१६. कलहस्थानीं राहूं नये.
(सकुण जातक नं. ३६)
एकदां बोधिसत्त्व पक्षाच्या कुळांत जन्मला व वयांत आल्यावर मोठ्या पक्षिसमुदायासह एका विस्तीर्ण वृक्षावर राहूं लागला. एके दिवशीं त्या वृक्षाच्या दोन शाखा परस्परांवर घांसल्या जाऊन त्यांतून धूर निघूं लागला. तेव्हां बोधिसत्त्व पक्षिसमुदायाला म्हणाला, ''गडे हो, ज्या वृक्षाच्या आश्रयाला आम्हीं रहात आहों, त्याच्या शाखांतून हा धूर निघत आहे. म्हणजे येथे अनुकम्पेच्या ऐवजीं घर्षण होऊं लागलें आहे. ह्याचा परिणाम असा होणार आहे कीं, ह्या फांद्यांच्या घर्षणानें आग उत्पन्न होऊन सर्व वृक्ष नाश पावणार. म्हणून ह्या स्थानीं न रहातां आपण दुसर्या ठिकाणीं जाऊं.''
बोधिसत्त्वाचा उपदेश ज्यांना रुचला, ते त्याच्याबरोबर आपल्या पोराबाळांसह दुसरीकडे निघून गेले. पण आपणास शहाणे समजणारे दुसरे होते, ते म्हणाले, ''हा थेंबभर पाण्यांत मगर पहातो. अशा प्राण्याच्या उपदेशानें आम्हीं इकडे तिकडे फिरूं लागलों तर आम्हांस सुखशांति कधींच मिळावयाची नाहीं.''
परंतु बोधिसत्त्वानें केलेलें भविष्य खरें झालें. एकाएकीं त्या फांद्यांतून आग निघाली, व त्या वृक्षानें पेट घेतला. तेथें राहिलेले पक्षी अकालीं दुसर्या ठिकाणीं जाऊं शकले नाहींत, व ते आगींत पडून जळून मेले.
१७. वृद्धसेवा.
(* तित्तिर जातक. नं. ३७)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ही गोष्ट चुल्लवग्गांतहि सांपडते.

प्राचीन काळीं हिमालय पर्वतावर एक तित्तिर पक्षी, एक वानर व एक हत्ती एका भव्य वडाच्या आश्रयानें रहात असत. परंतु त्यांच्यांत असावें तसें ऐक्य नव्हतें; परस्परांविषयीं अनुकम्पा नव्हती. हा प्रकार तसाच चालणें इष्ट नसल्यामुळें त्यांनी असा विचार केला कीं, जो आपणांस वडील असेल त्याच्या सल्ल्यानें वागावें. तेव्हां वानर हत्तीला म्हणाला, ''काय हो, तुम्ही ह्या वटवृक्षाला किती दिवसांपासून पहातां ? हत्ती म्हणाला, ''जेव्हां हा वडाचा रोपा अगदी लहान होता, तेव्हां माझ्या बालपणीं मी त्याला पोटाखाली घालून वरून जात होतों. पण वानरदादा, तुम्हीं ह्या झाडाला केव्हांपासून ओळखतां ?''
वानर म्हणाला, ''मी माझ्या लहानपणीं ह्या वडाच्या रोपाच्या अगदी अग्र-शाखेचीं पानें जमिनीवर उभा राहून तोडीत होतों. तेव्हांपासून ह्या झाडाला मी ओळखतों. पण तित्तिरदादा, तुम्हीं ह्याला किती दिवसांपासून पाहतां ?''
तित्तिर म्हणाला, ''येथून बर्याचशा अंतरावर एक वडाचें झाड होतें. त्याचीं फळें खाऊन मी ह्या ठिकाणी शौचविधि करीत असे. त्यामुळें हें झाड येथें उगवलें; व तेव्हांपासून मी ह्या झाडाला ओळखत आहे.''
ह्यावरून तित्तिरपक्षी त्या तिघांत वडील होता हें सिद्ध झालें, व तेव्हांपासून वानर व हत्ती तित्तिर पंडिताच्या सल्ल्यानें वागूं लागलें. तेणेंकरून त्या तिघांचेंहि त्या ठिकाणीं वास्तव्य फारच संतोषजनक झालें. तित्तिरपंडित आमचा बोधिसत्त्व होता हें निराळें सांगण्याचें कारण नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.