९५. मांगाचा धार्मिकपणा.

(छवकजातक नं. ३०९)


एका जन्मीं बोधिसत्त्व चांडाळ कुलांत जन्म घेऊन वयांत आल्यावर आपल्या कुटुंबाचें यथाशक्ति सन्मार्गानें पालनपोषण करीत असे. त्याच्या बायकोला भलत्याच ॠतूंत आंबे खाण्याचे डोहाळे झाले. नवर्‍याला आंबे आणण्याविषयीं तिनें फारच आग्रह केला, नव्हे, हट्ट धरला. पण त्या ॠतूंत आंबे मिळावे कसे ? बोधिसत्त्वानें तिची पुष्कळ समजूत घातली. दुसरें कांहीं आंबट फळ खाऊन आपले डोहाळे भागव असें त्यानें तिला सांगितलें, पण ती कांहीं केल्या ऐकेना. त्या वेळीं वाराणसी राजाच्या उद्यानांत त्या ॠतूंत देखील आंब्याला फळें येत असत. निदान लोकांच्या ऐकण्यांत तरी अशी गप्प होती. आपल्या भार्येला वांचविण्यासाठीं बोधिसत्त्वानें जिवाची पर्वा न करितां त्या उद्यानांत रात्रीं प्रवेश केला. आंब्यांचा शोध करण्यांत ती रात्र घालविली. परंतु दुःखाची गोष्ट ही कीं, त्याच्या हातीं एकहि आंबा लागला नाहीं ! पहाटेला माळी लोक उठून जिकडे तिकडे पाणी वगैरे शिंपूं लागले. तेव्हां उद्यानांतून पळून जाणें धोक्याचें वाटून बोधिसत्त्व एका मोठ्या आंब्याच्या झाडावर दडून बसला. वाराणसीचा राजा आपल्या पुरोहिताला बरोबर घेऊन त्या झाडाखालीं येत असे आणि पुरोहिताकडून मंत्र शिकत असे. परंतु आपण एका उच्चासनावर बसून पुरोहिताला तो जमिनींवरच बसवीत असे ! त्या दिवशीं हा प्रकार बोधिसत्त्वाला असहृय वाटून मंत्राध्ययन चाललें असतां त्यानें एका आंब्याच्या फांदीला लोंबकळून राजा आणि पुरोहित यांच्या मध्यभागीं उडी टाकिली ! आणि तो म्हणाला, ''महाराज मी नष्ट झाल्यासारखाच आहे ! पण तुमचा आणि पुरोहिताचा हा प्रकार पाहून मला फार वाईट वाटतें.'' राजा म्हणाला, ''असें कां ?'' ''महाराज, आपण दोघेहि धर्म जाणत नाहीं. गुरूला खालीं बसवून आपण अध्ययन करणें हा शिष्याचा धर्म नव्हे. आणि खाली बसून उच्चासनावर बसलेल्या शिष्याला पाठ सांगणें हा गुरूचा धर्म नव्हें ! तेव्हां आपण दोघेहि पतित आहां असें मला वाटतें.''

तें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून पुरोहित म्हणाला, ''अरे, तू मोठी धर्माची गोष्ट सांगत आहेस. परंतु राजाच्या घरीं सुग्रास भोजन मला मिळत असल्याकारणानें या ॠषिप्रणीत धर्माची मला मातबरी वाटत नाहीं !''

बोधिसत्त्व म्हणाला, ''अशा अधर्मानें पोटाची खळी भरण्यापेक्षां प्रव्रज्या होऊन भिक्षेनें अवलंबन केलेलें बरें ! राजाच्याच घरीं अन्न शिजतें आहे, आणि इतरांच्या घरीं शिजत नाहीं, असें नाहीं. तेव्हां हा नरकाला जाण्याचा मार्ग सोडून देऊन तेथून बाहेर पड ! नीचपणानें आणि अधर्मानें मिळविलेल्या धनद्रव्याला आणि कीर्तीला धिःकार असो !''

हें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला, ''हे मनुष्या तुझी जात कोण ?'' बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज मी मांग आहे.''

राजा म्हणाला, ''जर तूं उच्च कुळांतला असतास, तर तुला आज मी मोठ्या पदवीस चढविलें असतें. तथापि तुझी योग्यता मोठी असल्याकारणानें मी तुला नगररक्षकाच्या पदावर नेमतों. दिवसा जरी मी राजा असलों तरी रात्रीं तुझीच ह्या नगरांत सत्ता राहील.''

असें म्हणून राजानें त्याच्या गळ्यांत तांबड्या फुलांची माळ घातली आणि त्याला ताबडतोब कोतवालाची जागा दिली. तेव्हांपासून कोतवाल तांबड्या फुलांची माळ घालीत असत.

भाग पहिला समाप्‍त.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel