बाळ शशांकाचा हात धरून आस्तिक सर्वांच्या पुढें होतें. पाठीमागून सर्व जनसागत होता. जनमेजय उभा राहिला. भगवान् आस्तिक हातांत शांतिध्वज घेतलेले असे समोर येऊन उभे राहिले. बाळ शशांकानें समोर आई पाहिली, वडील पाहिले. तो एकदम धांवत जाऊन आईला बिलगला. सैनिक त्याला दूर ओढूं लागलें.
'थांबा, ओढूं नका. ही माझी आई आहे. तिच्याबरोबरच मी उडी टाकीन.
आई, माझा एक हात तूं धर व एक बाबा धरतील. आपण उडी घेऊं. कोणत्या होमकुंडांत ? ह्या ? ' तो बोलत होता. ते तेजस्वी शब्द ऐकून काय वाटलें असेल बरें तेथील लोकांना ? जनमेजयाला काय वाटलें ? हजारों वृध्द स्त्री-पुरुषांना काय वाटलें ? ते शब्द ऐकून जनमेजयाची मान खालीं झाली, तर सहस्त्रांची मान वर झाली.
'राजा, सप्रेम प्रणाम.' भगवान् आस्तिक म्हणाले.
'भगवन् मला लाजवूं नका. आपल्या चरणांची धूळ आम्हीं मस्तकीं धरावीं.' असें म्हणून राजा जनमेजय दंडवत त्यांच्या पायावर पडला. आस्तिकांनी त्याला उठवून क्षेमालिंगन दिलें.
'आपण कोणीकडून आलांत ? काय हेतु धरून आलांत ? आपल्यासारख्या पुण्यमूर्ति महर्षींचे दर्शन अत्यंत दुर्लभ. कां केलांत दर्शन देण्याचा अनुग्रह ? आज शतजन्मांची पुण्यें फळली. म्हणून आपलें दर्शन घडलें.' जनमेजय बध्दांजलि म्हणाला.
'राजा शब्दावडंबर करण्याची ही वेळ नाहीं. औपचारिक बोलण्याची ही वेळ नाहीं. मी माझें बलिदान करण्यासाठीं आलों आहें. मी व माझ्या आश्रमांतील अंतेवासी, त्याप्रमाणेंच इतर महान् ऋषिमुनि आम्ही सर्व तुझ्या होमकुंडात शिरण्यासाठीं आलों आहोंत. शेकडों लोक वाटोवाट मिळालें. तेंहि आले आहेत. तूं जो हा नरमेघ सुरू केला आहेस, हें सर्पसत्र सुरू केलें आहेत, त्यांत आमचीहि आहुति पडून तुझा नागद्वेष शांत होवो. हा शशांक, हा नागेश, हा रत्नकांत, तो बोवायन, तो पद्मनाभ, दे सर्वांच्या आहुति. त्या बघ सुश्रुता आई. सर्वांत वृध्द अशा त्या आहेत. त्याहि तुझ्या द्वेषाला शांत करण्यासाठीं आल्या आहेत. राजा, माझ्या देहांतहि तुझ्या दृष्टींने अपवित्र असणारें नागरक्त आहे. हा अपवित्र देह अग्नीत फेंक व धर्माला उजळा दें. पृथ्वीला पावनता दे.' आस्तिक म्हणाले.
'महाराज, तुमच्या अस्तित्वानें पावित्र्य पवित्र होईल. धर्म सनाथ होईल. तुम्ही असें कां बोलता ? मीं आपला कधीं तरी अपमान केला का ? आपल्या आश्रमांवर पाठवले का सैनिक ? आपणांविषयीं मला अत्यंत पूज्य बुध्दि आहे.' जनमेजय म्हणाला.