'त्रास कसला ? वत्सलेच्या आजीकडे सकाळीं येतों. इकडेहि येईन. लहानपणची मैत्रीण, तिच्यासाठीं नको यायला ? ' तो म्हणाला.
'परंतु त्यांत धोका आहे. राजपुरुषांची दवंडी ऐकलीत ना ? आतां आलांत तेवढे पुरे. पुन्हां नका येऊं. ' आई म्हणाली.
'राजपुरुषांची आज्ञा मोडली पाहिजे. पापाला का साथ द्यावी ? कार्तिक, या हो तुम्ही.' कृष्णी म्हणाली.
'लौकरच आम्ही येथून जाणार. हे गांव सोडून जावें लागणार. कृष्णी म्हणते येथेंच राहीन रानांत.' आई म्हणाली.
'रानांत राहीन व माझ्या देवाची पूजा करीन ! ' ती म्हणाली.
'कोठेंसा आहे हा देव ? मला दाखवशील ?' कार्तिकाने विचारिलें.
'तुम्हांला भीति वाटेल. दाट जंगलांत आहे. तेथें सूर्याचा किरण जाऊं शकत नाहीं. किर्र झाडी. खरेंच.' ती म्हणाली.
'मी भित्रा म्हणून वत्सलेला आवडत नसें. मी भित्रा आहे असें तुलाहि वाटतें. माझी भीति गेली पाहिजे.' कार्तिक म्हणाला.
'मी दवडीन भीति. याल माझ्याबरोबर ? आज तिस-या प्रहरीं जाऊं.' कृष्णी म्हणाली.
'बरे ठरलें. तूं ये शेतावर मी वाट पाहीन.' कार्तिक म्हणाला.
तिसरा प्रहर झाला. परडींत फुलांच्या सुंदर माळा घेऊन कृष्णीं निघाली. कार्तिक वाट पाहत होता. तो झोंपडींत होता. कृष्णी आंत आली.
'तुम्ही येथेंच स्वयंपाक करतां वाटतें ? ' तिने विचारिलें.
'हो. हातानें दळतों, हातानें भाकरी भाजतों. हात भाजला भाकरी करतांना.' तो म्हणाला.
'पाहूं.' ती म्हणाली.
त्याचा हात तिनें हातांत घेतला. तिनें त्याचें भाजलेले बेट आपल्या तोंडांत घातलें.