३८. काडीचा प्रामाणिकपणा.
(कुहक जातक नं. ८९)
अतीत कालीं एका गांवीं एक जटिल तापस रहात असे. त्याच्या एका गृहस्थ शिष्याच्या घरीं तो वारंवार भिक्षेसाठीं येत असे. त्या गुहस्थानें त्याला जवळच्या जंगलांत एक प्रशस्थ पर्णकुटिका बांधवून दिली होती. त्या गृहस्थाचा त्याच्यावर इतका विश्वास होता कीं त्याला तो जीवन्मुक्त समजत असे. त्या गांवांच्या आसपास बर्याच चोर्या होऊं लागल्या; तेव्हां गृहस्थानें आपल्याजवळ असलेल्या शंभर मोहरा त्या जटिलाच्या पर्णशाळेंत जाऊन तिसर्या कोणाला कळूं न देतां जमिनींत गाडून टाकिल्या; व तो जटिलाला म्हणाला,''भदंत, माझ्याजवळ असलेलें सर्व धन या येथें मीं पुरलें आहे. त्याचा सांभाळ करा.''
जटिल म्हणाला, ''हें तुझें बोलणें योग्य नाहीं. कारण मला दुसर्याच्या धनाचा लोभ नाहीं व तुझी माझीं मैत्री असल्यामुळें ही गोष्ट दुसर्याला कळविणें उचित होणार नाहीं.''
जटिलाला नमस्कार करून तो गृहस्थ आपल्या घरीं गेला. कांहीं दिवस गेल्यावर जटिलानें असा विचार केला कीं, ''मी या शंभर मोहरा घेऊन दुसर्या गांवीं गेलों तर मला सुखानें उपजीविका करतां येईल.'' त्यानें तें द्रव्य दुसर्या एका ठिकाणीं गाडून ठेविलें व भिक्षेसाठीं तो त्या गृहस्थाच्या घरीं गेला. तेथें गृहस्थानें त्याचें आदरातिथ्य चांगलें करून त्याला जेवावयास घातलें. भोजनोत्तर जटिल म्हणाला, ''मी कांहीं दिवसासाठीं दुसर्या एका गांवीं जाणार आहें. चिरकाल एकाच ठिकाणीं राहिल्यामुळें तपस्व्याला त्या ठिकाणाचा लोभ जडतो. पण अशा लोभांत गुरफटून जाणे आम्हा लोकांना योग्य नाहीं. म्हणून कांहीं दिवस स्थानांतर करून मी परत येईन. तोपर्यंत तुम्ही आपली पर्णशाला संभाळा.''
बिचार्या गृहस्थाला आपला गुरु परगांवी जातो म्हणून फार वाईट वाटलें. तो त्या जटिलाला कांहीं अंतरावर पोंचवून परत घरीं आला.
त्या दिवशीं आमचा बोधिसत्त्व व्यापारासाठीं गांवोगांवीं हिंडत असतां त्या गृहस्थाकडे पाहुणा म्हणून उतरला होता. त्या गृहस्थानें माघारें येऊन बोधिसत्त्वापाशीं आपल्या गुरूची फार वाखाणणी केली. जटिलहि मोठा धूर्त होता. आपल्या मागोमाग जाऊन गृहस्थ आपलें द्रव्य उकरून पाहील, व तें न दिसल्यामुळें आपणाला वाटेंत पकडील असा त्याला संशय आला. आपल्यावरची त्या गृहस्थाची श्रद्धा वाढावी आणि दोन तीन दिवस तरी त्यानें आपल्या द्रव्याच्या वाटेला जाऊं नये अशा उद्देशानें तो पुनः त्या गृहस्थाच्या घरीं गेला. त्याला पाहून गृहस्थ म्हणाला, ''भदंत, आपण इतक्या दुरून परत आलांत हें काय ?''
जटिल म्हणाला, ''तुमच्या घरची गवताची काडी माझ्या जटेंत अडकून राहिली, ती परत करण्यासाठीं मी येथें आलों आहें.''
गृहस्थ म्हणाला, ''या यःकश्चित कामासाठीं आपण एवढीं तसदी व्यर्थ घेतली. एका गवताच्या काडीनें आमचें काय होणार आहे ? बरें जर आपल्या शीलाचा भंग होईल असें आपणास वाटत असेल तर ती येथेंच फेंकून द्या म्हणजे झालें.'' जटिलानें गवताची काडी फेंकून दिली, व तो चालता झाला.
बोधिसत्त्व त्याचें भाषण ऐकत होता व तापसानें काडी फेकून दिली हा प्रकारहि त्यानें पाहिला. तो (जटिल ?) म्हणाला, ''हा तपस्वी मोठा लबाड दिसतो. मला अशी शंका येते कीं तुम्ही कांही तरी द्रव्य त्याच्या स्वाधीन केलें असावें व तो तें उपटण्याचा प्रयत्न करीत असावा.''
गृहस्थ म्हणाला, ''मी शंभर मोहरा याच्या पर्णकुटिकेंत गाडून ठेविल्या आहेत, एवढेंच काय तें. याशिवाय याला मी दुसरें कांहीं दिलें नाहीं.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''तर मग तुम्ही आतांच्या आतां आपल्या मोहरांचा शोध करा आणि जर त्या तेथें सांपडल्या नाहींत तर या लुच्चा तपस्व्यानें त्या लांबवल्या असल्या पाहिजेत असें खास समजा.''
त्या गृहस्थानें जटिलाच्या पर्णकुटिकेंत धांव घेतली, व तो पाहतो तों मोहरा पुरलेल्या ठिकाणांतून नाहींशा झाल्या आहेत. तेव्हां त्यानें त्या जटिलाला दुसर्या गांवी जात असतां वाटेंत आडवून पकडून आणलें. तेव्हां बोधिसत्त्वासमोर जटिलानें आपला गुन्हा कबूल केला; व दुसर्या ठिकाणीं गाडून ठेविलेल्या मोहरा त्या गृहस्थाच्या स्वाधीन केल्या.
तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''गवताच्या काडीचा प्रामाणिकपणा दाखवीत असतां तूं गोड गोड बोलून त्या गृहस्थाला ठकविलेंस. परंतु शंभर मोहरा चोरण्याला तुला मुळींच लाज वाटली नाहीं ! पुनः अशा तर्हेचें पापकृत्य करून व वरून दांभिकपणा दाखवून लोकांना फसवूं नकोस.''
गवताच्या काडीबद्दल जे प्रामाणिकपणा दाखवितात त्यांना मोठी चोरी करण्यास लाज वाटणार नाहीं असें खास समजावें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.