७१. वानराचें दूरदर्शित्व.

(तिण्डुकजातक नं. १७७)


एका जन्मीं बोधिसत्त्व वानरयोनींत जन्म पावून वयांत आल्यावर एका मोठ्या वानरसमुदायाचा राजा झाला होता. तो अरण्यांत रहात असे, त्याच्याजवळच एक टेंभुर्णीचा मोठा भव्य वृक्ष होता. त्या वृक्षाच्या आसपास वर्षांतून कांहीं दिवस एक गांवच वसत असे व कांहीं दिवस तेथें कोणीहि रहात नसत. तेव्हां तेथें लोकांची वस्ती नसे, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या परिवारासह जाऊन त्या वृक्षाचीं फळें यथेच्छ खात असे. परंतु एका वर्षी अशी गोष्ट घडली कीं त्या वृक्षाला फळें येण्याची आणि लोकांची वसाहत होण्याची एकच गांठ पडली तेव्हां बोधिसत्त्वाला तेथें जाण्याचें सोडून देणें भाग पडले. पण त्याच्या काळपांतील वानरांना ही गोष्ट आवडली नाहीं. ते म्हणाले ''आम्हीं प्रतिवर्षी त्या झाडाची गोड फळें खात आलों आहों. आतां त्यांच्या आसपास माणसांची वस्ती झाली म्हणून फळें खाण्याचें सोडून देणें हा नामर्दपणा आहे. दिवसा लोक माध्यान्हसमयीं निजत असतात, त्यावेळीं हळूच जाऊन आपण फळें खाऊन घेऊं.'' बोधिसत्त्वानें वानरगणांचें मन वळवण्याचा पुष्कळ खटाटोप केला. परंतु बहुमतापुढें त्याचें कांहीं चाललें नाहीं तेव्हां त्यानें तेथें जाण्याचा ठराव केला, आणि एकांती सेनक नांवाच्या आपल्या भाच्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''बा सेनका, तूं देखील इतर वानरासारखा फळलोभी आहेस काय ?''

सेनक म्हणाला, ''आपल्या आज्ञेपुढें मला दुसर्‍या कोणत्याहि वस्तूची चाड वाटत नाहीं. आपण जर सांगाल तर मी केवळ पाणी पिऊन देखील राहीन.''

यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''मी या गणाचा राजा असल्यामुळें मला यांच्याबरोबर गेलेंच पाहिजे. जर का मी मागें राहिलों तर मला भ्याड म्हणून हे माझी निंदा करतील; आणि माझ्याविषयीं त्यांची आदरबुद्धि पार नष्ट होईल. म्हणून आज आम्हीं फळें खावयास जाऊं त्यावेळीं तूं मागें रहा, आणि जर आम्हीं संकटांत सांपडलों असें दिसलें, तर मी सांगतों त्या उपायानें आम्हांला त्या संकटांतून सोडव.''

बोधिसत्त्वाची आज्ञा सेनकानें मान्य केली. बोधिसत्त्वानें आपण संकटांत सांपडलों तर कोणती युक्ती योजावी या संबंधानें त्याला नीटपणें सर्व कांहीं सांगून ठेविलें. आणि वानर-गणांला घेऊन दुपारच्या प्रहरीं तो त्या वृक्षावर फळें खात बसला. उन्हाळा फार असल्यामुळें सर्व लोक आपापल्या झोपडींत विश्रांती घेत बसले होते; किंवा कांहींजण झोपीं गेले होते. परंतु कांहीं कारणानिमित्त त्यांतील एकजण झोपडीच्या बाहेर आला, आणि पहातो तों टेंभुणींचें झाड माकडांनीं भरून गेलेलें ! त्यानें सर्व लोकांना उठवून जागें केलें, आणि त्या सर्वांनीं शस्त्रास्त्रें घेऊन त्या वृक्षाला वेढा दिला. वानरगणाची पांचावर धारण बसली. ते गयावया करीत बोधिसत्त्वाला म्हणाले, ''महाराज, आपली सल्ला आम्हीं मानिली असती तर या संकटांत सांपडलों नसतों. आम्हींच अशा कचाट्यांत सांपडलों असें नाहीं, पण आपणाला देखील आम्ही दुःखांत पाडलें आहे !''

बोधिसत्त्व म्हणाला, ''आतां झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यांत अर्थ नाहीं. तुम्ही धीर धरा. माझा भाचा सेनक मागें राहिला आहे. तो आम्हाला या संकटांतून मुक्त करील.''

बोधिसत्त्वानें धीर दिला नसता, तर ते माकड गर्भगळित होऊन खाली पडले असते, व प्राणाला मुकले असते.

इकडे सेनक त्या गांवाबाहेर आपल्या जातभाईंची काय वाट होते हें पहात बसला होता. सर्व मर्कटसमुदायाला सशस्त्र मनुष्यांनीं वेढलेलें पाहून त्यानें मामानें शिकवलेली युक्ति अंमलांत आणली. झोंपडींत शिरून तेथें जळत असलेली आगीची कोलीत घेऊन त्यानें दोन चार झोंपड्या पेटवून दिल्या ! आग जिकडे तिकडे फैलावत चालल्यामुळें गांवांतील बायकामुलांत एकच हाहाःकार उडाला. माकडांला घेरा घालून राहिलेले लोक आपलीं शस्त्रास्त्रें घेऊन आग लागली होती त्या दिशेनें ती विझवण्याला मदत करण्यासाठीं धावत सुटले, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या समुदायासह तेथून कांहीं एक इजा न होतां पळून गेला. सर्व मर्कटगणानें त्याच्या दूरदर्शित्वाची फार तारीफ केली. बोधिसत्त्वानेंहि सेनकानें आपली आज्ञा पाळली म्हणून त्याचा योग्य गौरव केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel