'कांही नाग गोरेहि असतात. गो-या नागांना तुम्ही आर्यांनी आत्मसात् केलें, तरीहि माझ्यासारखें स्वतंत्र असें कांही आहेत. या तुमच्या राजानें नागांचा अपमान केला आहे. ज्या एका महर्षीविषयीं आम्हां सर्व नागांना अपार आदर व भक्ति वाटें त्यांचा अपमान या पापी परीक्षितिनें केलेला आहे. त्या ऋषींच्या तोंडांत सायंकाळीं मी दूध नेऊन घालीत असें. ते ऋषी तपश्चर्येंत रंगून गेले होते. एके दिवशीं या राजनें एक साप मारून त्या ऋषींच्या गळयांत अडकवून ठेवला. आम्ही नागजातीचे लोक सापांना मारलें तरी त्यांची विटंबना करीत नाहीं. चंदनकाष्ठांनी त्यांना जाळतों. परीक्षितीनें आमच्या भावना दुखविण्यासाठी हें केलें. ऋषींचा अपमान व आमच्या दैवतांचा अपमान.  राजानेंच असें केलयामुळें इतर लोकहि असें करूं लागलें आहेत. नि:शंकपणे साप मारतात, मुद्दाम रानांत जाऊन मारतात आणि ते मृत सर्प आमच्या घरांत फेंकतात, आमच्या नागमूर्तीवर फेंकतात. मला हें सहन होत नाहीं झालें.  ह्या राजाचे प्राण घेण्याची मीं प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा आज पुरी होत आहे.  तो पाहा पापात्मा तडफडत आहे, मरत आहे. आतां माझें कांहींहि होवो.   माझ्या शरीराचे राई राईएवढे तुकडे करा किंवा आगींत जिवंत जाळा. माझें ध्येय मला मिळालें. हा मी निर्भयपणें येथें उभा आहें. नाग पळत नसतो.' तो तरुण म्हणाला.

राजपुरुषांनी त्या तरुणाला घेरलें. त्याचे हात जखडून बांधण्यांत आले.  तरवारी सरसावल्या गेल्या. जनमेजय रागानें लाल झाला होता. राजपत्न्यांनी आकांत मांडला होता.  परीक्षिति शेवटच्या वेदनांत होता.  शुक्राचार्य शांत होते.

'राजा, तूं आतां क्षणाचा सोबती आहेस. मरण समोर उभें आहे.  मरणकाळीं शत्रुमित्र समान मानण्याची सुवर्णसंधि देवानें तुला दिली आहे.  मनांतून द्वेषमत्सर काढून टाक. तुला सात दिवस भगवंताचा महिमा ऐकविला. ज्ञानप्रेमाची मुरली ऐकविली. ऐकलेंस त्याची परीक्षा आहे. उत्तीर्ण हो. शत्रुलाहि प्रेम देतां देतां देहाचा पडदा फाडून चैतन्यांत मिळून जा. निर्मल, निर्मत्सर हो.  याला क्षमा कर. म्हण कीं, 'हे तरुणा, जा. तूं मला विष दिलेंस, मी तुला प्रेमाचें अमृत देतों. म्हण.' शुक्राचार्य परीक्षिती-जवळ बसून म्हणाले.'

परीक्षितीनें त्या तरुणाकडें पाहिलें. राजाच्या डोळयांत प्रेमाचे अमृत भरलें होतें. शक्ति एकवटून राजा म्हणाला, 'तरुणा, जा.  मीं तुला प्रेम दिलें आहे. मरणारा परीक्षिति मारणाराला प्रेम देऊन जात आहे. सर्वांना प्रेम देऊन जात आहे. अद्यापि मी राजा आहें. अद्यापि माझें शासन आहे. मी तुझ्या अपराधाची क्षमा करतां. जनमेजया, त्याला जाऊं दे. सोडा त्याला. सोडा. मरणोन्मुख राजाची आज्ञा माना. सारें जीवन मला निस्सार वाटत होतें. परंतु आज कृतार्थ झालें जीवन. जन्मभर जीवनाचा घडा रिता होता. परंतु मरणकाळीं आज एकदम प्रेमानें भरून आला. शेवटचा क्षण गोड झाला. मला वाटें माझें जीवितकार्य काय ? तें आज मरतांना सांपडलें. 'विष देणा-यालाहि प्रेम द्या,' हे सांगण्यासाठीं, स्वत:च्या कृतींने जगाला सांगण्यासाठी माझा जन्म होता.  कृतार्थ झालों मी.  सांपडलें माझें जीवितकार्य.  आतां मी सुखानें मरतों; कारण हे जीवितकार्य सांपडलें ति त्याच क्षणीं पूर्णहि झालें.  भगवन् तुमच्या पायांवर डोकें ठेवूनच हे प्राणहंस उडून जावोत.'

त्या तरुणाला सर्वांनी मोकळें केलें. त्या तरुणानें शुक्राचार्यांस व राजास वंदन केलें. तो म्हणाला, 'राजा, मी जातों. आर्यांचा द्वेष आम्हां नागांतहि पसरत चालला आहे. तुझे हें दिव्य मरण त्यांना सांगून द्वेषापासून त्यांना मी परावृत्त करतों. तूं पेरलेंस तें फुकट नाहीं जाणार. मला क्षमा कर.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel