झाडांवरून आस्तिकांच्या मस्तकांवर फुलें पडलीं. वृक्षांनी गुरुदेवांची पूजा केली. आस्तिक क्षणभर गंभीर राहिले व म्हणाले, 'राजा, श्रेष्ठ कोण व नीच कोण ? आपण या नाग वगैरे लोकांच्या प्रदेशांत आलों. त्यांच्यापेक्षां आपलीं संस्कृति श्रेष्ठ असें म्हणू लागलों. ज्याची संस्कृति श्रेष्ठ त्यांना आधीं जगण्याचा अधिकार असें म्हणूं लागलों. परंतु जी संस्कृति श्रेष्ठ असेल ती दुस-याच्या संस्कृतीला भीत नाहीं. त्या दुस-या संस्कृतीलाहि जवळ घेऊन तिला ती पावित्र्य देते. गंगा मोठी कां ? कारण इतर प्रवाह आत्मसात् करूनहि ती पवित्र राहते म्हणून. इतर प्रवाहांना ती तुच्छ मानीत नाहीं. सर्वांमध्यें कांही खळमळ असतों, तो शेवटीं खाली बसतो व एक महान् गंभीर प्रवाह होऊन पुढें जातो. आपण आर्य श्रेष्ठ आहोंत ना ? श्रेष्ठानें सर्वांना जवळ घ्यावें. मानवप्राणी इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ का ? कारण तो फक्त मानवांपुरतेच पाहणार नाहीं, तर विश्वाचा विचार करील. तर हा शेवटी विश्वानर, वैश्वानर आहे. मनुष्य हा विश्वाचें बाळ आहे. तो ता-यांचा विचार करील, वा-यांचा विचार करील. तो पशुपक्ष्यांना उगीच दुखावणार नाहीं. झाडांना उगीच तोडणार नाहीं. तो सर्वांना कांही मर्यादा सांभाळून संरक्षील. अरे, मानवानें जर विश्वामित्र व्हावयाचें, वैश्वानर व्हावयाचें, तर त्यानें का नागांना जवळ घ्यावयाचें नाहीं, त्यांच्याविषयीं सहानुभूति दाखवावयाची नाहीं? आपण अग्नीला वैश्वानर म्हणतों. त्याला महान् दैवत मानतों. जो अग्नीचा उपासक असेल, महान वैश्वानराचा पूजक असेल, त्यानें कसें वागलें पाहिजे? अग्नि घरोघर पेटतो, प्रकाश देतो, ऊब देतो, अन्न सिध्द करून देतों. ज्यानें या उपकारक तेजाचा शोधं लावला, तो मानवजातीचा मोठा सेवक होय. या अग्नीची उपासना करून आपणहि सर्वत्र ज्ञान नेऊं या, ऊब नेऊं या, प्रकाश नेऊं या. निरनिराळे विचार निरनिराळया ठिकाणी वाढतात त्यांची जुळणी करूं या.
नागांना दूर करून ते कसे सुधारणार ? इतरहि ज्या जाती-जमाती असतील ल्यांना तुच्छ मानून त्या कशा सुधारणार ? तसेंच त्यांची दैवतें, त्यांच्या चाली यांना शस्त्रानें नष्ट करूनहि तें काम होणार नाही. नागलोक सापाची उपासना करतात. आपणाला हंसूं येतें. यांत हंसण्यासारखें काय आहे ? मानवाला जें जें भव्य वाटतें, दिव्य वाटतें, भीतिदायक वाटतें, आश्चर्यमय वाटतें, त्याला त्याला तो भजूं लागतो. अरे, आपल्या सर्व दंत-कथा आकाशांतील अनंत ता-यांपासून आपण निर्मिल्या आहेत. त्या ता-यांकडे पाहात असत पूर्वज. निर्मिली त्यांनीं काव्यें. हा ध्रुव तारा, एका बाजूला स्थिर असा कां दिसतो ? असेल त्याचा बाप. त्यानें मारली असेल लाथ, या राजाला नांव दिलें उत्तानपाद ! -- लांब पाय करून लाथ मारणारा राजा. ध्रुव वनांत गेला. त्यानें तपश्चर्या केली. तो अढळपदीं बसला. त्या ध्रुवाच्या ता-यांभोवती आपण अद्भुत अशी सुंदर व गोड कथा उभी केली. ते दुसरे सात तारे एकत्र दिसले, त्यांना दिलीं सप्तर्षींची नांवें. मृगासारखे ते आणखी कांही तारे दिसतात -- तो मध्यें बाण दिसतो, तो पलीकडे तेजस्वी तारा दिसतो. त्या ता-याला व्याध म्हटलें. हा व्याध व हरणें आकाशांत कशीं आलीं ? रचिली दंतकथा. अशा रीतीनें आकाशाला पाहून जणूं आपलीं पुराणें, आपल्या आख्यायिका, कथा जन्मल्या. अरे, सर्वत्रच अशा जन्मतात. त्या कथांतून आपण आपल्या जीवनाचे अनुभव ओततों, आपलीं ध्येयें ओततों. त्या कथा गोड वाटतात. आपल्या जीवनाच्या आशा-आकांक्षा त्यांत कवि ओततात, म्हणून तीं ती काव्यें हृदय हालवतात. उषादेवीची किती सुंदर स्तोत्रें आहेत ! जेथें रम्य उषा दिसत असेल तेथील ऋषींनी तिचीं स्तोत्रें गायिलीं. आपण सूर्य, अग्नि, वारे, पर्जन्य, इंद्र, उषा यांना मानतों कीं नाही देव ? पाण्याचीहि उपासना करतों कीं नाहीं ? मग कोणीं विशाल वक्षाची उपासना केली तर कां हंसावें ?