८४. अधिकार्‍याचे चार गुण.

(धम्मद्धजजातक नं. २२०)


प्राचीन काळीं वाराणसी नगरींत यशपाणी नांवाचा राजा राज्य करीत असे. काळक नांवाचा त्याचा सेनापती होता, आणि आमचा बोधिसत्त्व त्याच्या पुरोहिताचें काम करीत असे. राजा धार्मिक होता; परंतु काळक सेनापती लांच घेऊन न्यायाचा भलताच निवाडा करीत असे. एके दिवशीं एका खटल्यांत काळकानें खोटा निकाल दिला. तेव्हां नुकसान झालेला मनुष्य रडत रडत रस्त्यांतून जाऊं लागला. वाटेंत त्याची आणि बोधिसत्त्वाची गांठ पडली. बोधिसत्त्वानें रडण्याचें कारण विचारल्यावर तो म्हणाला, ''साक्षी पुरावा कांहीं एक न घेतां माझ्या शत्रूकडून माझें सर्वस्वी नुकसान झालें आहे. आणि शोक अनावर होऊन मी आसवें गाळीत चाललों आहे.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझा जो कांहीं साक्षी पुरावा असेल तो घेऊन तूं आतांच न्यायाधिशाच्या कचेरींत ये, म्हणजे मी तुझ्या खटल्याची पुनः चौकशी करतों. त्याप्रमाणें बोधिसत्त्वानें उभयपक्षाला न्यायकचेरींत बोलावून आणून कायदेशीरपणें खटल्याची चौकशी करून योग्य निकाल दिला. बोधिसत्त्वाचा निकाल सभास्थानांतील लोकांना इतका मानवला कीं, त्यांनीं त्याच्या नांवाचा जयघोष करून त्याला धन्यवाद दिले. ही बातमी शहरांत सर्वतोमुखी झाली. दुसर्‍या दिवशीं बोधिसत्त्व राजदर्शनाला गेला असतां राजा म्हणाला, ''बा पंडिता, काल तूं सभास्थानांत योग्य निवाडा दिला अशी बातमी सर्व ठिकाणीं पसरली आहे ती खरी आहे काय ?'' बोधिसत्त्वानें इत्थंभूत वर्तमान सांगितल्यावर राजा म्हणाला, ''काळकासारख्या मोठ्या पदवीच्या माणसानें न्यायाचा चुराडा करावा ही गोष्ट आमच्या राज्याला मोठी लांछनास्पद आहे. यापुढें न्यायसभेचें अध्यक्षस्थान स्वीकारून तूंच सर्व खटल्यांत निकाल देत जा. आजपासून काळकाला न्यायसभेंत जाण्याची मी मनाई करतों.

राजानें सांगितल्याप्रमाणें त्या दिवसापासून बोधिसत्त्व न्यायाधिशाचें काम करूं लागला. त्याला तें काम आवडत होतें असें नाहीं. परंतु राजाज्ञेवरून केवळ परोपकारासाठीं तो तें करीत असे; आणि आपल्या हांतून चूक घडूं नये याबद्दल तो फार काळजी घेत असे. अधिकाराची लालसा आणि द्रव्याचा लोभ नसल्यामुळें त्याचे निकाल चोख असत, व त्यायोगें सर्व राष्ट्रांतील लोकांना तो अत्यंत पूज्य वाटूं लागला. परंतु त्याची उत्तरोत्तर वाढत चाललेली कीर्ति काळकाच्या डोळ्यांत सलूं लागली आणि त्याच्या नाशाच्या शोधार्थ तो आपली बुद्धि खर्च करूं लागला. एके दिवशीं राजापाशीं जाऊन तो घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला, ''महाराज, पुरोहित तुमचा नाश करूं पहात आहे. सगळ्या राष्ट्रांतींल लोकांना वश करून घेण्याची त्यानें खटपट चालविली आहे. राजाला ती गोष्ट खरी वाटली नाहीं. पण राजाचा स्वभाव जरा संशयी होता, आणि हें वर्म काळकाला माहीत होतें. तो म्हणाला, ''महाराज, जर आपला माझ्यावर विश्वास नसेल तर शहरांत फिरत असतां आपण त्याच्यावर नजर ठेवा म्हणजे त्याला लोक कितपत वश आहेत हें तेव्हांच दिसून येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel