"राजा, या आश्रमांत जादूटोणा कांही नाही. या आश्रमांत कांही विशेष असेल तर एकच आहे कीं, येथें प्रेम पिकवलें जातें. जीवनाच्या वृक्षाला मधुर फळें कशीं लागतील ती कला येथें शिकविली जाते.' आस्तिक म्हणाले.
"शेंकडों कोस पसरलेली शेती करणें सोपें आहे, परंतु हें साडेतीन हातांचे शेत पिकविणें कठिण आहे. परंतु एकदा हें पिकूं लागलें की अमोल संपत्ति हातीं येते. कधीहि मग ते पीक तुटत नाहीं, बुडत नाही.' दुसरे ऋषि म्हणाले.
"मधूनमधून जपावें लागतेंच. उंदीर, घुशी जीवनाचा मळा विफल करण्यासाठी टपलेल्या असतात. हा मळा फस्त करण्यासाठी नाना वासना-विकारांचे पाश हपापलेले असतात. कठिण आहे ही शेती, परंतु ही शेती केली नाही तर सारें फुकट आहे. हृदयांतील शेती नसेल तर बाहेर कितीहि तुम्हीं पिकविलें तरी उपासमार नष्ट होणार नाही, भांडणे दूर होणार नाहींत. राजा, ही शेती येथें पिकविली जाते. बाहेरच्या शेतीबरोबरच ह्या शेतीकडेहि लक्ष दिलें जातें. आम्ही शेतांत जातों. तण उपटून टाकतो. तण उपटतांना मुलांना सांगतों, 'हे तण उपटल्याशिवाय धान्य नाहीं. त्याप्रमाणें जीवनांतील द्वेषद्रोह वगैरे विषारी तण उपटल्याशिवाय जीवन समृध्द होणार नाही.' राजा, प्रत्येक बाह्य कर्माबरोबर यांत मानसिक कर्म होईल अशी दक्षता मी येथे घेतों. सकाळी मुलें आश्रम स्वच्छ करतात, पाण्याचा सडा घालतात. मी त्यांना सांगतो, 'हृदयांतीलहि घाण काढा. धूळ उडूं नये म्हणून बाहेर पाणी शिंपलेत, परंतु जीवनांत दुष्ट स्पर्धेची, कामक्रोधाची, द्वेषाची, स्वार्थाची धूळ उडून मार्ग दिसेनासा होतो. तेथे नको का सडे घालायला ? तेथे प्रेमाच्या पवित्र पाण्याचे, सहानुभूतीच्या सुगंधी पाण्याचे सडे घालीत जा. प्रात:काळच्या पवित्र वेळी तरी घालीत जा.' सकाळी भगवान् सूर्यनारायण सर्वत्र सोनें वांटीत येतो. अशा मंगल प्रहरी आपणहि जीवनाचे सोनें होईल अशी खटपट केली पाहिजे. प्रात:काळचे संस्कार दिवसभर उपयोगी पडतात. प्रभातीं जें पेरूं तें सायंकाळी कापूं. राजा, असा हा आश्रम आहे. दुसरी जादू येथे नाहीं. जें कांही करावयाचे ते मनापासून. जें काही करायचें ते हृदय ओतून - ज्या झाडांना अंत:करणपूर्वक पाणी घालण्यांत येईल त्यांना रसाळ फळें कां लागणार नाहींत ? मुलें झाडांना नुसतें खत, नुसतें पाणी नाही देत. त्यांत हृदये मिसळतात. वृक्ष ही गोष्ट ओळखतात व रसाळ फळें अर्पण करतात. मानवापेक्षांहि ही मानवेतर सृष्टि कधीं कधीं अधिक कृतज्ञ वाटते. पृथ्वीची जरा जोपासना करा. पोटेरीसारखें कणीस ती देते. मी नेहमी याचा विचार करीत असतों.' आस्तिकांची वाणी गंगेप्रमाणे वाहत होती.
"स्नानें येथें करणार का नदीवर ?' एका छात्रानें येऊन प्रणामपूर्वक विचारलें.
"नदीवरच जाऊं. बरेच दिवसांत पोहलों नाहीं. आज पोहूं.' परीक्षिति म्हणाला.
"मग आतां निघावेंच.' बरोबरचे एक ऋषि म्हणाले.
नदीवर सर्व स्नानार्थ गेले. सारथी घोडयांना पाणी पाजून आणीत होते. परीक्षितानें वाटेंत घोडयांना थोपटलें.