७२. जन्मभूमीचा फाजील अभिमान.

(कच्छपजातक नं. १७८)


बोधिसत्त्व एकदां काशीराष्ट्रांत कुंभाराच्या कुलांत जन्मून थोर झाल्यावर मातीची भांडीं करून आपला निर्वाह करीत असे. त्याच्या गांवाजवळ एक मोठें सरोवर होतें. तें उथळ असल्यामुळें त्यांत उन्हाळ्यांत फार पाणी रहात नसे. पावसाळ्यांत नदीला पूर आल्यावर तें तुडुंब भरून जाई. परंतु पूर ओसरून गेल्यावर त्यांतलें पाणी हळु हळु कमी होत जाई व कधीं कधीं तें अगदीं ठणठणीत कोरडें पडत असे. पुराच्या वेळीं त्या सरोवरांत पुष्कळ मासे येत असत. परंतु ज्या वर्षी तें तळें कोरडें पडण्याचा संभव असे त्या वर्षी ते पूर ओसरण्याच्या आधींच नदीला जाऊन मिळत. एका वर्षी पाऊस थोडा पडल्यामुळें सरोवरांत पाणी रहाण्याचा संभव दिसेना. तेव्हां सर्व मत्स्य कच्छप तेथून निघून नदीच्या प्रवाहांत गेले. परंतु एक कांसव तेथेंच राहिला. त्याचे मित्र त्याला म्हणाले, ''बाबारे, सर्व मत्स्यजाती तलाव कोरडा पडण्याचें चिन्ह पाहून येथून निघून जात आहेत. मग तुझा एकट्याचा रहाण्याचा हट्ट कां ?''

तो म्हणाला, ''तुम्हाला तुमच्या जन्मभूमीची मुळींच काळजी नाहीं. उगाच कुशंका मनामध्यें आणून आपल्या जन्मभूमीचा त्याग करण्याला तुम्हाला लाज वाटत नाहीं. मी माझ्या जन्मभूमीची सेवा करीत येथेंच रहाण्याचा निश्चय केला आहे.''

त्याचे मित्र आणि आप्‍तइष्ट त्याचें मन वळवूं शकले नाहींत. ते त्याला एकट्यालाच तेथें सोडून चालते झाले. दूरदशीं माशांनीं भविष्य केल्याप्रमाणें त्या वर्षी त्या तळ्यांतील पाणी पार आटून गेलें ! बोधिसत्त्व त्याच तळ्यांतील चिखल नेऊन भांडीं करीत असे. कांसवाला पाणी न मिळाल्यामुळें तो चिखलांत रुतून राहिला. बोधिसत्त्व चिखल उकरीत असतां कुदळीचा धक्का लागून त्याचें कवच फुटलें, आणि तो वर येऊन तळमळत पडला. बाधिसत्त्वाला त्याची ही दीनदशा पाहून अत्यंत कींव आली आणि तो म्हणाला, ''बा, कांसवा तुझा मी मोठा अपराध केला आहे. तूं चिखलांत आहेस, हें न जाणतां त्याच्यावर मी घाव घातला आणि तुझें कवच फोडून टाकलें याबद्दल तूं मला क्षमा कर.''

कासव म्हणाला, ''बा कुंभारा, तुझा यांत कांहींच अपराध नाही. येवींतेवीं भक्ष्य न मिळाल्यामुळें मी या चिखलांत प्राणाला मुकलोंच असतों. तूं माझें मरण जवळ आणलेंस येवढेंच काय तें. आपल्या जन्मभूमीचा फाजील अभिमान धरून जे तिला चिकटून बसतात त्यांची हीच गत होते ! माझ्या या विपत्तीपासून लोकांनीं शिकण्यासारखा धडा म्हटला म्हणजे जेथें आपलें पोट भरून सुखानें वास करतां येईल तीच आपली खरी जन्मभूमी समजली पाहिजे. उगाच फाजील अभिमान धरून जातस्थलीं मरून जाणें यांत मुळींच पुरुषार्थ नाहीं.''

हे उद्‍गार काढून कासवानें तेथेंच प्राण सोडला. बोधिसत्त्वानें घरीं येऊन ती गोष्ट आपल्या ज्ञातिबांधवांस सांगितली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel