विष्णु म्हणजे सूर्याचें रूप. सूर्याचे किरण अंधार दूर करीत, ऊब देत, जीवन वाढवीत, सर्वत्र हळूच प्रेमानें शिरतात. त्याप्रमाणें राजानें प्रजेचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्वत्र जावयाचें; सर्वांच्या जीवनात शिरावयाचें; सर्वांच्या सुखदु:खाची चौकशी करावयाची; सर्वांना ऊब द्यावयाची; आधार द्यावयाचा. द्वेष, स्पर्धा, मत्सर, वैर, संकुचितपणा यांचा नाश करीत जीवनाची वाढ सर्वत्र नीट होईल याची काळजी राजानें घ्यावयाची. परीक्षितिमहाराज याप्रमाणें वागत आहेत हें त्यांच्या या परिभ्रमणा-वरून दिसत आहे. राजानें असेंच समता, न्याय व सहानुभूति यांचा दीप हातीं घेऊन सर्वत्र हिंडलें पाहिजे. म्हणजे असत्य व अन्याय यांची फारशी वाढ होणारच नाहीं. असों. मी सर्वांच्या वतीनें त्यांचें स्वागत करतों. प्रजेच्या कल्याणासाठीं त्यांना उदंड आयुष्य मिळों, असें मन:पूर्वक इच्छितों. हा फुलांचा हार त्यांना अर्पण करतों. इतर महर्षीसहि मी हार घालतों.'
सर्वांच्या गळयांत पुष्पहार घालण्यांत आले. आस्तिक आसनावर बसले. परीक्षिति म्हणाला, 'भगवान् आस्तिकांनी आमचा गौरव केला आहे, याबद्दल आम्ही आभारी आहों. किती तरी दिवस आश्रतांत येईन येईन असें मी म्हणत होतों. मीं पुष्कळ आश्रम पाहिले. परंतु हा आश्रम कांही निराळा आहे. या आश्रमांत आल्यानें सर्व श्रमांचा परिहार होतो. ज्या आश्रमांत क्षणभर आल्यानें सर्व सांसारिकांना स्फूर्ति मिळेल, उदात्त ध्येयें मिळतील, नवजीवन लाभेल, दृष्टि मोठी होईल, जरा वर गेल्यासारखें वाटेल, तोंच आश्रम खरा आश्रम. अशा आश्रमांत अत्यंत आदरपूर्वक व चिकित्सापूर्वक जीवनाचा सर्वांगीण विचार होत असतो. आश्रम म्हणजे विचारनिर्मितीची खाण. येथें सर्व प्रकारच्या चर्चा होऊन जीवनाचा मार्ग दाखविला गेला पाहिजे. शिक्षण कसें असावें, कलांचे ध्येय कार्य, राजनीति कशी असावी, विवाहनीति कशी असावी, आश्रमधर्म कार्य, वर्णधर्म काय, निरनिराळया मानववंशांचे परस्परांशी संबंध कसे असावेत, धर्माचें स्वरूप काय, संस्कृतिसंवर्धन कसें व्हावें, एका का दोन-शेकडों प्रश्नांचा ऊहापोह येथें झाला पाहिजे. आश्रमांतून विचारांची धारा बाहेरच्या जगाला मिळाली पाहिजे. येथून प्रकार मिळावा, येथून जीवन मिळावें, येथून स्फूर्ति मिळावी, दृष्टि मिळावी. असे आश्रम सर्वत्र नसतात. असा आश्रम एखादाच असावयाचा. जेथें महान् विभूति असेल तेथें असा आश्रम उभा राहतो. मागे एकदां या आश्रमांत मी आलों होतों त्या वेळेस जो सुगंध मी घेऊन गेलों तो अद्याप मला पुरत आहे. भगवान् आस्तिकांचे स्मरण होतांच मला पावन झाल्यासारखें वाटतें. कां असें वाटतें ? त्यांच्याकडे मी पूज्यभावानें कां पाहतों ? तुम्ही सारें कां पाहतां ? थोरांच्या चरणांशी भक्तिभावानें वसावें असें आपणांस कां वाटतें ? ते चरण सोडूं नयेत असें कां वाटते ? सांगू ? आपल्या जीवनाची पूर्णता आपणाला स्वत:च्या जीवनांत अनुभवतां येत नाही. आपल्या जीवनाचा संपूर्ण विकास आपल्या कृतीतून प्रकट झालेला नसतो. आपणांस यामुळें असमाधान असतें. आपलें संपूर्ण सुंदर स्वरूप पाहण्याची आपणांस इच्छा असते. थोर विभूतींच्या ठिकाणी तो विकास आपणांस दिसतो. ते उदात्त स्वरूप, ते आपलें दैवी स्वरूप, त्यांच्या ठिकाणीं आपण बघतों. 'असें मला व्हावयाचें आहे, हा खरा मी, ही माझी परिपूर्णता' असें आपणांस वाटतें. त्यांना आपण देव मानतों. माझा देव म्हणजे सर्वांगीण विचार झालेला मीच. देवाचें चिंतन करणें म्हणजे माझ्या परिपूर्णतेचें चिंतन करणें. ती परिपूर्णता माझ्यांत आज अप्रकट आहे. ती ज्याच्या ठिकाणी अधिकाधिक प्रकट झालेली मला दिसते, तेथें मी नमतों, रमतों. भगवान् आस्तिकांच्या ठायीं मानवी परिपूर्णता प्रकट झालेली दिसते. परिपूर्णता अनेक प्रकारची आहे. परिपूर्णता म्हणजे सर्वांगिण सौंदर्य. शरीराची सर्वांगीण प्रमाणबध्द अशी वाढ झाली, कीं शारीरिक सौंदर्य उत्पन्न होतं. मनाची व बुध्दीची परिपूर्ण वाढ झाली, कीं ज्ञान जन्मतें. आणि मानव्याची परिपूर्ण वाढ झाली, कीं दिव्यता जन्माला येते. हीं सौंदर्यें एकापेक्षां एक अधिक उच्चतर आहेत. किंवा शारीरिक सौंदर्य म्हणजे घराची शोभा, बौध्दिक सौंदर्य म्हणजे माजघरांतील शोभा, आणि मानव्याच्या परिपूर्णतेचें सौंदर्य म्हणजे गाभा-यांतील शोभा.