नागाची केली तर कां हंसावें ? मी एक विचार सांतों तो ऐक. त्या त्या कल्पनांना आपण आपल्या श्रेष्ठ कल्पनेचा उजाळा द्यावा. येथील कांही जातींत शिश्नदेवहि आहेत. ते जननेंद्रियांच्या प्रतिमा करून पूजा करतात. आपण त्यांना हंसू नये. मानवाला हा सर्वात मोठा चमत्कार वाटला असेल. ज्या इंद्रियांच्या द्वारा ही सृष्टि निर्माण होते, त्या इंद्रियांची तो पूजा करूं लागला. स,ष्टीचें आदितत्त्व तें हें, असें त्याला वाटलें. आपण त्यांच्या या लिंगपूजेंत अधिक अर्थ ओतूं या. ती पूजा प्रतिष्ठित करूं या. लिंगपूजा म्हणजे काय ? जननेंद्रियांची पूजा म्हणजे काय ? त्यांना स्वच्छ ठेवणें, निर्मल ठेवणें, त्यांचा दुरुपयोग न करणें, त्यांच्याबद्दल पावित्र्य वाटणें, सृजनकर्म म्हणजे महान् जबाबदारी. मी माझ्या इंद्रियांवर संयम ठेवीन. त्यांची शक्ति कमी होईल, असे वर्तन करणार नाहीं. शिश्नदेव शेवटीं शिश्नसंयमी होतील. लिंगपूजा म्हणजे शेवटीं शक्तीची पूजा. ज्या शक्तींतून विश्व निर्माण होतें, त्या शक्तीची पूजा. या शक्तीपासून नीट काम करून घ्यावयाचें असेल तर ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. ह्या शक्तीला क्षोभवाल तर प्रलय होईल. त्या शक्ताला शमवाल तर कल्याण होईल. म्हणून शक्ति व शिव हीं दोन दैवतें आपण निर्मिली. शिश्नदेव असतील येथील जाति, परंतु आपल्या प्रतिभावान् पूर्वजांनी त्यांच्या कल्पना, त्यांची दैवतें घेऊन त्यांत अधिक अर्थ ओतला. मनांत वाईट येईल त्याला वाईट. नवीन दृष्टि द्या. जनतेला तसें पाहण्याची मग संवय होईल. मग जननेंद्रियांची तीं मंदिरें गंभीर वाटतील, वैराग्याची वाटतील. तेथें कामाचें दहन करणारा शंकर आठवेल. संसार सुंदर करावयाचा असेल तर संयम राख. हें शरीर म्हणजेच ईश्वराचें मंदिर. तें पवित्रराख. तेथील इंद्रियें शुध्द राख अशा भावना, त्या मंदिरात गेल्यावर उत्पन्न होतील. ही दृष्टि घेऊन आपण येथील सर्व जाती-जमातीत शिरूं या. वरवर पाहून कोणाला तुच्छ नका मानूं.
राजा, प्रत्येक मनुष्यप्राणी हा कांही बाबतींत अधिक विकसित असतों, कांही बाबतींत कमी विकसित असतो. म्हणून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असें कसें म्हणावें ? आर्यांत कांही गुण असतील तर येथील आर्येतरांत दुसरे असतील. त्यांच्यापासून आपण कांही शिकूं. आपल्यापासून ते शिकतील. आर्य व नाग यांचे विवाह झाले म्हणून काय बिघडलें ?या एका देशांत आपण राहतों. एकाच प्रकारचें अन्न खातों. एकच प्रकारची हवा. एकच प्रकारचे पाणी. आपण आतां सारे येथले. काय आहे असे विवाह करण्यांस हरकत ? अर्जुनानें नागकन्यांजवळ विवाह केले. तो चित्रांगदेचा पुत्र बभ्रुवाहन का कमी पराक्रमी निघाला ? कांकणभर सरसच होता. अनेक महान ऋषिहि अशाच संबंधांपासून नाहीं का जन्मले ? कोणत्या विवाहापासून सुख मिळेल ? दोन गोष्टींची जरूर असते. कांही समानधर्म लागत असतो. धर्म म्हणजे गुणधर्म. समान आवडी, समान ध्येय असलें तर बरें असतें. परंतु केवळ साधर्म्यच पुरेसें नाहीं. आपण जेव्हां कोणाकडे आकर्षिले जातों, तेव्हां दोन गोष्टींचा खेळ चाललेला असतों. कांहीं समान गुणधर्मामुळें आपण आकर्षिले जातों, तर कांहीं दुस-याच गोष्टींमुळें ओढले जातों. आपणांत जें आहें तें त्या दुस-या व्यक्तींत आहेच. शिवाय जे माझ्यांत नाहीं, परंतु मला ज्याची जरुरी आहे, असेंहि कांही तरी त्या व्यक्तींत आहे. आपणांस तहान लागते त्या वेळेस पाण्याकडे आपण ओढले जाताआपणांस भूक लागली म्हणजे अन्नाकडे आपण ओढले जातों. थंडी लागते तेव्हां अग्नीजवळ बसतों. म्हणजे जें जें आपणांस हवें असें वाटत होते, परंतु आपणाजवळ नव्हते, त्या त्या वस्तूंकडे आपण धांवतों. त्या वस्तु न मिळतील तर मरूं; मिळतील तर जगूं. लग्न म्हणजे एक प्रकारची पूर्णता. ज्या एकमेकांत उणीवा असतात त्या एकमेक भरून काढून जो उभयंतात समानधर्म असतो त्याची वाढ होते. एकाच ध्येयाचीं स्त्री-पुरषें असूनहि प्रखर वृत्तीच्या स्त्रीला त्या ध्येयाचा परंतु सौम्यवृत्ति पति आवडेल, तर प्रखर वृत्तीच्या पुरुषाला त्याच ध्येयाची परंतु सौम्यवृत्ति पत्नी आवडेल. अशी ही परिपूर्णता होत असते. म्हणून ज्यांत खरोखर एकमेकांविषयीं ओढ वाटते, आकर्षण वाटतें, त्याची पूर्णता त्यांच्या एकत्र येण्यानेंच होत असते.