२२. दुष्टाला आश्रय देऊं नये.

(वेळुक जातक नं. ४३)


एकदां बोधिसत्त्व काशीराष्ट्रामध्यें एका मोठ्या धनाढ्य कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर प्रापंचित सुखें तुच्छ वाटून आणि वैराग्यसुख श्रेष्ठ वाटून त्यानें तापसवेश स्वीकारला व हिमालयाचा मार्ग धरिला. तेथें त्याची फार ख्याती होऊन त्याच्याजवळ पुष्कळ तपस्वी शिष्यभावानें राहूं लागले.

त्या प्रदेशांत एका तपस्व्याच्या आश्रमांत एके दिवशीं एक काळ-सर्पाचें पिल्लूं रांगत रांगत आलें. त्या तपस्व्याला त्याचें मोठें कौतुक वाटून त्यानें त्या बालसर्पासाठीं एक वेळवाचें नळकांडें तयार केलें, व त्यांत गवत वगैरे घालून त्या पोराची रहाण्याची सोय करून दिली. वेळूच्या नळकांड्यांत रहात असल्यामुळें त्या सापाला वेळुक असें नांव पडलें व त्या तपस्व्याला सर्व तपस्वी थट्टेनें वेळुकपिता असें म्हणूं लागले.

बोधिसत्त्वाला हें वर्तमान समजल्यावर तो त्या तपस्व्याजवळ गेला, आणि त्यानें त्याच्या या कृत्याचा निषेध केला. तो म्हणाला, ''कालसर्पाबरोबर तूं सहवास करितोस हें खरें आहो काय ?'' तपस्वी म्हणाला, ''होय महाराज, ही गोष्ट खरी आहे. माझें त्याच्यावर फार प्रेम आहे.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''भलत्यावर प्रेम करून त्याला आश्रय देणें हें मोठें धोक्याचें आहे. या सापाकडून तुझ्या जीविताला अंतराय घडला तर त्यांत मला मुळींच आश्चर्य वाटणार नाहीं.'' त्या तपस्व्याला बोधिसत्त्वाचा उपदेश रुचला नाहीं. त्यानें त्या सर्पाचा त्याग न करितां खाऊं पिऊं घालून तसाच वाढविण्याचा क्रम चालविला.

एके दिवशीं त्या भागांतील सर्व तपस्वी फळमूलाचा शोध लावण्यासाठीं दूरच्या प्रदेशांत गेले होते. तेथें चांगली फळें सांपडल्यामुळें त्यांनीं दोन तीन दिवस मुक्काम केला. पुनः परत आल्यावर वेळुकपित्याला आपल्या वेळुकाची आठवण होऊन तो त्या वेळूच्या नळकांड्याकडे धांवत गेला आणि हात पुढें करून मोठ्या सद्‍गदित स्वरानें म्हणाला, ''बाळा, वेळुका, आज दोन दिवस तुझी मीं हेळसांड केली. माझ्या वियोगानें तुला किती तरी दुःख झालें असेल. चल, बाहेर ये. मी तुला खाऊं घालतों.'' तो भुकेलेला सांप अत्यंत चवताळून वेळूच्या नळकांड्यांतून बाहेर पडला आणि कडाडून तपस्व्याच्या हाताला चावला ! बिचारा तपस्वी शेवटले शब्दहि उच्चारूं शकला नाहीं ! तो तेथेंच जमिनीवर पडून प्राणाला मुकला ! तें पाहून खळाला आश्रय दिल्याचें हें फळ आहे असें सर्व तपस्वी म्हणूं लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel