ते तक्षक कुळांतील नाग जात ना. तेव्हा प्रतापी तुझ्या आजोबांनी ती सारीं वसाहत भस्म केली. महर्षि अग्नीची इच्छा त्यांनी पूर्ण केली. आणि त्या मानधन ऋषीनें हा 'विजयरथ' अर्जुनाला दिला. ह्या विजय रथाचा हा इतिहास आहे. नागजातीवर मिळविलेला विजय. तेंच पूर्वजांचे काम तूं पुढें चालव. अरे, श्रीकृष्णाने सुध्दां मथुरा-वृंदावनांतून, त्या सुपीक गंगा-यमुनांच्या प्रदेशांतून नागांना दूर जाण्यासा सांगितलें. तो कालिया जात नव्हता. मोठा बलाढय होता. यमुनेच्या मध्यभागी विलासमंदिर बांधून राहत होता. वृंदावनांतील जनतेला सतावी. शेवटी श्रीकृष्णाने त्याचा गर्व जिरविला. त्याच्या छातीवर श्रीकृष्ण बसले. शेवटीं त्यानें जीवदान मागितले. त्याच्या बायका पदर पसरूं लागल्या. कृष्ण म्हणाला, 'येथून जा. लांब समुद्रकांठी जा. हा प्रदेश सोड.' तिकडे समुद्रतीरीं राहणा-यांना प्रतापी आर्यवीर गरुड सळो की पळो करीत होता. कालिया म्हणाला,'समुद्रतीरी गरुड आहे. तो मारील !' कृष्णाने आश्वासन दिलें कीं, 'मी गरुडाला 'त्रास देऊं नको'असे सांगेन. परंतु येथून जा.' परीक्षिति, असा हा पूर्वजांचा इतिहास आहे. नागांना हांकलून देण्याचा इतिहास आहे. तुझ्या आजोबांनी जें केलें, आजोबांच्या प्रिय मित्रानें - कृष्णानें जें केलें, तेच तू कर. तुझें ते जीवितकार्य. त्यासाठी तूं जन्मलास. जन्मत:च मरत असतांना वांचलास. नागसंहारक हो. तूं एकदां हें काम हाती घेतलेस म्हणजे बघ कसा परिणाम होतो तो ! त्या आस्तिकाचे हातपाय मग गारठतील. तो समन्वयवादी आहे. संग्राहक मताचें तो समर्थन करतो. संग्राहक मत ! पोटांत का कोणी वाटेल तें कोंबील ? पोटांत पुष्टि देणारें अन्नच दवडलें पाहिजे. तेथें कांटे कोंबू तर मरूं. जें स्वत:ला पोषक आहे त्याचाच संग्रह केला पाहिजे. स्वत:च्या संस्कृतीला मारक आहे त्याचा त्यागच केला पाहिजे.' वक्रतुंड त्वेषाने बोलत होता.

'आस्तिकांबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. त्यांना पाहतांक्षणीं पवित्र  झाल्यासारखे वाटतें. त्यांच्या आश्रमांत मी एकदां गेलों होतें. वाटें, तेथून जाऊंच नये, राज्यपदाचा त्याग करून तेथेंच राहावें. परंतु त्यांनी सांगितलें कीं, 'राजा राहून संन्यासी हो. सर्वांचे कल्याण पाहा. मानवधर्माचा उपासक हो. आपल्या सर्वांचा पूर्वज जो मनु, आपल्या संस्कृतीचा आद्य संस्थापक जो मनु भगवान् त्यानें जें धर्मसूत्र लिहिलें त्याला त्यानें मानवधर्मसूत्र असें नांव दिले.' आस्तिकांनी ही गोष्ट सांगितली. मला कौतुक वाटलें. आस्तिकांच्या आश्रमांत गेलों कीं, त्यांच्याप्रमाणे वाटतें. तुमच्याजवळ बसलों म्हणजे तुमचें खरें वाटतें. अनार्यांचा कधी कधी मला तिटकारा येतों. कोणी प्रेतांना पूजतात, कोणी भुतांना भजतात ! कोणी झाडांना प्रदक्षिणा घालतात, कोणी नागासारखे सापाची पूजा करितात ! कोणी कोणी तर लिंगपूजकहि आहोत ! जननेंद्रियाच्या पाषाणमयी प्रतिमा करून त्यांचीच ते पूजा करितात. मला हें सारें किळसवाणे वाटतें. आम्ही आर्यहि त्यांच्याप्रमाणे बावळटपणा करूं लागलों आहोंत. तेजस्वी सविता हा आमचा वास्तविक खरा देव ! ज्ञानाची उपासना करणें हा आमचा धर्म ! 'ज्ञान म्हणजे परमेश्वर' अशी आमची व्याख्या. परंतु आम्हां आर्यांचा तो महान् धर्म धुळींत जाणार का ? अमृतत्त्वाची ध्वजा हातांत घेऊन उगवणारी उषा, तिचें पूजन सोडून दगडांची का पूजा आम्ही करीत बसणार ? भगवान् आस्तिकांना याविषयी काय वाटतें तें मी विचारणार आहें.' परीक्षिति म्हणाला.

"अरे, त्यांच्या आश्रमांत नको जाऊं. विश्वप्रेमाची गोड गोड भाषा ते बोलतात व आपण गुंगून जातो. माणसानें डोके आकाशाला भिडविलें तरी  पाय जमिनीलाच चिकटलेले असतात. व्यवहार पाहावाच लागतो. शेवटीं जगांत संस्कृति टिकायची असते. संस्कृतीचा नीट विकास व्हावा म्हणून आपण जगले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel