१०६. गेल्याचा शोक वृथा.

(मतरोदकजातक नं. ३१७)


एकदां आमचा बोधिसत्त्व एका मोठ्या श्रीमंत व्यापार्‍याच्या कुळांत जन्मला होता. लहानपणींच त्याचा बाप निवर्तल्यामुळें सर्व कुटुंबाचा भार त्याच्या वडील भावावर पडला. बोधिसत्त्व वयांत आल्यावरहि आपल्या वडील भावाच्याच आश्रयानें रहात असे. कांहीं काळानें एकाएकीं त्याचा वडील भाऊ मरण पावला. तेव्हां सर्व नातेवाईक मंडळी गोळा होऊन मोठ्या मोठ्यानें आक्रोश करूं लागलीं. परंतु बोधिसत्त्व मोठा विचारी असल्याकारणानें शोकापासून दूर राहिला. तेव्हां त्याचे नातलग म्हणाले कीं, भावाची सर्व सत्ता आपल्या हातीं आल्यामुळें याला आनंद झाला असावा. म्हणून हा रडत नाहीं किंवा शोक करीत नाहीं. तें ऐकून बोधिसत्त्व म्हणाला, ''गेल्याचा शोक करून कांहीं निष्पन्न झालें असतें तर मीहि तुमचें अनुकरण केलें असतें. मेलेला माणूस परत येत नाहीं. किंवा आपल्या शोकानें त्याला सद्‍गती मिळते असें नाहीं. तेव्हां त्याजबद्दल आक्रोश करून आपल्या जिवाला पीडा देण्यांत कोणता अर्थ बरें ? आणखी मी तुम्हाला असें विचारतों कीं, जर तुम्ही माझ्या भावाबद्दल शोक करितां तर मजबद्दल आणि तुम्हा परस्परांबद्दलही कां करीत नाहीं ? कां कीं, आम्ही सर्वजण मरणारच आहोंत. मेलेल्या माणसाबद्दल जर शोक करावयाचा तर जे मरणार आहेत त्याजबद्दल अधिकच शोक केला पाहिजे. असें असतां तुम्ही केवळ एकट्याच माझ्या मृत भावाला उद्देशून रडत आहां हें आश्चर्य नव्हें काय ? अशा प्रसंगीं शोकाचा आपल्या मनावर पगडा बसवूं न देणें हें सुज्ञ माणसाचें कर्तव्य आहे. आणि त्याबद्दल जरी अडाणी लोकांनीं दोष दिला तरी त्याला भिण्याचें कांहीं कारण नाहीं.''

या प्रमाणें बोधिसत्त्वानें आपल्या उपदेशानें नातलगांना शोकापासून मुक्त केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel