यांनीच मनावर घेतले. खरे पाहिले तर गोखल्यांनी या पुरुषाजवळ अर्थशास्त्राचा व आकडेशास्त्राचा अभ्यास केलेला. गोखल्यांस वेल्बी कमिशनच्या वेळेस किंवा कौन्सिलात जोशी यांनी पुरविलेल्या माहितीचा फारच उपयोग झाला होता. एकेपरी त्यांनी गुरुऋण फेडले, परंतु ज्या पक्षास जोशी मिळाले त्या पक्षातील लोकांनी या पुस्तकाच्या पाठविलेल्या व्ही.पी. सुध्दा परत केल्या हे मात्र क्षम्य नाही. टिळक असते तर असे खचित होऊ देते ना. दुस-याविषयी गोखले किती जपत हे सुरतच्या राष्ट्रीय सभेच्या वेळीही दिसून आले. ज्या वेळेस टिळक छातीवर हात ठेवून हिमालयाप्रमाणे धैर्याने उभे होते, त्या वेळेस एका मवाळपक्षीय गृहस्थास त्यांची मूर्ती पाहवेना. तो टिळकांच्या अंगावर चालून जाऊ लागला. त्या वेळेस गोखल्यांनी ताडकन उडी मारून त्या गृहस्थापासून टिळकांचे संरक्षण केले. दुस-याविषयी त्यांस किती आपलेपणा वाटे हे या गोष्टीवरून दिसून येते. यास मनाचा मोठेपणा लागतो आणि तो गोखल्यांजवळ भरपूर होता. टिळकांविषयी तर त्यांस आदर वाटतच असला पाहिजे. कारण त्यांच्याच स्फूर्तीने ते डेक्कन सोसायटीत शिरले होते.

गोखल्यांना वडील माणसाबद्दल विलक्षण आदर वाटे. रानडयांबद्दल तर त्यांस किती आदर वाटे. रानड्यांबद्दल तर त्यांस किती आदर वाटे हे शब्दांनी सांगता येणे शक्यच नाही. रानड्यांची एक पगडी त्यांनी आपल्या कपाटात ठेवली होती व तिचे मोठ्या भक्तीभावाने ते दर्शन घेते. रानड्यांचे चरित्र आपण लिहिले नाही म्हणून त्यांस फार वाईट वाटे व वहिनीबाईंची ते नेहमी क्षमा मागत. My real joy is, that my true place is at his feet’  असेच उद्गार त्यांनी निरंतर मनात काढले असतील. आपण आजारी आहो हे दादाभाईंच्या जवळ कसे सांगावे असे त्यांस वाटे. एकदा गोखले आजारी असल्यामुळे डॉ. भांडारकर त्यांस भेटावयास आले. गोपाळराव म्हणाले, 'मी तुमच्याकडे यावयाचे. तुम्ही मजकडे का येता?' 'तुम्ही आजारी आहात म्हणून मी येतो; बरे झाल्यावर मग तुम्हीच मजकडे या.' असे भाण्डारकरांनी त्यांचे समाधान करावे. मेथांविषयी त्यांस असेच वाटे. कुटुंबातही आईबापांविषयी त्यांची भक्ती मोठी आदर्शभूत होती, परंतु या गुणाचे पर्यवसान पुढे निराळ्या प्रकारात झाले असावे. जसे आपण गुरुजनांना किंवा आपल्याहून अनुभवी पुढा-यांस मानतो, तसेच आपणासही लोकांनी मानावे असे त्यांस वाटू लागले असावे असे दिसते. त्यांच्या मित्रमंडळीत व अनुयायांत तर त्यांच्या शब्दास विलक्षण किंमत असे. डॉ. परांजपे लिहितात- 'His word was law, his advice most welcome and his smallest wish a peremptory order.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel