५०. दुर्जनाचे प्रत्युपकार.

(असंपदानजातक नं. १३१)


प्राचीन काळीं राजगृह नगरींत मगध नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व त्याच राजधानींत महाश्रेष्ठीच्या पदाला पावला होता. त्याला शंखश्रेष्ठी म्हणत असत. वाराणसी नगरींत त्याचा बालमित्र पिलियश्रेष्ठी नांवाचा एक सधन व्यापारी रहात असे. कांहीं कारणानें त्या पिलियश्रेष्ठीवर मोठी आपत्ति येऊन त्याची सर्व धन दौलत बुडाली. तेव्हां तो आपल्या बायकोला बरोबर घेऊन पायीं राजगृहाला आला व शंखश्रेष्ठीला भेटला. शंखश्रेष्ठीनें त्याचा बहुमान केला, आणि आपल्या गृहीं त्याची सर्व प्रकारें बरदास्त ठेविली. अशा स्थितींत वाराणसीहून येथवर चालत येण्याचें कारण काय असा शंखश्रेष्ठीनें प्रश्न केला तेव्हां पिलिय म्हणाला, ''मी समुळ बुडालों आहे. माझी धनदौलत माझ्या धनकोंनीं घेतली. दुसरा कोणी मदतगान न राहिल्यामुळें मला तुमची आठवण आली. व माझ्या कुटुंबासह मी येथवर पायीं चालत आलों.''

शंखश्रेष्ठी म्हणाला, ''तुम्ही येथवर येण्याची मेहेरबानी केली हें फार चांगलें झालें. आमच्या बालमैत्रीची कसोटी पाहण्यास तुम्ही मला चांगली संधि दिली.''

याप्रमाणें संभाषण झाल्यावर शंखश्रेष्ठीनें आपली तिजोरी उघडून आंतील द्रव्याचे बरोबर दोन भाग केले व एक भाग पिलियश्रेष्ठीला दिला, व त्याचप्रमाणें आपले दासीदास हत्ती घोडे वगैरे सर्व मालमत्तेचे दोन विभाग करून त्यांतील एक पिलियश्रेष्ठीला दिला, व मोठ्या गौरवानें त्याला वाराणसीला रवाना केलें.

कांहीं वर्षे लोटल्यावर शंखश्रेष्ठीवर अवदशेचा घाला आला. सर्व संपत्ति नाश पावली. राजगृहांत राहण्याला देखील त्याला लाज वाटूं लागली. तेव्हां अर्थातच पिलियश्रेष्ठीची त्याला आठवण झाली. आपल्या बायकोला बरोबर घेऊन पिलियश्रेष्ठीला भेटण्यासाठीं तो वाराणसीला गेला. रात्रीं शहराबाहेरील धर्मशाळेंत उतरून सकाळीं शहरांत प्रवेश करण्यापूर्वी तो आपल्या पत्‍नीला म्हणाला, ''भद्रे, तूं माझ्याबरोबर न येतां येथेंच रहा. तुला रस्त्यांतून पायीं आणल्याबद्दल पिलियश्रेष्ठी माझ्यावर फार रागावणार. पुरुष अनवाणी चालले तरी त्यांना कोणी नांवे ठेवणार नाहीं. परंतु तुझ्यासारख्या कुलीन स्त्रीला भर रस्त्यांतून अनवाणी चालत नेलें असतां लोक नांवें ठेवतील.''

तिला ही गोष्ट पसंत पडली. शंखश्रेष्ठी एकटाच आपल्या मित्राजवळ गेला. पिलियश्रेष्ठीच्या वाड्याच्या दरवाजावर खडा पहारा होता. तेव्हां शंखश्रेष्ठीला आंत जाण्याची मोकळीक नव्हती. त्यानें दरवाजावरून आपण आलों आहों असा निरोप पाठविला, व आपला मित्र आपणाला कडकडून आलिंगन देण्याला येईल अशी कल्पना करीत वाट पहात उभा राहिला. परंतु पिलियानें वर यावें असा जबाब पाठविला. वर जाऊन पाहतों तों पिलीय खुशाल लोडाला टेंकून बसलेला होता ! तो तेथूनच शंखश्रेष्ठीला म्हणाला, ''काय ! कोठें आलांत ?'' आपणाला बसावयास आसन देखील मांडलेलें नाहीं हें पाहून शंखश्रेष्ठीला अत्यंत विस्मय वाटला ! तथापि मोठ्या गंभीरपणें तो म्हणाला, ''मित्रा, दैवाची गति विचित्र आहे. माझ्या अफाट संपत्तीचा इतक्या लौकर नाश होईल असें मला स्वप्नांतहि वाटलें नव्हतें. परंतु आज मी कवडीला महाग होऊन या ठिकाणीं चालत आलों आहे. माझ्या स्त्रीलाहि मी बरोबर आणलें आहे. पण तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तिला धर्मशाळेंतच ठेऊन आलों आहें.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel