कांहीं दिवस राजकुमार आणि ते तीन प्राणी बोधिसत्त्वाच्या आश्रमांत राहिले, व पाऊस कमी झाल्यावर आणि अंगीं ताकत आल्यावर तेथून आपापल्या ठिकाणी जावयास निघाले. जातांना सर्प बोधिसत्त्वाला म्हणाला, ''तापसमहाराज, तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केला आहे. तो सर्वस्वी जरी मला फेडतां येणें शक्य नाही, तथापि मी भिकारी नाहीं. माझ्या बिळाजवळ पूर्वजन्मी पुरून ठेविलेलें पुष्कळ धन आहे. जर तुम्हाला त्या धनाचा उपयोग होण्यासारखा असेल, तर तुम्ही माझ्या बिळाजवळ येऊन मला हे सर्पा अशी हांक मारा म्हणजे मी तुम्हास ती जागा दाखवून देईन.'' असें बोलून व आपल्या बिळाची जागा कोणत्या ठिकाणीं हें बोधिसत्त्वाला समजावून देऊन सर्प तेथून निघून गेला.

नंतर उंदीर पुढें येऊन म्हणाला, ''महाराज आपले उपकार मी कधींही विसरणार नाहीं. पूर्वजन्मी ३० कोटी कार्षापण मी गाडून ठेविले आहेत. या धनानें जर तुमच्या उपकाराची थोडीबहुत फेड होण्यासारखी असेल, तर तें सर्व मी तुम्हास देण्यास तयार आहे. तुम्ही माझ्या बिळाजवळ येऊन मला उंदीर म्हणून हांक मारा म्हणजे मी तुम्हाला माझा ठेवा दाखवून देईन.'' असें बोलून व आपला पत्ता बोधिसत्त्वाला सांगून तोही सर्पाच्या मागोमाग निघून गेला.

तेव्हां पोपट म्हणाला, ''महाराज, माझ्याजवळ धनद्रव्य कांहीं नाहीं. पण तुम्हाला जर तांदुळांची जरून लागेल तर माझ्या रहाण्याच्या जागीं येऊन मला पोपटा म्हणून हाक मारा. मी आपल्या जातभाईंना सांगून हिमालयांतून उत्तम साळीचीं कणसें वाटेल तेवढीं तुम्हाला आणून देत जाईन.'' आपला पत्ता सांगून तोहि तेथून उडून गेला.

तदनंतर दुष्ट राजकुमार म्हणाला, ''भदंत, मी जर राजा झालों, तर तुम्ही वाराणसीला या. मी तुमची सर्व व्यवस्था लावून देईन. व तुम्हाला मोठ्या सत्कारानें माझ्या राज्यांत ठेऊन घेईन.'' असें सांगून तोहि आपल्या राजधानीला गेला.

पित्याच्या मरणानंतर या राजकुमाराला गादी मिळाल्याचें वर्तमान बोधिसत्त्वाला समजलें. तेव्हां त्याची आणि त्याजबरोबर सर्प, उंदीर आणि पोपट या सर्वांची परीक्षा पाहण्यासाठीं तो आश्रमांतून निघाला, व प्रथमतः सर्प रहात होता त्या ठिकाणीं आला. सर्पा, म्हणून हाक मारल्याबरोबर बोधिसत्त्वाचा शब्द ओळखून सर्प बिळांतून बाहेर पडला, व नमस्कार करून बोधिसत्त्वाला म्हणाला, ''भदंत, या ठिकाणीं चाळीस कोटी कार्षापण आहेत. ते आपल्या सवडीप्रमाणें घेऊन जा.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''ठीक आहे. जेव्हां मला गरज पडेल, तेव्हां या गोष्टीचा विचार करितां येईल. सध्यां तूं येथेंच रहा.''

सर्पाला मागें फिरवून बोधिसत्त्व उंदीराजवळ गेला, व त्याला हाक मारून त्यानें बाहेर आणिलें. सर्पाप्रमाणें उंदिरानेंहि बोधिसत्त्वाचें उत्तम आदरातिथ्य केलें, व आपल्याजवळ असलेलें धन घेऊन जाण्यास विनंती केली. त्याला तेथेंच राहण्यास सांगून बोधिसत्त्व पोपटाजवळ गेला. बोधिसत्त्वाला पाहून पोपट झाडाच्या अग्रावरून खालीं उतरला व नमस्कार करून म्हणाला, ''भदंत, तुम्हाला उत्तम तांदुळाची गरज असेल, तर माझ्या जातभाईंबरोबर हिमालयावर जाऊन मी तेथें आपोआप वाढणार्‍या साळींची कणसें घेऊन येतों.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel