'महाराज, मीं तीं मुद्दाम निवडून आणलीं आहेत. आज सात दिवसांत आपण कांहीं खाल्लें नाहीं. चार द्राक्षें अधिक नाहीं होणार.' तो सुंदर नागतरुण गोड शब्दांनी बोलला.
'किती रे गोड बोलतोस तूं !' परीक्षिति म्हणाला.
शुक्राचार्य आतां जाणार होतें. राजघराण्यांतील सर्व मंडळी पायां पडण्यासाठीं आली. जनमेजय आला. सर्वांनीं वंदन करून आशीर्वाद घेतलें. परंतु परीक्षिति असा कां ? त्याची मुद्रा अशी कां ? त्याला का फार वाईट वाटत आहे ?
'राजा, कष्टी नको होऊं.' शुक्राचार्य म्हणालें. एकदम परीक्षिति घालीं बसला.
'काय झालें, राजा ?' शुक्राचार्यांनी विचारलें.
'आग सर्वांगाची एकाएकी आग होत आहे. आग, महाराज, आग ! हृदयाची आग तुम्ही थांबवलीत. परंतु ही देहाची आग कोण थांबविणार ? काय झालें एकाएकीं ? छे : जळलों मी, भाजलों मीं. अपार वेदना होत आहेत.' त्यांच्यानें बोलवेना.
धांवाधांव झाली. शुक्राचार्य शांत होते. राजवैद्य आले. त्यांनी तीं द्राक्षें पाहिलीं. नीट न्याहाळून पाहिलीं. ते गंभीर झालें.
'राजा, हा विषप्रयोग आहे. या द्राक्षांना विष चोपडलें आहे. प्रखर विष. कांहीं तरी कपट आहे. कोणीं आणलीं हीं द्राक्षें ? त्याला आणा पुढें ? ' राजवैद्य म्हणाला.
राजपुरुषांनी त्या सुंदर बल्लव तरुणाला ओढून आणलें. तो तेथेंच मागें उभा होता.
'कोठून आणलींस हीं द्राक्षें ? बोल.' जनमेजयानें विचारिलें.
'थांबा. मी सारें सांगतों. नाग तरुण निर्भय असतों.' तो म्हणाला.
'तूं का नाग आहेस ? दिसतोस गोरा. ' वैद्य म्हणाले.