त्याच्या मागोमाग गरुडांचा राजा साधूच्या दर्शनाला आला. साधुबोवांची मुद्रा प्रफुल्लित झालेली पाहून नागाचें वर्म त्याला समजलें असावें असें सहज अनुमान करितां आलें व त्याप्रमाणें तपस्व्यानें घडलेली इत्थंभूत गोष्ट सुपर्ण राजाला निवेदन केली. सुपर्णराजानें पहिला प्रयोग पंडरावरच करून पहावा असा निश्चय करून साधुमहाराजाचा घाईघाईनें निरोप घेऊन तो तसाच नागराजाच्या मागें लागला. नागराजा कृत्रिमवेष टाकून नागाच्या रूपानें नुकताच नागभवनांत प्रवेश करीत होता. तोंच सुपर्णराजानें त्याची शेवटी पकडली. नागराजानें मोठमोठाले पाषाण गिळले पण त्याचा उपयोग काय. त्याला वर उचलल्याबरोबर ते आपोआप खालीं पडले व शेपटी वर आणि तोंड खालीं अशा स्थितींत गरुडाच्या पंजांत पकडला गेलेला तो अंतरिक्षांत लोमकळत राहिला. तेव्हां मोठमोठ्यानें आक्रोश करून तो म्हणाला, ''या अत्यंत नीच तपस्व्यावर भक्ति ठेवून मी या स्थितीला पोहोंचलों आहे. जो कोणी आपलें परमगुह्य दुसर्‍याला सांगेल त्याची स्थिती माझ्यासारखीच होणार आहे. हे सुपर्णराज, मी आतां तुलाच शरण येतों तूंच मला या संकटांतून पार पाड.''

गरुड म्हणाला, ''पण आपलें गुह्य दुसर्‍याला सांगू नये ही गोष्ट तुला पूर्वीच समजावयास पाहिजे होती. आतां झालेली गोष्ट होऊन गेल्यावर मग शोक करण्यांत काय फायदा ?'' नागराजा म्हणाला, ''मी आतां मुळींच शोक करीत नाहीं. माझ्या मूर्खपणाचें मला हें प्रायश्चित्त मिळालें आहे. तथापि मी जसा नागांचा राजा आहे तसा तूं सुपर्णांचा राजा आहेस आणि तुझ्यासारख्या थोर व्यक्तीशी याचना करण्यास मला मुळींच लाज वाटत नाहीं. आता मला पुत्राप्रमाणें समजून जीवनदान द्या.''

गरूड म्हणाला ''शास्त्रांत तीन प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. एक औरस, दुसरा शिष्य आणि तिसरा दत्तक. तेव्हां यांपैकीं दत्तकपुत्रांत तुझी गणना करून मी तुला जीवदान देतों.'' असें म्हणून गरुडराजानें त्याला खाली ठेविलें व सुखानें नागभवनास जाण्यास सांगितलें. आणखी निरोप देतेवेळीं गरुड त्याला म्हणाला ''झालेल्या गोष्टीपासून धडा शीक आणि जो आपला साधारण परिचित असेल त्यावर एकाएकीं विश्वास टाकू नकोस.'' नागराजा गरुडाला वंदन करून आपल्या नागभवनाला गेला.

कांहीं काळ लोटल्यावर गरुड त्याची परीक्षा पहाण्यासाठी नागभवनाला आला. सुपर्णराजाशीं सख्य झाल्यामुळें नागराज आपल्या भवनांत स्वैच्छ विहार करीत होता. गरुडानें जणूं काय आपण त्यावर झडप घालीत आहे असा आव आणला. तेव्हां नागराजा मोठमोठाले पाषाण गिळून व शेपटी दडवून मोठ्यानें फुत्कारे टाकीत फणा वर करून बसला. तें पाहून गरूड म्हणाला ''मी तुझा मित्र झालों असतां तूं एवढी सावधगिरी कां आरंभिली आहेस ?'' नागराजा म्हणाला ''सुपर्णराजा, आपल्या उपदेशाला अनुसरून मी वागत आहे. प्रतिपक्षाचा विश्वास धरूं नये असा आपणच मला बोध केलात तेव्हां आपली झडप माझ्यावर पडून पुनः शरण येण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून ही माझी तयारी आहे.''

गरुडानें त्याला शाबासकी दिली आणि ते दोघे वेष पालटून त्या तपस्व्यापाशी आले. व पंडरक त्याला म्हणाला ''तूं माझा विश्वासघात करून माझ्यावर अत्यंत बिकट प्रसंग कां आणलास ?'' तपस्वी म्हणाला ''जरी तूं मला प्रिय आहेस तथापि सुपर्णराजानें प्रेम संपादन केल्यानें विशेष कल्याण होईल असें वाटून तुझें गुह्य त्याला सांगितलें.'' त्याच्या डोक्याचे सात तुकडे होवोत असा नागराजानें श्राप दिला. तत्क्षणींच करंभय तपस्व्याचें शिर सत्पधा भिन्न झालें व तो तेथेंच मरण पावला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel