मनाची आणि बुध्दीची या प्रकारे उन्नती होत होती. आता १८९५ साल उजाडले. या वर्षी कामाचा बोजा संस्थेतही पुष्कळ पडला व बाहेरही कामाने आ पसरला होता. कामास गोपाळराव ना कधीच म्हणावयाचे नाहीत: शरीराकडे सुध्दा पाहावयाचे नाहीत. हे काम रेटण्यास ते पुढे सरसावले.

प्रथम ४ मे १८९५ साली बेळगावास आठवी प्रांतिक परिषद भरली होती. या सभेस फेरोजशहा मेथा यांच्या अभिनंदनसाठी ठराव गोपाळरावांनीच मांडला. मेथा हे हिंदुस्थानास गाजलेले, नावाजलेले पुढारी. मुंबई म्युनिसिपालिटीचे ते जीव की प्राण.  हिंदू लोकांस म्युनिसिपल कामे कशी चोख व उत्तम रितीने करिता येतात हे त्यांनी सरकारास दाखविले. त्याप्रमाणेच ते वरिष्ठ कायदे कौन्सिलात व प्रांतिक कायदे कौन्सिलात सडेतोडपणे आपले म्हणणे मांडीत. ते सरकारास वाकून नसत. या वर्षी विशेषत: त्यांनी कलकत्ता येथील वरिष्ठ कायदे कौन्सिलात हिंदूची बाजू सावरून धरिली. सिव्हिल सर्व्हंट हेच हिंदुस्थानचे राज्य करण्यास लायक अधिकारी आहेत असे सरकारी गो-या सभासदांनी म्हणताच फेरोजशहांनी सिव्हिल सर्व्हंटांचे सर्व दोष चव्हाटयावर मांडले. सर जेम्स वेस्टलंड यांच्या अंगाची तर आग उडाली. मेथा हे कौन्सिलमध्ये नवीन धोक्याचे वारे आणीत आहेत अशी त्यांनी तक्रार केली. परंतु असल्या 'गोमायुरुतां'ना 'केसरी' भीक घालीत नसतो. मेथी त्यांस उत्तर देण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. कौन्सिले ही काही सरकारच्या होयबांसाठी नाहीत हे ह्या सर बहादुरांस समजले पाहिजे होते. कलकत्त्याच्या स्टेट्स्मनने मेथांच्या वर्तनाचा गौरव केला. कलकत्त्यास डब्ल्यू. सी. बानर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मेथांचे त्यांच्या धैर्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. मद्रासकडच्या एका वर्तमानपत्रकर्त्याने मेथांच्या भाषणाबद्दल म्हटले आहे की, `He returned argument for argument, invective for invective, banter for banter and ridicule for ridicule.' सर्व हिंदुस्थानात मेथांचे अभिनंदन झाले. बेळगावासही ते झाले. गोखल्यांचे लहानच पण सुंदर भाषण झाले. गोखल्यांस मेथांबद्दल फार आदर वाटे. ते अद्याप नवशिके होते. निरनिराळया राजकारणी पुरुषंची ते ओळख करून घेत होते; त्यांच्या पध्दती समजून घेत होते. मथांच्या अचूक धोरणाची, नि:स्पृहतेची, बाणेदारपणाची, अप्रतिम कोटिक्रमाने  प्रतिपक्षास चीत करण्याच्या त्यांच्या कौशल्याची कोण तारीफ करणार नाही? ते राजकारणात नेमस्त पक्षाचे होते. योग्य प्रसंगी सरकारास तडाखा द्यावयास ते माघार घेणार नाहीत, अशी लोकांची समजूत होती. अशा पुरुषाचे अभिनंदन  गोखल्यांनी गोड व मार्मिक शब्दात केले. ते म्हणतात, `To my mind it has always appeared that Mr. Mehta is to great extent a happy combination of the independence and strength of character of Mr. Mandlik, the lucodity and  culture of Mr. Telang and the originality and wide grasp of Mr. Ranade.' फेरोजशहांसारख्या उत्कृष्ट वादविवादपटु कौन्सिलमध्ये त्यांच्यानंतर क्वचितच झाला: असो. गोपाळरावांचा प्रांतिक सभेशी संबंध १८८८ पासूनच आला होता. पहिल्या प्रांतिक सभेचे तेच सेक्रेटरी होते. हे काम त्यांनी चार वर्षे केले आणि पुढे ते वाच्छांबरोबर राष्ट्रीय सभेचे सेक्रेटरी झाले. १८९५ च्या राष्ट्रीय सभेचे ते एक सेक्रेटरी होते. वाच्छा हे जनरल सेक्रेटरी होते. स्थानिक सेक्रेटरी १८९५ मध्ये टिळक आणि गोखले होते. सभा त्या वर्षी पुण्यास भरावयाची होती. ही राष्ट्रीय सभा पुण्यास भरवून पुण्यााा लौकि वाढवावा, सभा उत्कृष्ट रीतीने पौर पडावी असे रानडयांना वाटत होते, परंतु भवितव्यतेच्या मनात निराळेच विचार घोळत होते. पुण्यात वादविवादाने, भांडणांनी एकच रणधुमाळी माजली आणि त्याच्या कारणाच्या शोधनार्थ आपणांस थोडे पाठीमागे गेले पाहिजे.

आजपर्यंत असे होत असे की, जेथे राष्ट्रीय सभा भरत असे त्याच ठिकाणी सामाजिक परिषदही भरे. सामाजिक परिषदेसाठी निराळा मंडप वगैरे घालावा लागत नसे. यंदा पुण्यास राष्ट्रीय सभा भरावयाची होती. तेव्हा सामाजिक परिषदही राष्ट्रीय सभेच्या मंडपातच भरणार असे बहुतेक निश्चित झाले होते. राष्ट्रीय सभा म्हणजे सर्व राष्ट्राची सभा होय. सर्व राष्ट्रांचे त्यात मत पाहिजे; मूठभर लोकांची ही मजलस नाही हे सरकारास दाखविले पाहिजे, हा यंदाचे स्थानिक सेक्रेटरी टिळक यांचा विचार होता. विशेषत: ज्या शहरी सभा भरवावयाची तेथील तरी सर्व लोकांची राष्ट्रीय सभेस सहानुभूती अवश्य पाहिजे असे त्यांचे मत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel