१२१. लक्ष्मी आणि अवदसा

(सिरिकालकण्णिजातक नं. ३८२)


हिमालय पर्वतावर अनवतप्‍त नांवाचें एक प्रसिद्ध सरोवर आहे. त्या सरोवरावर स्नान करण्यासाठीं प्राचीन काळीं निरनिराळे घाट असत. ॠषी एका घाटावर स्नान करीत असत. देवता दुसर्‍या घाटावर स्नान करीत असत. बुद्ध प्रत्येकबुद्ध वगैरे आपापल्या घाटांवर स्नान करीत असत. एके दिवशीं चार *दिक्पाळांपैकीं धृतराष्ट महाराजाची मुलगी श्री व विरूपाक्षमहाराजाची अवदसा, या दोघी जणी त्या सरोवरावर स्नानासाठीं एकाच वेळीं आल्या. तेव्हां प्रथमतः कोणी स्नान करावें या संबंधानें त्या दोघींमध्ये वाद उपस्थित झाला. अवदसा म्हणाली, ''माझा स्नान करण्याचा पहिला हक्क आहे. कांकीं जगांतील बहुजन माझ्या बाजूचे आहेत.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* यांना पालिभाषेंत चत्तारो महाराजा व त्यांच्या हाताखालील देवतांना चातुम्महाराजिक देवता म्हणतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लक्ष्मी म्हणाली, ''असें जरी आहे तथापि सगळे सूज्ञ लोक माझ्या बाजूचे आहेत. त्याअर्थी माझाच हक्क या घाटावर अधिक पोहोंचतो.''

अशा रीतीनें त्यांचा वाद होऊन त्या परस्परांचें समाधान करूं शकल्या नाहींत. तेव्हां त्यांनीं ती फिर्याद आपल्या वडिलांकडे नेली. आपल्याच ह्या मुली, आणि आपणच हा न्याय कसा करावा. असें म्हणून त्यांनीं विरूढ व वैश्रवण या दोन दिग्पाळांवर यांचा निवाडा करण्याचें काम सोपविलें. ते म्हणाले, ''धृतराष्ट्र आणि विरूपाक्ष हे आमचेच सखे आहेत. त्यांचा आणि आमचा हुद्दा एकच आहे. तेव्हां त्यांच्या मुलींच्या खटल्याचा निकाल आम्ही कसा लावावा.''

असें म्हणून त्या दोघांना घेऊन ते थेट इंद्राजवळ गेले, आणि त्यांच्या खटल्याचा निकाल करण्यासाठीं त्यांनीं इंद्राला विनंती केली. आपल्याच दिग्पाळांच्या या मुली आहेत, आणि दोघींपैकी एकीच्या तर्फेनें न्याय दिला तरी दुसरीला वाईट वाटण्याचा संभव आहे असें जाणून इंद्रानें परस्पर न्याय करण्याची एक युक्ति योजिली. त्या काळीं वाराणसींत एक शुचिपरिवार नांवाचा सज्जन व्यापारी रहात असे. त्याला हें नांव पडण्याचें कारण असें होतें कीं, त्याचे चाकर नोकरहि सुशील असत. प्राणघात करावयाचा नाहीं, व्यभिचार, मद्यपान आणि असत्य भाषण करावयाचें नाहीं इत्यादि शीलांचे नियम तो सहपरिवार मोठ्या मनोभावानें पाळीत असे. त्याच्या घरीं त्यानें आपल्याच खोलीच्या शेजारीं एक सुशोभित खोली तयार केली होती, व तेथें एक अभिनव मंचक ठेविला होता. हेतु हा कीं, जर कोणी आपल्यापेक्षां शीलानें आणि योग्यतेनें मोठा गृहस्थ आपल्या घरीं आला तरच तो पलंग त्याच्या उपयोगासाठी द्यावा. ही गोष्ट इंद्राला माहीत होती. तो श्री आणि अवदसा या दोघींना, म्हणाला, ''वाराणसींतील शुचिपरिवार श्रेष्ठीच्या घरीं ज्याच्यावर कोणीच बसला नाहीं, असा एक मंचक आहे. त्यावर तुमच्यापैकीं जी बसूं शकेल, तिचाच हक्क अनवतप्‍त सरोवरांत प्रथमतः स्नान करण्याचा आहे असें समजा, आणि पुनः हा खटला घेऊन आमच्याकडे येऊं नका.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel