राजा म्हणाला, ''असें असेल तर मी सर्व मृगांना अभय देतों.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज या उद्यानांतील मृगानांच आपण अभय देतां. पण अरण्यांतील इतर श्वापदांनी काय करावें ? त्यांची गति काय होणार ?''

राजानें सर्व प्राण्यांना अभयदान देण्याचें अभिवचन दिल्यावर बोधिसत्त्व त्या ओंडावरून उठला, आणि त्यानें राजाला शील राखण्यासाठीं व धर्मानें राज्य करण्यासाठीं उपदेश केला. नंतर राजानें त्या सर्व मृगांना कुरणांतून मोकळें केलें. व ते अरण्यांत आपल्या मूळच्या ठिकाणीं गेले.

तेथें त्या गर्भिणी मृगीला एक सुंदर पुत्र झाला तो लहानपणी वारंवार शाखमृगाजवळ जात असे. आईला जेव्हां ही गोष्ट समजली तेव्हा ती त्याला म्हणाली, ''बाबारे, + तुला तुझें कल्याण व्हावें अशी इच्छा असेल तर शाखमृगाचा सहवास न करितां न्यग्रोधाची संगति धर. न्यग्रोधाबरोबर मरणें श्रेयस्कर आहे; पण शाखाबरोबर जगणें श्रेयस्कर नाहीं.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
+ मूळ गाथा--
निग्रोधमेव सेवेय्य न साखं उपसंवसे ।
निग्रोधस्मिं मतं सेय्यो यंचे साखस्मिं जीवितं ॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel