'कोठें गेली स्फूर्ति ? ' तिनें विचारलें.
'मला नाहीं माहीत. घें हीं फुलें ओतून.' तो म्हणाला.
'राहूं दे ना परडी. छान आहे परडी. मला देतां ही ? ' तिने विचारिलें.
'तुला कशाला ? ' त्यानें विचारलें.
'मला आवडली आहे म्हणून. तुमची आहे म्हणून.' तो म्हणाला.
'माझी आहे म्हणून ? ' त्यानें प्रश्न केला.
'हो ! तुम्ही किती चांगले आहांत ! मला पोहायला शिकवीत असां. मी लहान होतें. तुम्ही लहान होतां. मला एकदा दोन फळें दिलीं होतीत. आठवते का ? तुम्हांला नसेल आठवत, परंतु मला आठवतें. मी आजोळी होते. तेथें किती गोड बोरी मला तुमची आठवण येई. मी तेथल्या विहिरींत उंचावरून उडी टाकीत असें. लोक माझे कौतुक करीत मी त्यांना सांगें, कार्तिकानें शिकविलें मला. त्यांना आश्वर्य वाटे की, आर्यानें कसें शिकविलें ? ठेवूं मी परडी ? का हवी तुम्हांला ? ' कृष्णीने प्रेमाने विचारलें.
'ही परडी माझी नाहीं.' तो म्हणाला.
'मग कोणाची ?' तिनें विचारलें.
'वत्सलेची आहे ही. नागानंदाने तिला करून दिली होती. तिची आवडती परडी.' तो म्हणाला.
'वत्सलेची व नागानंदाची परडी ! कार्तिकाची व कृष्णीची कां न व्हावी ? काय आहे अडचण ? ही हंसून म्हणाली.
इतक्यांत कृष्णीची आई घडा घेऊन आली. घडा ठेवून ती तेथें आली.
'इतकी कशाला फुलें ?' ती म्हणाली.
'मला वाटलें एवढीं पुरतील कीं नाही ? रोज देऊं का आणून ! त्याने विचारिलें.
'रोज कशाला त्रास ?' आई म्हणाली.