"होय, समजलास तूं आतां. तुला नाग व आर्य यांच्यांत द्वेषांचे वणवे पेटणार असें दिसत आहे. परंतु हे द्वेष जातील. पोटांतील विष बाहेर पडलेलें बरें. होऊं दे एकदां द्वेषाची वांति ! परंतु ह्या द्वेषाच्या प्रदर्शना-बरोबर परस्पर प्रेमाचे संबंध उत्पन्न व्हावेत म्हणून बहुजनसमाजाला तहान लागली आहे. सामान्य आर्य जनता व सामान्य नाग जनता गुण्यागोविंदानें नांदत आहें. त्यांच्यात लग्ने होत आहेत. प्रतिष्ठित लोक अलग राहूं पहात आहेत; परंतु सामान्य जनता एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य जनतेच्या या आशा-आकांक्षांतून महान् तेज उत्पन्न होईल. महान् शक्ति उत्पन्न होईल. द्वेषाची शक्ति फार नसते. अनंत अंधाराला एक प्रकाशकिरण येतो व मुकेपणानें दूर करतो. अनंत द्वेषाला निर्मळ प्रेमसूर्याचा एक प्रभावी किरण येईल व नष्ट करील. घाबरूं नकोस तूं. ज्या वेळीं अत्यंत निराशा वाटेल, त्याच वेळी श्रध्देने आशा राख. आपल्या थोर हेतूंबद्दलची जी श्रध्दा, तिची अशा वेळींच फार जरुरी असते. विरोधाच्या वेळीं, तीव्र विरोधाच्या वेळींहि जो आपल्या मंगलमय प्रसंगांतच गढून राहतो व क्षण नि क्षण त्याला देतो, तोच खरा श्रध्दावान्. ध्येय जितकें मोठें तितका पंथ लांबचा व बिकट.
मी पुन्हां चिंतनांत बुडी मारतो. प्रयोगाची ही पहिली अवस्था यशस्वी झाली की मला हांक मार. यश येईलच येईल. माझ्या दृष्टीला यश दिसत आहे. पहिलीच पायरी चढणें कठिण, पहिलेंच पाऊल टाकणें कठिण ! एकदां मूल दोन पावलें चालूं लागलें की समजावें, पुढे हे शेकडों कोस सहज चालून जाईल ! हिमालय चढून आकाशाला हात लावील ! समजले ना ? मारूं चिंतनसिंधूत बुडी ?' प्रभूनें प्रेमाने विचारले.
"मारा, देवा, बुडी. चिंतनात रमून जा. मी करतो हा महान् प्रयोग. आतां नाही एवढयातेवढयाने घाबरणार. आर्य व नाग जात यांचा मधुर संगम झाला, यांचे मधुर मीलन झाले की उठवीन हळूच तुला. बीजाला फुटलेले पहिले सुंदर अंकुर, प्रयोगाला आलेलें पहिलें थोडें यश तुला दाखवून तुझे नवे आशीर्वाद घेऊन मग आणखी पुढें प्रयोग करूं. एक दिवस असा मग येईल की, ह्या भव्य भारतभूमीत, सागराच्या सान्निध्यांत, हिमालयाच्या छायेखाली, विविध प्रकारच्या वृक्ष-वनस्पतींच्या जवळ, स्वच्छ आकाशांतील सुंदर प्रकाशांत विविध संस्कृतींतील मानव प्रेमानें एकत्र नांदत आहेत ! 'प्रयोगपति अमर आशेंने म्हणाला.