९१. सर्व पोटाचे दूत.

(दूतजातक नं. २६०)


वाराणसीच्या ब्रह्मदत्त राजाचें जेवणावर अत्यंत प्रेम होतें. तो नानातर्‍हेच्या पक्वान्नांनीं तृप्‍त होता असें नाहीं. तर तीं पक्वान्ने सर्व लोकांसमोर खाण्यांत त्याला मोठा आनंद वाटत असे. राजवाड्यासमोर मोठा मंडप उभारून त्यांत एका मंचकावर बसून तो जेवीत असे, आणि त्याच वेळीं अमात्य त्यांशीं राज्यकारभारासंबंधानें संभाषण करीत असे. एके दिवशीं एक ब्राह्मण, राजा जेवावयास बसला असतां धांवत पुढें गेला. राजाचे नोकर तलवार उगारून त्यास मारावयास धांवले. परंतु मी दूत आहें, मी दूत आहे, असें तो मोठ्यानें ओरडला. तेव्हां राजा म्हणाला, ''दूताला अभयदान असो. त्याला मारूं नका, किंवा पकडूं नका.'' (त्या काळीं दूत म्हटला कीं त्याला राज्यसभेंत शिरण्याची मोकळीक असे).

तो ब्राह्मण धावत जाऊन राज्याच्या शेजारीं बसला आणि तेथें दुसर्‍या एका ताटांत वाढून ठेवलेल्या पदार्थांवर ताव मारू लागला. दूत बुभुक्षित असावा असें वाटून राजानें त्याला आणखी पदार्थ वाढण्यास लावले. यथास्थित खाऊन तृप्‍त झाल्यावर त्याला राजा म्हणाला, ''आपण कोणत्या राजाकडून आलांत, आणि कोणत्या उद्देशानें आपल्या राजानें आपणास येथें पाठविलें ?''

ब्राह्मण म्हणाला, ''महाराज, मी कोणत्याहि राजाचा दूत नसून आपल्या प्रजाजनांपैकीं एक गरीब ब्राह्मण आहें.''

''तर मग मघाशीं तुम्ही दूत दूत असें कां ओरडलां ? या मिथ्या भाषणाबद्दल तुम्हाला कडक शिक्षा केली पाहिजे.''

ब्राह्मण म्हणाला, ''महाराज, मी खोटें बोललों नाहीं. मी माझ्या पोटाचा दूत आहें. क्षुधित पोटानें प्रेरणा केल्यामुळें मी आपणाजवळ आलों आहें; आणि आपण पोटासाठीं हा एवढा पसारा मांडला आहे तेव्हां आपणाला पोटाची किंमत काय आहे हें माहीतच आहे.''

राजाला त्या ब्राह्मणाचें भाषण ऐकून विस्मय वाटला. परंतु थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, ''भो ब्राह्मण, तूं जें बोललास तें यथार्थ आहे ! सर्व लोक पोटाचे दूत आहेतच ! त्यांत मी तर अगदींच हलक्या दर्जाचा आहें. कां कीं, केवळ पोटासाठीं मी हा एवढा खटाटोप मांडला आहे. आणि त्यांतच मला आनंद होत आहे ! या तुझ्या सुभाषितानें मला जागें केल्याबद्दल मी तुझ्या उदरदेवतेची सदैव तृप्ती होईल अशी व्यवस्था करून देतों.''

असें बोलून राजाने त्या ब्राह्मणाच्या पोटापाण्याची कायमची व्यवस्था करून दिली. आणि तेव्हांपासून जेवणाला अत्यंत महत्त्व देण्याचें सोडून दिलें, व तो प्रजाहितकारक झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel