शेपटी आपटीत आपटीत तो पाहा येत आहे वाघ ! त्याचें तें पिवळें धमक सोन्यासारखें रसरशीत अंग व त्यावर ते पट्टे ! तो पाहा त्याचा मृत्यूप्रमाणें जबडा ! ते पाहा आगीसारखें डोळे ! भेसूर सौदर्यं ! ती त्याचीं तीक्ष्ण नखें ! हुंगीत हुंगीतयेतो आहे. कसला घेत आहे वास ? त्याला का माणसाचा वास येत आहे ? छे: ! भ्रम झाला त्याला बहुधा. तो समोरच्या भक्ष्यावर तो तुटून पडला. मोहाला बळी पडला. समोरची मेजवानी पाहून भुलला व जवळ छपलेलें मरण त्याला कळले नाहीं.
पंजांनी तो गाईला फाडफाडून खात होता. मध्येंच डुरकाळी मारी. प्रेमळ डुरकाळी. तो का राणीला बोलावीत होता ? वाघिणीला हाक मारीत होता ? खा, पोटभर मांस खा, हें काय ? अस्वस्थ कां झाला वाघ ? काय बघतो आहे ? काय हुगतों आहे ? सभोंवती हिंडतो आहे. पुन्हां लागला ताव मारायला. खा, खा पोटभर मांस. पुढची चिंता पशूंनीं करूं नये !
तो पाहा लांब भाला जारानें घुसला त्याच्या अंगांत ! वाघानें उडी मारली. चवताळला तो ! खवळला तो ! प्रचंड गर्जना केली त्यानें. त्या मृत गाईच्या देहांतील अणुरेणुहि त्या गर्जनेंने जिवंत झाले असतील. त्या डुरकाळीनें मढीं खडबडून उठलीं असतीं, जिवंतांची मढीं झालीं असतीं. वाघाच्या अंगात तो भाला घुसला होता. त्या भाल्यासकट तो उसळला. नागानंदाच्या कीर्तीचा व पराक्रमाचा झोंडाच जणूं वाघ नाचवीत होता, फडकवीत होता. वाघानें नागनंदावर झेंप घातली, परंतु त्यानें चुकविली. त्यानें तलवार मारली. परंतु ती त्या भाल्यावर आपटली, भाला तुटला. पुन्हां आला वाघ. बाँ, बाँ करून आला. नागनंदानें त्या वेळीं तलवारीचा असा वार केला कीं, वाघाचें मुंडके तुटलें. वाघ मरून पडला. परंतु ही कोणाची आरोळी ? अरे, ही वाघीण आली ? ती चवताळली. नागानंद उभा राहिला. पवित्र्यांत उभा राहिला. ती रक्तरंजित तलवार त्याच्या हातांत होती. वाघीण फार क्रूर दिसत होती. परंतु वाघिणीच्या पाठींत कोणी मारली तलवार ? वाघीण मागें मुरडली. कोण होतें तेथें ? नागानंद एकदम धांवला. त्यानें वाघिणीवर बार केला. वाघिणींने कोणाला धरलें होतें ? कोणाला मारला पंजा ? पुन्हां वळली, पुन्हां नागानंदाचा वार ! पडली मरून. वाघ-वाघीण तेथें मरून पडलीं. परंतु; नागानंदाच्या मदतीला कोण आलें होतें धांवून ?
नागानंद व वत्सला एकमेकांस बिलगून बसली होती. ते दोन जीव समोर मरून पडले होते. रानांतील राजाराणी तेथें मरून पडलीं होती.
'तुला लागलें का ?' नागानंदानें हळूच विचारलें.
'हो.' ती म्हणाली.
'कोठें ?' त्यानें भीतीनें व प्रेमानें पाहून विचारिलें.