"मला निजूं दे. आजी, निजूनच राहूं दे. मला कांही नको. मला स्नान नको, मला ज्ञान नको. मी जागीच आहें. ज्ञानाचा विचार करतें आहें. ज्ञान म्हणजे शून्य. तें परब्रह्म म्हणे सत्हि नाहीं, असत्हि नाहीं, दोहोंच्या पलीकडे आहे. तें दुष्टत्वाच्या पलीकडे आहे. सुष्टुत्वाच्या पलीकडे आहे. असें जर आहे, तर नीतीला अर्थ काय ? आपण चांगलेंच वागावें व वाईट वागूं नये असें कां ? चांगले वा वाईट - अंतिम तत्त्वाच्या दृष्टीनें ही मायाच आहे. वाटेल तसें मनुष्य वागला म्हणून काय झालें तो पहाटें स्नान करो वा पासल्या प्रहरी करो; तो दिवसा निजो वा रात्रीं जागो; तो आग लावो वा आग विझवो; कशालाहि अर्थ नाहीं. आजी, ब्रह्मचिंतन करतां करतां सारें व्यर्थ आहे एवढें मला समजलें. मी पडूनच राहतें. नको उठवूं मला.' वत्सला म्हणाली.

"नीज तर मग. आणखी पांघरूण घालतें. त्रास नको करून घेऊं. विचार नको करूं. थोडा कमी कर विचार. नाहींतर वेडी होशील.' सुश्रुता म्हणाली.

सुश्रुता स्नानाला गेली. वत्सला निजून राहिली. थोडया वेळानें कार्तिक आला. एकदम वत्सलेजवळ आला.

"ऊठ ना ग वत्सला, तूं पोहायला ना येणार होतीस ? मी नदीवर वाट पाहात होतों. सुश्रुताआजींना विचारिलें तर त्या म्हणाला कीं, 'ती निजलेलीच आहे.' आज नदीवर किती गर्दी आहे ! किती तरी मुली शिकत आहेत पोहायला. तूंहि शीक. चल.' कार्तिक म्हणाला.

"मी नाही येत. तूं जा.' ती पांघरुणांतून म्हणाली.
"तूं कधींहि माझ्या इच्छेप्रमाणे नाहींच करणार ?' कार्तिक म्हणाला.
"मी का दासी आहें कोणाची ?' एकदम वत्सला उठून म्हणाली.
"तू दासी नाहींस, परंतु मी तुझा दास आहें.' कार्तिक म्हणाला.

"दासानें अंगणांत राहावें. असें घरांत येऊन अधिकाराने बोलूं नये. कार्तिक, तूं मूर्ख आहेस. स्त्रियांना दासी होणें आवडतें. परंतु कोणाचें ? त्याचे दास होणा-यांच्या त्या कधीहि दासी होत नाहींत. जें मिळत नाहीं त्याच्या पाठीमागें लागावें. जें मिळेल तें झिडकारावें. सहजासहजी   मिळणा-या वस्तूला किंमत नसते. तूं मला विनामूल्य मिळणार परंतु ज्याच्यासाठी माझे जीवनहि मी फेकून देण्याला तयार होईन, तो माझा ठेवा. तूं आपली एवढी किंमत कोठें ठेविली आहेस ? तू स्वत:ला भाजीचा पाला केलें आहेस. पै किमतीचे केलें आहेस. स्वस्त वस्तु वत्सलेला नकोत. जा तू.' वत्सला म्हणाली.

"मलाहि स्वस्त वस्तु नको आहे. तू महाग आहेस म्हणूनच तुझ्या पाठीमागें मी लागलों आहें. या जन्मी नाही तर पुढील जन्मी मिळशील ! मी आशावान् आहे' कार्तिक म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel