९३. हीं कशाचीं फळें !
(सुजातजातक नं. ३०६)
एका राजानें एका सुस्वरूप माळ्याच्या मुलीशीं लग्न केलें होतें. राणी होण्यापूर्वी ती टोपलींत बोरें घेऊन विकावयास जात असे. पण राणी झाल्यावर तिचा थाटमाट फारच वाढला. जणूं काय ती स्वर्गांतून खालीं उतरली होती ! एके दिवशीं रंगमहालांत बसून राजा बोरें खात होता इतक्यांत ही राजाची आवडती राणी तेथें आली आणि राजाला पाहून म्हणाली, ''हां, ताटामध्यें कशाची फळें आहेत ? याचा आकार वाटोळा दिसतो. पण तीं कोणत्या झाडाचीं आहेत तें सांगतां येत नाहीं !'' हे राणीचे लाडके बोल ऐकून राजाला फार संताप आला; आणि तो म्हणाला ''प्रिये पूर्वी चिंध्या नेसून हींच फळें वेंचण्यांत तुझा सारा जन्म गेला आहे ! असें असून इतक्या अल्पावधींत तुला फळांचा विसर पडला ! तेव्हां राजभोगांनीं तुझी दृष्टी अंध झाली असली पाहिजे ! हलकट माणसाला राजोपभोग जिरत नसतात, अशी जी म्हण आहे, ती खोटी नाहीं ! आतां या तुझ्या रोगावर चांगला उपाय म्हटला म्हणजे पुनः तुझ्या बापाच्या घरीं पाठवून तुला माळ्याचें काम करावयास लावणें हा होय !'' राजा आपल्या नोकरांकडे वळून म्हणाला, ''अरे हिला हिच्या आईच्या घरीं नेऊन सोडा आणि तेथें तिला पूर्वीप्रमाणें माळणीचें काम करूं द्या !''
त्या वेळीं राजाचा अमात्य आमचा बोधिसत्त्व तेथें जवळच उभा होता. तो राजाला म्हणाला, ''अज्ञ माणसाच्या हातून चुका घडणें साहजिक आहे. राजसंपत्ती मिळाल्यानें साधारण माणसें बिघडून जातात, यांत कांहीं संशय नाहीं. तथापि आपण उदार असल्यामुळें इला एकवार क्षमा करणें योग्य आहे. यापुढें तिच्या हातून असा प्रमाद होणार नाहीं अशी मला आशा आहे.''
बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून राजाचा क्रोध शमन पावला आणि त्यानें राणीच्या मूर्खपणाबद्दल तिला क्षमा केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.